Tuesday, 8 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.07.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 08 July 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यात लवकरच शासकीय नोकरीत मेगाभरतीची मुख्यमंत्र्यांची विधीमंडळात घोषणा

·      गृह तसंच मराठी भाषा विभागासह आठ विभागांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर

·      सार्वजनिक वितरण व्यवस्थेतल्या कथित तांदूळ भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीचे विधानसभा अध्यक्षांचे आदेश

·      छत्रपती संभाजीनगर इथला 'श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्कार' अंबाजोगाईचे अभिजित जोंधळे यांना जाहीर

आणि

·      मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी, जायकवाडीत ५ टक्क्याच्या वर पाणीसाठा

****

राज्यात लवकरच शासकीय नोकरीत मेगाभरतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात बोलतांना त्यांनी, राज्य सरकारने ७० हजार जागांची भरती जाहीर केली होती, ही संख्या आता एक लाखावर पोहोचल्याची माहिती दिली. दीडशे दिवसांच्या कार्यकाळात जुन्या आकृतीबंधात सुधारणा करण्याचे निर्देश दिले असून, ही प्रक्रिया पूर्ण झाली की, भरती प्रक्रिया जलद पूर्ण केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

नवीन भरती प्रक्रियेमध्ये अनुसूचित जमातीची बिंदूनामावलीतील सर्व पदं भरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जात प्रमाणपत्र वैधतेची पद्धत अधिक पारदर्शक आणि जलद करणार असल्याचंही ते म्हणाले. रिक्त झालेली अनुसूचित जमातींची पदभरती सुरू असून, आदिवासी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली, ते म्हणाले..

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

**

या अधिवेशनात मांडलेल्या पुरवणी मागण्यांपैकी विविध विभागांच्या पुरवणी मागण्या, काल झालेल्या चर्चेनंतर विधानसभेनं संमत केल्या. यात गृह विभागाच्या ४२१ कोटी ७२ लाख, कृषी विभागाच्या १३२ कोटी ३३ लाख, पशुसंवर्धन विभागाच्या १५ कोटी २० लाख, दुग्धव्यवसाय विभागाच्या ६६ कोटी ४२ लाख, मत्स्यव्यवसाय विभागाच्या १५ कोटी ४१ लाख, उद्योग विभागाच्या ८८ कोटी ६१ लाख, ऊर्जा विभागाच्या ४७ कोटी ६८ लाख, कामगार आणि खनिकर्म विभागाच्या दोन कोटी ७३ लाख, तर मराठी भाषा विभागाच्या ४५ लाख ७४ हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहानं आवाजी मतदानानं मंजूर केल्या. तत्पूर्वी संबंधित खात्यांच्या मंत्र्यांनी पुरवणी मागण्यांवर झालेल्या चर्चेला उत्तर दिलं.

**

राज्यात सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेतल्या तांदळाच्या खरेदी आणि वितरणात भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपाची चौकशी करून, अधिवेशन संपण्यापूर्वी तो अहवाल सादर करावा, असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. काँग्रेसचे नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी हा आरोप केला होता, त्यावरच्या प्रश्नादरम्यान अध्यक्षांनी हे आदेश दिले.

शासकीय रुग्णालयांमध्ये औषध खरेदीसाठी स्थानिक प्रशासनाला एकूण अर्थसंकल्प तरतुदीच्या ३० टक्क्यापर्यंत औषध खरेदीचे अधिकार दिल्याचं, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. औषधं तातडीनं उपलब्ध व्हावीत यासाठी हे अधिकार दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

**

छत्रपती संभाजीनगर इथल्या विट्स हॉटेल निविदा प्रकरणात विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल लक्षवेधी सूचना मांडली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्यामुळे या प्रकरणी दाखल लक्षवेधी सूचनेला अर्थ नसल्याचं सांगितलं. मात्र त्यावरही विरोधकांचं समाधान न झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची सदनाला ग्वाही दिली.

**

लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी शेतकरी कर्जमाफी तसंच शेतमालाला हमीभाव या मागणीकडे विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. दिल्लीकडे जाणाऱ्या महामार्गावर लातूर इथं ट्रक टर्मिनल उभारण्याची मागणी त्यांनी केली. वीजेचे वाढीव दर, स्मार्ट मीटर, कामगारांचे प्रश्न तसंच शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दाही देशमुख यांनी सदनासमोर मांडला. ते म्हणाले...

बाईट – अमित देशमुख

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या मौजे लासूर शाळा बांधकाम, आणि मौजे गुरुधानोरा इथल्या, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकाम प्रकरणी, संबंधित शाखा अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना निलंबित करण्यात आलं आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या' संडे क्लब' आणि देशपांडे परिवाराच्या वतीनं दिला जाणारा, 'श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्कार', बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईचे अभिजित जोंधळे यांना जाहीर झाला आहे. अकरा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून, तीन ऑगस्टला हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. अंबाजोगाईत अनुराग पुस्तकालय चालवणारे जोंधळे यांनी गेल्या दहा वर्षांपासून 'पुस्तकपेटी' हा अभिनव उपक्रम राबवला आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातल्या किमान १५ हजार विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या विद्यादीप बालगृहातून मुली निघून गेल्याच्या घटनेची, राष्ट्रीय महिला आयोगानं दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून, या प्रकरणी चौकशीचे तसंच दोषींवर कारवाईचे निर्देश दिले. ३० जून रोजी या मुली बालगृहातून निघून गेल्या होत्या, त्यापैकी ८ मुली सापडल्या आहेत.

****

परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्याल्या ४१ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. यासंदर्भात गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी, अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यानुसार या संस्थांना नोटीस देऊनही साठ दिवसात समाधानकारक उत्तर न आल्यानं ही कारवाई करण्यात आली.

****

धाराशिव जिल्ह्यात एक जुलैपासून "९० दिवस राष्ट्रासाठी मध्यस्थी", ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून कौटुंबिक वाद, ग्राहक तक्रारी, कर्जवसुली, यासारखी प्रकरणं, विशेष प्रशिक्षितांच्या मध्यस्थीद्वारे सोडवण्यात येत आहेत. प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा जलद निपटारा करणं आणि न्यायप्रक्रियेवरील ताण कमी करणं, या उद्देशानं ही मोहिम राबवली जात आहे.

****

राज्यातले अशंतः अनुदानित शिक्षक आजपासून दोन दिवस राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करणार आहेत. अंशतः अनुदानित शाळांना लागणाऱ्या निधीची तरतूद राज्यसरकारने पुरवणी मागण्यांमध्ये न केल्यामुळे हा बंद पाळण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातून अनेक शिक्षक मुंबईकडे रवाना झाले आहेत.

****

जालना जिल्ह्यात अंबड शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ पाचोड रोडवर, मालवाहू ट्रक आणि दुचाकी अपघातात ट्रकखाली चिरडल्यानं आजीसह दीड वर्षाचा नातवाचा जागीच मृत्यू झाला. काल सायंकाळी हा अपघात झाला. मृत दोघे जण पैठण तालुक्यातल्या दावलवाडी इथले रहिवासी आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इथं काल जळगाव रस्त्यावरची सुमारे अडीचशे अतिक्रमणं काढून टाकण्यात आली. दरम्यान, अतिक्रमणं काढलेल्या जालना रस्त्याच्या रुंदीकरणाची तयारी झाली आहे. या भागात सर्व्हिस रोडसाठी मोजणीचं काम हाती घेतलं असल्याची माहिती, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी अमित भामरे यांनी दिली.

****

नांदेड शहरासह भोकर, वसमत आणि तेलंगणा राज्यात चोरीच्या मोटारसायकल आणि पिस्तूल वापरून, घरफोडी, दुचाकी चोरी तसंच महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या, आंतरराज्यीय टोळीला, नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलं आहे. या टोळीतल्या सात जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून वेगवेगळ्या घटनेतला सहा लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती, नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली.

****

बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे घराची पडझड होऊन काही झाडं उन्मळून पडली, तसंच घर आणि गोठ्यांवरचे पत्रे उडाले.

नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असल्यानं, धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात, ४३ हजार ८८२ घनफूट प्रति सेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा ५ टक्क्यांच्या वर गेला आहे.

दरम्यान, मराठवाड्यात छत्रपती संभाजीगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान विभागानं वर्तवली आहे.

**** 

No comments:

Post a Comment