Monday, 7 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.07.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 07 July 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि जागतिक कल्याणासाठी ब्रिक्सची भूमिका महत्त्वपूर्ण- पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      पुढील पाच वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयात ७५ हजार जागा वाढवण्याचं उद्दीष्ट - आरोग्यमंत्री नड्डा यांची माहिती

·      आषाढी एकादशी राज्यात उत्साहात संपन्न, लाखो वारकऱ्यांनी घेतलं विठ्ठल-रुख्मिणीचं दर्शन

·      बर्मिंगहॅम कसोटीत भारताचा इंग्लंडवर ३३६ धावांनी विजय, पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी

आणि

·      मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता, जायकवाडीत ५० टक्क्याच्या वर जलसाठा 

****

आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि जागतिक कल्याणासाठी ब्रिक्सची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज ब्राझीलमधल्या रिओ दी जानेरिओ इथं, १७ व्या ब्रिक्स परिषदेत आयोजित संपर्क सत्रात बोलत होते. पंतप्रधानांनी न्यू डेवलपमेंट बँकेकडून सदस्य राष्ट्रांच्या मागणीनूसार लवचिक दृष्टिकोन आणि दीर्घकालीन आर्थिक स्थिरतेचा उल्लेख केला. पुढील वर्षी भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या “एआई प्रभाव शिखर परिषदेसाठी” ब्रिक्स सदस्य राष्ट्रांना सहभागी होण्याचं मोदी यांनी आमंत्रण दिलं.

****

देशाच्या आर्थिक विकासात सहकारी संस्थांचं योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार मंत्रालयाला चार वर्ष झाल्याबद्दल गुजरातमध्ये आणंद इथं अमूल आणि राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था, सहकारिता विद्यापीठ, अन्नधान्य उत्पादन आणि विक्रीशी संबंधित तसंच दुग्धव्यवसायाशी संबंधित तीन सहकारी संस्था एकत्रितपणे देशाच्या सहकारी चळवळीला अधिक बळकटी देतील, असं ते म्हणाले.

****

येत्या पाच वर्षांत ७५ हजार वैद्यकीय जागा वाढवण्याचं केंद्र सरकारचं उद्दीष्ट असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. दिल्लीत काल बाराशेहून अधिक नर्सिंग अधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचं वाटप त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ३८७ वरून ७८० झाली असून, वैद्यकीय जागांची संख्या ५१ हजारांवरून १ लाख १८ हजारांवर पोहचली असल्याचं त्यांनी सांगितलं. माता मृत्युदर एक लाख प्रसुतीमागे १३० वरून ८८ पर्यंत कमी झाला असून, बाल मृत्युदर प्रति एक हजार मुलांमागे ३९ वरून २६ पर्यंत खाली आला असल्याचं नड्डा यांनी सांगितलं.

****

आषाढी एकादशीचा सोहळा काल राज्यभरात भक्तिभावाने साजरा झाला. पंढरपूर इथं लाखो भाविकांनी श्री विठ्ठल रुख्मिणीचं दर्शन घेतलं.

पंढरपूर शहरात पालिकेनं स्वच्छतेच्या दृष्टीनं साडे सोळाशे कर्मचारी नियुक्त केले आहेत. याठिकाणी वारकरी तसंच भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिर्डीत श्री साईबाबा संस्थानतर्फे आषाढी एकादशीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

****

मराठवाड्यातही सर्वत्र आषाढी एकादशीचा उत्साह दिसून आला. ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती. याबाबतचा हा वृत्तांत,

छत्रपती संभाजीनगर नजीकच्या प्रतिपंढरपूर इथं श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात काल सकाळपासूनच असंख्य भाविकांची दर्शनासाठी मोठी रिघ लागली होती. दुपारपर्यंत दिंड्या आणि पालख्यांनी मंदिर परिसर गजबजून गेला होता. दर्शनासाठी पारंपारिक वेषात पायी आलेल्या अबावृद्धांचा रिमझीम पावसातही उत्साह दिसून आला. तसंच या मार्गावर सेवाभावी संस्थांनी पिण्याचं पाणी- फराळ आदींची व्यवस्थाही केली होती. शहरात झालेल्या भक्तिगीत गायन कार्यक्रमांनाही काल नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

पैठण इथ संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी काल हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

हिंगोली जिल्ह्यातल्या संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचं जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव इथं भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. काल पहाटे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते शासकीय पूजा झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं.

हिंगोली शहरात पतंजली योग समितीतर्फे योगदिंडी काढण्यात आली, तर कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तुकाराम इथं संत तुकामाईच्या दर्शनासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

परभणी शहरातल्या रामकृष्ण नगरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात ११ हजार १११ दिवे प्रज्वलीत करून विठ्ठल-रुक्मिणीची ११ हजार १११ चौरस फूट आकारत कलाकृती साकारण्यात आली होती.

मानवत रोड इथं जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त "वृक्ष दिंडी" हा पर्यावरणपूरक उपक्रम पार पडला.

जालना इथं श्री आनंदी स्वामींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. तर बीड इथं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बालरंगभूमी परिषद आणि केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालयातला संगीत विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली.

****

अशूरा-ए-मुहर्रम काल पाळण्यात आला. प्रेषित मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, सत्य आणि न्यायासाठी करबाला इथं दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून, हा दिवस पाळला जातो. मोहरमच्या दिवशी काल ठिकठिकाणी ताजिया मिरवणूक काढून, मजलिसचं आयोजन करण्यात आलं होतं.

****

आपण कोण आहोत, हे समजून घेऊन, आपल्याला काय घडवायचं आहे, ते ठरवणं, हाच महाराष्ट्रधर्म असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ‘महाराष्ट्रधर्म’ या विशेष पॉडकास्ट मालिकेच्या पहिल्या भागात ते बोलत होते. या पहिल्याच पॉडकास्टमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची पायाभरणी आणि उभारणीच्या अनुषंगानं मांडणी केली. फडणवीस यांनी २०१४ ते १९ या आपल्या पहिल्या कार्यकाळात ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा दूरचित्रवाणीवर कार्यक्रम केला होता. आता नवमाध्यमात लोकप्रिय अशा पॉडकास्टच्या माध्यमातून ते नागरीकांशी संवाद साधणार आहेत.

****

क्रिकेट

अँडरसन - तेंडुलकर चषक कसोटी मालिकेत बर्मिंगहॅम इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं इंग्लंडवर ३३६ धावांनी विजय मिळवला. विजयासाठी ६०८ धावांचा पाठलाग करताना यजमान इंग्लंडचा दुसरा डाव २७१ धावांत संपुष्टात आला. आकाशदीपनं सहा बळी घेतले. सामन्यात मोहम्मद सिराजनं सात तर आकाशदीपनं १० गडी बाद केले. सामन्यात ४३० धावा करणारा कर्णधार शुभमन गिल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयाबरोबरच भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत एक - एक अशी बरोबरी साधली आहे. तिसरा कसोटी सामना लॉर्डसच्या मैदानावर १० तारखेपासून खेळवण्यात येणार आहे.

****

नाशिक इथं आयोजित सातव्या चाईल्ड कप तलवारबाजी स्पर्धेत मुलांच्या सेबर प्रकारात महाराष्ट्राच्या श्रीराज पोळ यानं सुवर्णपदक पटकावलं. काल झालेल्या अंतिम लढतीत त्यानं तामिळनाडूच्या ए. एस. जोसेफ याचा ११-८ असा पराभव केला. याच प्रकारात महाराष्ट्रच्याच अरोह जाधव आणि पंजाबच्या हेयांश गर्ग यांनी संयुक्तपणे कांस्य पदक जिंकलं. विविध राज्यांचे ३९० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

****

माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातल्या भरीव योगदानासाठी जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, अभिनेते संदीप पाठक, पत्रकार राहुल कुलकर्णी आणि पोटविकार तज्ज्ञ डॉ. नितीन जोशी यांना स्मृती पुरस्कार जाहीर झाले आहेत. येत्या १४ जुलै रोजी नांदेड इथं, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.

****

बैलजोडी नाही म्हणून स्वतःला औताला जुंपून शेती करणारे अहमदपूर तालुक्यातल्या हाडोळती इथले शेतकरी अंबादास पवार यांची आमदार अमित देशमुख यांनी काल भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करत सद्यस्थितीतील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण विधानसभेत काम करू, असं आश्वासन देशमुख यांनी दिलं.

****

प्रहार पक्षाच्या वतीनं आजपासून १४ जुलै पर्यंत 'सातबारा कोरा' पदयात्रा काढण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यातल्या पापळ ते यवतमाळ जिल्ह्यातल्या चिलगव्हाणपर्यंत १३८ किलोमीटर ही पदयात्रा असेल. ही यात्रा राजकीय नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी असल्याचं पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.

****

नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून, जिल्ह्यातल्या एकूण नऊ धरणांमधून विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणातून पाच हजार १८६, दारणा धरणातून नऊ हजार ९३२ आणि नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून ३१ हजार १३५ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या नाथसागर जलाशयाचा साठा आता पन्नास टक्क्याच्या वर पोहोचला आहे. जलाशयात सध्या १६ हजार २९५ घनफूट प्रती सेकंद वेगानं पाणी दाखल होत असल्यानं पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.

****

हवामान

येत्या दोन दिवसांत कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना आज आणि उद्या यलो अलर्ज जारी करण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment