Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 07 July 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ जूलै २०२५ दुपारी १.०० वा.
****
ब्राझीलमध्ये रिओ द जेनेरिओ इथं
सुरु असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत, ब्रिक्स राष्ट्रांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा
सामना करण्यासाठी आपली वचनबद्धता दर्शवली. यावेळी सर्व राष्ट्रांनी पहलगाम दहशतवादी
हल्ल्याचा निषेध केला. या परिषदेत शांतता आणि सुरक्षितता यावरील सत्राच्या सुरवातीला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करुन दहशतवाद हा मानवतेवरचा
घातक घाव असल्यांचं नमूद केलं. दहशतवादाचा निषेध ही केवळ सोय नाही, ती आपली मूल्यप्रणाली असली पाहिजे, भारत युद्धात नव्हे,
तर संवादात विश्वास ठेवतो, असं सांगून मोदी यांनी,
गांधी-विवेकानंद-गौतम बुद्धांच्या भारताची भूमिका अधोरेखित केली.
****
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा
इथे सुरू असलेल्या तेल भेसळीप्रकरणी संबंधित कारखाना तातडीने बंद करून संबंधित अन्न
आणि औषध प्रशासन सह आयुक्त तसेच सहाय्यक आयुक्त यांना निलंबित करण्याची घोषणा या विभागाचे
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. याबाबतचा मूळ प्रश्न आमश्या पाडवी यांनी उपस्थित केला
होता, त्यावर
समीर कुणावार यांनी उपप्रश्न विचारले.
विधानसभेत आज छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातल्या गंगापूरचे माजी आमदार अशोक पाटील डोणगावकर आणि बागलाण विधानसभा मतदारसंघाचे
माजी आमदार लहानु अहिरे यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. सभागृहाने दिवंगत
सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या वतीने उद्या सरन्यायाधीश
भूषण गवई यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती,
विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिली.
****
श्री अमरनाथ यात्रेसाठी जम्मूतील
भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्प इथून आज सकाळी आठ हजार ६५० भाविकांची सहावी तुकडी
रवाना झाली. यापैकी ३ हजार ४८६ भाविक बालटाल मार्गाने आणि ५ हजार ११९ भाविक पहलगाम
मार्गाने पवित्र गुहेत जातील. यंदा या यात्रेदरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात
आली आहे.
****
मुंबई सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय
विमानतळावर जप्तीच्या तीन मोठ्या प्रकरणांमध्ये चार जणांना अटक केली. जप्तीमध्ये गांजा,
तस्करी केलेले जीवंत आणि मृत वन्यजीव, आणि सोने
यांचा समावेश असून, याची एकत्रित किंमत ११ कोटी रुपयांहून अधिक
आहे. सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून
सुमारे नऊ किलो गांजा, तर दुसऱ्या प्रवाशाकडून
तीन प्रजातींचे ३० जीवंत तर १४ मृत वन्यजीवांचे नमुने आढळले. तर तिसऱ्या घटनेत दुबईहून येणाऱ्या दोन प्रवाशांकडून सुमारे दीड
किलो सोनं जप्त करण्यात आलं.
****
राज्यात अनेक भागांत जोरदार पाऊस
सुरु असून, अनेक
धरणांमध्ये पाणी पातळीत वाढ होत आहे. पालघर, कोल्हापूर,
नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये विशेषत: पावसामुळे सावधगिरीचे उपाय
करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यात संततधार पावसामुळे धामणी धरणाचे पाच दरवाजे उघडले
गेले असून, कवडास धरणातूनही विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातल्या शाळांना
आज सुटी जाहीर करण्यात आली असून, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा
इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातलं राधानगरी
धरण ७७ टक्के भरलं आहे. वेदगंगा आणि दुधगंगा नद्यांच्या पातळीतही वाढ झाली असून, शेतांमध्ये पाणी घुसल्याचं वृत्त आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यातही पावसाची
संततधार सुरूच असल्यानं गंगापूर धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर इथला
दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या दहा ते पंधरा पर्यटकांना याच परिसरात पावसामुळे
अडकून राहावं लागलं; मात्र
जिल्हा प्रशासनाने त्यांची सुरक्षित सुटका केली. त्रंबकेश्वर तालुक्यातल्या तळवाडे
इथं तलावात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या
जायकवाडी धरणात पाणीसाठा ५२ टक्क्याच्या वर हेला आहे. धरणात सध्या २४ हजार १९२ घनफूट
प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरु आहे.
****
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या निळवंडे
धरणातून आज सहा हजार ५७० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात
येत आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेता पुढील काही तासांत विसर्ग टप्याटप्याने वाढण्याची
शक्यता असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे प्रवरा
नदीपात्रात पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा
इशारा देण्यात आला आहे.
****
धुळे जिल्ह्यात पांझरा नदीच्या पाणलोट
क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसंच अक्कलपाडा प्रकल्पाच्या वरील बाजूस असणाऱ्या
पांझरा, मालनगाव
आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा
येवा वाढत आहे. त्या अनुषंगाने पांझरा नदी वरील निम्न पांझरा मध्यम प्रकल्पातून पाच
हजार २३० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे.
****
मुंबई शहराची तहान भागवणारं वैतरणा
धरण ९५ टक्के भरलं असून, धरणातून
विसर्ग सुरू आहे. राज्यभरात पावसाची ही संततधार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने
वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment