Tuesday, 8 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.07.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 08 July 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ जूलै २०२ सकाळी .०० वाजता

****

ब्रिक्स परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्राझिलियामध्ये दाखल झाले. ब्राझीलचे राष्ट्रपती लुइझ इनासियोलुला दा सिल्वा यांच्यासोबत ते आज व्यापार, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य आदी विविध मुद्यांवर चर्चा करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नामिबियाच्या दौर्यावर रवाना होतील.

****

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी आल्या, मात्र आत्तापर्यंत पाच लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचं महाविद्यालय मिळालं असून, कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित होणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत दिली. आमदार अभिमन्यू पवार यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर आमदार नारायण कुचे यांनी मांडलेल्या मुद्द्याला ते उत्तर देत होते. मूळ लक्षवेधीवर बोलताना, राज्यातल्या वस्तीशाळांमधल्या शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा दर्जा देऊन सेवेत कायम करताना नियमानुसार निवृत्तीवेतन लागू केलं आहे, मात्र त्यांच्या समस्यांबद्दल बैठक घेऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं. आमदार शेखर निकम यांनी शिक्षकांची संचमान्यता रद्द होऊन अनेक शाळा बंद होण्याची भीती व्यक्त केली. यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असं मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं.

****

मोठ्या प्रमाणावर कांदा उत्त्पन्न घेणाऱ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडून केंद्र शासनानं थेट कांदा खरेदी करावा, अशी मागणी पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी, काल केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केली. देशातल्या एकंदर कांदा उत्पादनात ५५ टक्के वाटा उचलणाऱ्या राज्यातल्या नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांना यावर्षी मे महिन्यातील अनियमित पावसामुळे जबरदस्त फटका बसला आहे. कांद्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणं कठीण झालं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

कोणत्याही खासदारांना मराठी माणसाच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार नाही, असं निवेदन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत

दिलं. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर ते बोलत होते. कायद्याच्या चौकटीत राहून आपलं मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे, देशाच्या जीडीपीतलं मराठी माणसाचं योगदान काय आहे, याची माहिती त्या खासदारांनी घ्यावी, असा सल्ला शेलार यांनी दिला.

****

महाराष्ट्रानं दूध उत्पादनात सहकाराच्या माध्यमातून अमूल, मदर डेअरी प्रमाणे दुधाचा सामायिक ब्रँड निर्माण करावा, अशी सूचना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केली. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष तसंच सहकार मंत्रालय स्थापना दिनानिमित्त काल राजभवनात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सहकार यशस्वी झाला तरच विकास सर्वसमावेशक होईल, असंही राज्यपाल म्हणाले.

****

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र विधान मंडळातर्फे आज विधानभवनात सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी गवई यांचं भारताची राज्यघटना या विषयावर व्याख्यान होणार आहे.

****

राज्यातले अशंतः अनुदानित शिक्षक आजपासून दोन दिवस राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करत आहेत. अंशतः अनुदानित शाळांना लागणाऱ्या निधीची तरतूद राज्यसरकारने पुरवणी मागण्यामध्ये न केल्यामुळे हा बंद पाळण्याचा निर्णय संघटनेनं घेतला आहे. बीड जिल्ह्यातून अनेक शिक्षक मुंबईकडे रवाना झाले आहेत.

****

ऑपरेशन सिंदूर दरम्यान शौर्य आणि स्वदेशात निर्मित उपकरणांच्या क्षमतांचं प्रदर्शन यामुळे आपल्या स्वदेशी उत्पादनांची मागणी जागतिक स्तरावर वाढली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत आयोजित संरक्षण लेखा विभागाच्या नियंत्रकांच्या परिषदेत बोलत होते. जग भारताच्या संरक्षण क्षेत्राकडे नव्या आदराने पाहत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

अमरनाथ यात्रा सुरळीत सुरु असून, काल २३ हजार ८५७ भाविकांनी दर्शन घेतलं. पहिल्या सहा दिवसात दर्शन घेणार्या यात्रेकरुंची संख्या ९३ हजारांहून अधिक झाली असून, आज ही संख्या एक लाखाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कडक सुरक्षा व्यवस्थेत काल जम्मूतल्या भगवती नगर तळावरुन सात हजार ५४१ यात्रेकरुंची सातवी तुकडी पुढील तळाकडे रवाना झाली. यापैकी तीन हजार ३२१ यात्रेकरु आज पहाटे बालटाल तळाकडे आणि चार हजार २२० पहलगाम तळाकडे रवाना झाले.

****

छत्तीसगडमधे काल सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी मारला गेला. त्याच्यावर आठ लाख रुपयांचं बक्षीस होतं. बस्तर विभागात बिजापूर जिल्ह्यातल्या नॅशनल पार्क भागात ही चकमक झाली.

****

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उद्या नऊ तारखेला राज्यव्यापी एक दिवसीय संप पुकारला आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या मुख्य कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

****

No comments:

Post a Comment