Monday, 7 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.07.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 07 July 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ जूलै २०२ सकाळी.०० वाजता

****

ब्राझीलमध्ये रिओ द जेनेरिओ इथं सुरु असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत, ब्रिक्स राष्ट्रांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपली वचनबद्धता दर्शवली. यावेळी सर्व राष्ट्रांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. या परिषदेत शांतता आणि सुरक्षितता यावरील सत्राच्या सुरवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करुन दहशतवाद हा मानवतेवरचा घातक घाव असल्यांचं नमूद केलं. दहशतवादाचा निषेध ही केवळ सोय नाही, ती आपली मूल्यप्रणाली असली पाहिजे, भारत युद्धात नव्हे, तर संवादात विश्वास ठेवतो, असं सांगून मोदी यांनी, गांधी-विवेकानंद-गौतम बुद्धांच्या भारताची भूमिका त्यांनी अधोरेखित केली.

****

पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर लाभदायक ठरेल, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल केलं. ऊसशेतीसाठी कृत्रिम तंत्रज्ञान या विषयावर नागपूरमध्ये एग्रोव्हीजन फाऊंडेशनने आयोजित केलेल्या विशेष कार्यशाळेत गडकरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

****

देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी काल मुंबईत गिरगाव इथल्या चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देऊन आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विषयांची समज अधिक पक्की होते, शिक्षणाबरोबरच संस्कारही रुजतात, हेच संस्कार आयुष्यभर साथ देतात, असा आत्मविश्वासही गवई यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

****

सावंतवाडी इथंलं संस्थानकालीन कारागृह दीडशे वर्षे जुनं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कारागृह पर्यटनाची संकल्पना राबवता येऊ शकेल, असं मत माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे. ते काल सावंतवाडी इथं पत्रकारांशी बोलत होते. काही दिवसापूर्वी या कारागृहाची भिंत कोसळल्यानं तूर्तास त्या ठिकाणी असलेल्या सर्व बंदीजनांना सिंधुदुर्गनगरी इथल्या कारागृहात हलवण्यात आलं आहे. तिथली जागा पुरेशी आहे. त्यामुळे डागडुजीनंतर पुढे हा सकारात्मक निर्णय घेता येऊ शकतो, अशी भूमिका केसरकर यांनी मांडली.

****

मुंबई सीमाशुल्क अधिकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्तीच्या तीन मोठ्या प्रकरणांमध्ये चार जणांना अटक केली. जप्तीमध्ये गांजा, तस्करी केलेले जीवंत आणि मृत वन्यजीव, आणि सोने यांचा समावेश असून, याची एकत्रित किंमत ११ कोटी रुपयांहून अधिक आहे. सीमा शुल्क अधिकार्यांनी बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून सुमारे नऊ किलो गांजा, तर दुसर्या प्रवाशाकडून तीन प्रजातींचे ३० जीवंत तर चार १४ मृत वन्यजीवांचे नमुने आढळले. तर तिसर्या घटनेत दुबईहून येणाऱ्या दोन प्रवाशांकडून सुमारे दीड किलो सोनं जप्त करण्यात आलं.

****

कजाकीस्तानमधे अस्ताना इथं सुरु असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या साक्षी चौधरीनं काल महिलांच्या ५४ किलो गटात सुवर्णपदक पटकावलं. अंतिम सामन्यात तिनं अमेरिकेच्या योसेलीन पेरेसवर ५-० असा निर्विवाद विजय नोंदवला.

****

बीजिंगमध्ये झालेल्या आशियाई पॅरा-तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या हरविंदर सिंग यानं वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने थायलंडच्या खेळाडूचा ७-१ असा पराभव केला.

****

पालघर जिल्ह्यात अनेक भागांत संततधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाचही दरवाजे काल उघडण्यात आले. धामणी आणि कवडास या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरूच असल्यानं गंगापूर धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर इथला दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या दहा ते पंधरा पर्यटकांना याच परिसरात पावसामुळे अडकून राहावं लागलं; मात्र जिल्हा प्रशासनाने त्यांची सुरक्षित सुटका केली. त्रंबकेश्वर तालुक्यातल्या तळवाडे इथं तलावात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात पाणीसाठा ५२ टक्क्याच्या वर हेला आहे. धरणात सध्या २४ हजार १९२ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरु आहे.

****

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या निळवंडे धरणातून आज सहा हजार ५७० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेता पुढील काही तासांत विसर्ग टप्याटप्याने वाढण्याची शक्यता असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे प्रवरा नदीपात्रात पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

****

धुळे जिल्ह्यात पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसंच अक्कलपाडा प्रकल्पाच्या वरील बाजूस असणाऱ्या पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा येवा वाढत आहे.

****

No comments:

Post a Comment