Tuesday, 8 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08 जूलै २०२५ रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 08 July 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०८ जूलै २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      राज्य विधान भवनात सरन्यायाधीशांचा सत्कार;घटनादुरुस्ती करून राज्यघटनेच्या मूळ गाभ्याला धक्का लावता येत नाही-उत्तराच्या भाषणात सरन्यायाधीशांचा पुनरुच्चार

·      शासन अनुदानित अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीला मुख्यमंत्र्यांची मान्यता

·      पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८० वा वर्धापन दिन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा

आणि

·      जायकवाडी धरणातला पाणीसाठा सुमारे साठ टक्क्यांवर

****

घटनादुरुस्ती करून राज्यघटनेच्या मूळ गाभ्याला धक्का लावता येत नाही याचा पुनरुच्चार  सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केला आहे. आज मुंबईत विधानभवनात सरन्यायाधीशांचा सत्कार करण्यात आला, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष विधीज्ञ राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच अजित पवार, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरन्यायाधीशांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर बोलतांना सरन्यायाधीशांनी भारतीय राज्यघटना या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं. विधीपालिका, न्यायपालिका आणि कार्यपालिकांनी राज्यघटनेच्या मर्यादेत काम केल्यास, कोणत्याही संस्थेत मतभेदाची स्थिती निर्माण होणार नाही, असं सरन्यायाधीशांनी नमूद केलं. ते म्हणाले

बाईट - सरन्यायाधीश भूषण गवई

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलेल्या भाषणात सरन्यायाधीशांच्या कामकाजाच्या पद्धतीसोबतच त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचा उल्लेख केला. ते म्हणाले-

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केलेल्या भाषणात, राज्यघटनेचं महत्त्व आणि विविध पैलू सरन्यायाधीशांनी समजावून सांगणं ही घटना भारतीय लोकशाहीला बळकट करणारी असून, ही बाब विधिमंडळाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल, असं प्रतिपादन केलं, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात, फक्त न्यायमूर्ती म्हणून नव्हे तर, आदर्श नागरिक आणि संवेदनशील प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेल्या सरन्यायाधीशांचं कार्यकर्तृत्व, दीपस्तंभासारखं असल्याचं, नमूद केलं.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी बोलतांना, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी भूषण गवई यांची निवड म्हणजे, ‘दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझाया उक्तीवर शिक्कामोर्तब झाल्याची भावना व्यक्त केली.

****

शासन अनुदानित अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरती करण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. सार्वजनिक ग्रंथालय अनुदानात ४० टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून, हा प्रस्ताव तातडीने वित्त विभागाकडे पाठवावा, अशा सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या.

****

विकसित महाराष्ट्र- २०४७सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी विधानसभेतल्या सर्व सदस्यांनी, तसंच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यांनी नागरिकांना प्रोत्साहित करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे केलं.

यासंदर्भात राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण १८ जून ते १७ जुलै, या कालावधीत घेण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ बाबत आपली मतं नोंदवावीत, असं आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं.

****

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग आणि महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याबाबतची विधेयकं तसंच महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश आणि शुल्क विनियमन सुधारणा हे विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आली.

****

पुढच्या वर्षीच्या हज यात्रेसाठी अर्जप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासाठी हज पोर्टल किंवा हज सुविधा मोबाईल ॲपवरून इच्छुकांना अर्ज करता येणार आहे. ३१ जुलैपर्यंत ही सुविधा सुरू राहणार आहे.

****

अनुसूचित जातीतल्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आता गुणवत्तेवर प्रवेश तसंच नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न करावा आणि आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतल्या अधिक गरजू युवकांना घेऊ द्यावा, असं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८०वा वर्धापन दिन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईत साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसंच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासह विविध क्षेत्रातल्या वीस कर्तृत्ववान व्यक्तींना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले.

****

राज्याच्या बहुतांश भागात आज पाऊस होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नद्यानाल्यांना पूर आल्यानं जिल्ह्यातल्या सोळा मार्गांवरची वाहतूक बंद झाली आहे. भंडारा जिल्ह्यात ४० पैकी ३८ मंडळात अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून, जिल्ह्यातल्या शाळांना आज आणि उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात अनेक ठिकाणी आज पावसाची संततधार सुरू आहे.

जायकवाडी धरणात सध्या अठ्ठेचाळीस हजार आठशे एकोणनव्वद घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून, धरणातला पाणीसाठा साठ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.

दरम्यान, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या काळात ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

****

नजिकच्या काळात येणारे विविध धार्मिक सण आणि उत्सवांच्या कालावधीत अन्न सुरक्षा मानकांचं पालन होत आहे किंवा नाही याबाबत खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालकांकडे काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. आज यासंदर्भात झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत ते बोलत होते. शाळा आणि महाविद्यालय परिसरात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांचीही तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

****

जालना जिल्ह्यात पोकरा योजनेत झालेल्या अनियमिततेच्या प्रकरणाची चौकशी येत्या पंधरा दिवसात पूर्ण होणार असून, त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. ते आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या शाळांमधल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज करण्यात आलेल्या शाळा बंदच्या आवाहनाला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. विविध शिक्षक संघटना आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या वतीने धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं.

****

बोगस खतांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी लातूर इथल्या कृषी सहसंचालक कार्यालयात आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं घंटानाद आंदोलन करण्यात आलं. या प्रकरणी कृषी सहसंचालकांना निवेदन देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक मॉडेल सौर ग्राम निर्माण करण्यासाठी सुरू केलेल्या स्पर्धेत राज्यातल्या सहा जिल्ह्यातल्या ६३ गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या सहा गावांचा समावेश आहे. या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या गावाला केंद्र सरकारकडून एक कोटी रुपयांचं अनुदान मिळणार आहे.

****

राज्यातलं केळी पीक अधिक दर्जेदार, रोगमुक्त आणि निर्यातयोग्य करण्यासाठी केंद्र शासनानं टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय पथकानं यासाठी नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या मौजे खुजडा इथे नुकतीच प्रस्तावित जागेची पाहणी केली. नांदेडसह जालना आणि जळगाव जिल्ह्यांचाही यासाठी विचार करण्यात येत असून, यापैकी एका ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

****

No comments:

Post a Comment