Tuesday, 8 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.07.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 08 July 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

न्यायमूर्ती भूषण गवई यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव विधानसभेनं संमत केला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा प्रस्ताव मांडला.

न्यायमूर्ती गवई यांचा सत्कार आज विधिमंडळाच्या वतीने होणार आहे. विधानसभा विरोधी पक्षनेत्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नसल्यानं या कार्यक्रम पत्रिकेत विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याचा उल्लेख नसल्याचा मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा उपस्थित केला. यावर, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, नवीन विधानसभेच्या स्थापनेनंतर विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठीचा प्रस्ताव यायला चार महिने लागले, त्यावर निर्णय घ्यायला सुमारे तीन महिने लागणं ही काही मोठी बाब नाही, असं मत व्यक्त केलं. यावर विरोधकांनी गदारोळ केला.

तत्पूर्वी आज सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यावरही विधानसभेत विरोधी पक्षनेता नसल्याचा मुद्दा उपस्थित करुन विरोधकांनी सभात्याग केला होता.

****

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी आल्या, मात्र आत्तापर्यंत पाच लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचं महाविद्यालय मिळालं असून, कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित होणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत दिली. आमदार अभिमन्यू पवार यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर आमदार नारायण कुचे यांनी मांडलेल्या मुद्याला ते उत्तर देत होते. आमदार शेखर निकम यांनी शिक्षकांची संचमान्यता रद्द होऊन अनेक शाळा बंद होण्याची भीती व्यक्त केली, यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असंही दादा भुसे यांनी सांगितलं.

****

राज्यात झॉमेटो, स्विगी अशा फ्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या गिग वर्कर्सची संख्या भविष्यात वाढणार असून, त्यांच्यासाठी प्रस्तावित असलेल्या स्वतंत्र कायद्याच्या मसूद्यावर सध्या काम सुरू असल्याचं, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. या कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.

****

ठाणे जिल्ह्यात मीरा भाईंदर इथं हिंदी भाषिक व्यापाऱ्यांच्या मोर्चानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी एकीकरण समिती यांच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र मोर्चा मार्गाचा आंदोलकांनी धरलेला आग्रह कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु शकत होता म्हणून पोलीसांनी परवानगी नाकारली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते आज विधानभवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणं योग्य नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

दरम्यान, पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मोर्चेकरी जमा झाले असून, पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

केंद्रीय गृह मंत्रालयातलं संपूर्ण कामकाज सध्या हिंदी भाषेत होत असून, यानंतर मराठी भाषेतल्या पत्रांना मराठी भाषेतूनच उत्तर दिलं जाईल तसंच उत्तरासोबत हिंदी अनुवाद दिला जाईल असं, संसदीय राजभाषा समितीचे निमंत्रक खासदार डॉक्टर दिनेश शर्मा यांनी सांगितलं आहे. मुंबईत राजभवनात संसदीय राजभाषा समितीच्या नऊ सदस्यांनी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची आज भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या प्रादेशिक भाषांना चालना देणं, तसंच हिंदी भाषेला सहयोगी भाषाम्हणून प्रस्थापित करणं, या उद्देशानं समिती काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

मराठवाडा साहित्य परिषदेच्या उदगीर शाखेच्या कार्यकारिणीची निवडणूक बिनविरोध झाली. यात अध्यक्षपदी धनंजय गुडसूरकर यांची तर सचिवपदी रामदास केदार यांची निवड करण्यात आली. मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांच्या उपस्थितीत झालेल्या या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जयद्रथ जाधव यांनी काम पाहिलं.

****

लातूर जिल्ह्यात परवा १० तारखेला वृक्षारोपण मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होवून आपल्या घराच्या परिसरात, गावात वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करावी, असं आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांनी केलं आहे. या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.

****

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उद्या नऊ तारखेला राज्यव्यापी एक दिवसीय संप पुकारला आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या मुख्य कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

****

No comments:

Post a Comment