Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 06 July 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जूलै २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
आषाढी शुद्ध एकादशीचा सोहळा आज सर्वत्र
भक्तिभावाने साजरा होत आहे.
विठ्ठ्ल पांडुरंग हरीच्या जयघोषात, टाळ-मृदुंगांच्या नादात राज्यातील
ठिकठिकाणच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदीरांचा परिसर पहाटेपासूनच दर्शनासाठी येणा-या भाविकांनी
गजबजून गेला आहे. राज्याच्या एकादशीच्या मुख्य शासकीय सोहळ्यात पंढरपूर इथं आज पहाटे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते
श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. यावेळी नाशिक जिल्हातल्या नांदगाव तालुक्यातील
कैलास उगले - कल्पना उगले या दांपत्यांना विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला.
****
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल
निर्मल दिंडी पुरस्कारांचं वितरणही यावेळी झालं. स्वच्छता-सामाजिक विषयांवर प्रबोधन
करणाऱ्या पायी दिंड्यांना या पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं. प्रथम क्रमांक जगदगुरू
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्या अंतर्गत येणा-या श्री संत रोहिदास दिंडी तसंच द्वितीय क्रमांक श्री
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यांतर्गत असलेल्या श्री बाळकृष्णबुवा वारकरी दिंडी
तर, तृतीय क्रमांक याच पालखीतील श्री
गुरु बाळासाहेब आजरेकर दिंडी यांना प्रदान करण्यात आला.
****
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी
एकादशीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान विठ्ठ्ल समाजाला आनंद आणि समृद्धि
प्रदान करो या शब्दात समाजमाध्यमावर त्यांनी संदेश दिला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर नजिक असलेल्या
वाळूज नजिक प्रतिपंढरपूरकडे पायी जाणाऱ्या भाविकांसह दिंड्या तसंच पालख्यांनी शहरातील
रस्त्यांवर गर्दी केली आहे. सकाळी रिमझीम पावसातही पारंपरीक वेशात अबालवृद्ध इथं पायी
जाण्यासाठी मार्गस्थ झाल्याचं दिसून आलं. अजुनही या मार्गावर भाविकांचे चमु पायी चालत
आहेत. तसंच या मार्गावर सेवाभावी संस्थांनी पिण्याचं पाणी- फराळ आदींची व्यवस्थाही
केली आहे.
****
ओडिशाच्या जग्गनाथ पुरी इथं आज सायंकाळी
'सुना बेशा'या भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांना सुवर्ण आभुषणांनी सजवण्याचा सोहळा होणार आहे.
****
आज मोहर्रमचा दहावा दिवस.. पैगंबर
मुहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि सत्य आणि न्यायासाठी करबलामध्ये आपले प्राण
गमावलेल्या त्यांच्या शिष्यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ हा दिवस नेहमी पाळला जातो.
हजरत इमाम हुसेन यांनी प्रतिकूल परिस्थितीतही लोकांना सत्यावर अढळ राहण्याची प्रेरणा
दिली, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आपल्या सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटले आहे.
दरम्यान, मोहरमच्या दिवशी ताजिया मिरवणूक काढली
जाते आणि मजलिसचे आयोजन केले जाते.
मुस्लिम धर्मीयांच्या मोहर्रमचा आजचा
दिवस श्रध्दापूर्वक वातावरणात पाळला जात आहे. ठिकठिकाणी ताजीयाची प्रतिकात्मक मिरवणूक
तसंच प्रेषितांच्या शहिद झालेल्या नातेवाईकांच्या स्मृतींचं स्मरण केलं जात आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सध्या
सुरु असलेल्या परदेश दौऱ्यात आज १७ व्या ब्रिक्सन संमेलनात सहभागी होण्यासाठी ब्राजीलच्या
रियो-डी-जेनेरियो इथं आले आहेत. या संमेलनात ब्राज़ीलसह ,रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रीका सहभागी झाले आहेत.
****
भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं
बंगळुरू इथं काल रात्री झालेल्या पहिल्या एनसी क्लासिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं
आहे. त्यानं या स्पर्धेत ८६.१८ मीटर अंतरावर भाला फेकून पहिला क्रमांक मिळवला. केनियाच्या
ज्युलियस येगोनं ८४.५१ मीटर भालाफेक करून
रौप्यपदक जिंकलं तर श्रीलंकेच्या रमेश पाथिराजेनं
८४.३४ मीटर भालाफेक करून कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं.
****
क्रिकेट - इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम
इथं सुरू असलेल्या अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेच्या दुसऱ्या सामन्याच्या कालच्या
चौथ्या दिवशी भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या दीड शतकाच्या आणि ऋषभ पंत तसंच रविंद्र
जडेजाच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर सहा बाद ४२७ धावांवर आपला दुसरा डाव घोषित
केला. पहिल्या डावातील १८० धावांच्या आघाडीच्या पाठबळावर भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी
६०८ धावांचं लक्ष्य ठेवलं. काल दिवसअखेर इंग्लंडच्या ३ बाद ७२ धावा झाल्या होत्या.
विजयासाठी भारताला ७ बळी मिळवणं आवश्यक आहे. आकाशदीपने दोन तर मोहम्मद सिराजने दुसऱ्या
डावात एक गडी बाद केला.
****
दरम्यान, भारतानं कसोटी क्रिकेटमध्ये एकाच
कसोटी सामन्यात १ हजारांपेक्षा जास्त धावा करून इतिहास घडवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये
भारतानं एका सामन्यात १ हजार किंवा त्याहून अधिक धावा केल्याची ही पहिलीच वेळ आहे.
यापूर्वी फक्त पाच संघांनी हा पराक्रम केला होता. या कसोटी सामन्यात शुभमन गिलनं महत्त्वाची
भूमिका बजावली असून त्यानं चारशे पेक्षा जास्त धावा केल्या असून ही कामगिरी ९३ वर्षांत
पहिल्यांदाच घडली आहे.
****
हवामान -
येत्या २४ तासात राज्याच्या सर्वच
विभागात पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून आज सकाळी छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील
काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दरम्यान नाशिक शहरासह जिल्ह्यात दोन दिवसांपासून
पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून बहुतांशी भागांमध्ये
वाहतूक कोंडी झाली होती. काल अकोल्यात दमदार पाऊस झाला असून पालघर जिल्ह्यातही जोरदार
पाऊस झाला. तर रत्नागिरीत देखील अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
****
No comments:
Post a Comment