Wednesday, 9 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.07.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 09 July 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात आज नामिबिया मध्ये विंडहोक इथं पोहोचले. पारंपारिक गरबा नृत्य सादर करुन त्यांचं विमानतळावर स्वागत करण्यात आलं. नामिबिया हा महत्वपूर्ण आणि विश्वासार्ह आफ्रिकी भागीदार देश असून, या देशासोबत भारत द्विपक्षीय संबंधांना चालना देत असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

या दौऱ्यात पंतप्रधान मोदी नामिबियाचे अध्यक्ष नेतुम्बो नंदी नदैतवाह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच ते नामिबियाच्या संसदेत उपस्थितांना संबोधित करणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधानांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

****

विधान परिषदेत आज सकाळी घेण्यात आलेल्या विशेष सत्रात पुरवणी मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी शासनाच्या विविध योजनांसाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त निधीविषयीची मागणी आणि त्यावर चर्चा झाली. सदस्यांनी विविध विभागांतले खर्च, नियोजन आणि निधी वितरणाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत शासनाच्या आर्थिक धोरणांचा आढावा घेतला.

****

अनुदानित शाळांना टप्पा अनुदान वेळेवर मिळावं यासाठी शिक्षकांचं आंदोलन मुंबईत सुरू असून, यासंदर्भात मुख्यमंत्री स्तरावर चर्चा करुन तोडगा काढण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. याबाबतचा प्रश्न विजय देशमुख यांनी उपस्थित केला होता.

राज्यातल्या अल्पसंख्यक शाळांचा दर्जा मिळवण्यासाठी गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनुसार एक समिती स्थापन करून राज्यव्यापी तपासणी मोहीम राबवण्यात येईल अशी घोषणाही भुसे यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात केली.

****

बंदरं आणि लॉजिस्टिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल सोल्युशन यांच्यादरम्यान काल एक सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार नेदरलँड्स, डेन्मार्क आणि पोलंडमधल्या पतसंस्था १२० कोटी रूपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात करणार आहेत. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, बारामती, सिंधुदुर्ग, नागपूर आणि नाशिकमधल्या सहा निवडक ‘आय टी आय’ संस्थाचं आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. दरवर्षी पाच हजार ते सात हजार विद्यार्थ्यांना सागरी वाहतूक, बंदर व्यवस्थापन क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या कौशल्यांचं प्रशिक्षण मिळून रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करारप्रसंगी सांगितलं. या करारामुळे राज्यातल्या तरुणांना वाढवण बंदरच नाही, तर इतर ठिकाणीही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

****

गुरुपौर्णिमा उत्सव उद्या साजरा होणार आहे. यानिमित्त शिर्डी इथल्या साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाची सुरुवात झाली आज पहिल्या दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी आणि विणेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****

स्पेन मध्ये माद्रिद इथं झालेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात भारताच्या ॠषभ यादव आणि ज्योति सुरेखा वेन्नम यांच्या कामगिरीने भारताला पहिलं स्थान मिळवून दिलं. ॠषभनं ७१६ गुणांसह, तर ज्योतीनं ७१५ गुणांसह सर्वोच्च स्थान मिळवलं.

****

राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कायम आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. पैठण इथल्या जायकवाडी धरणात ५९ हजार २०१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, धरणाचा पाणीसाठा ६४ टक्क्यांच्या वर गेला आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विदर्भात जोरदार पाऊस सुरु असून, अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, जिल्हा प्रशासनाने आज शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.

नागपूर जिल्ह्यात धापेवाडा-पाटणसावंगी मार्गावरील चंद्रभागा, कोलार नदीच्या पुलांवरून पाणी वाहत असून, वाहतूक पूर्णतः बंद आहे. विरखंडी - आम नदीलाही पूर आला असून, निरव्हा-बारव्हा रस्ता बंद आहे. कामठी तालुक्यातल्या पांढुरणात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

वाशिम जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे.

गोंदिया जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत असून, काही गावांचा संपर्क तुटला आहे. भंडारा जिल्ह्याची जीवनदायी मानल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, गोसेखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत.

****

पावसाळ्यात पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात जलोत्सव हे विशेष अभियान सुरु करण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत, नागरिकांनी आपल्या घरात, परिसरात किंवा शेतीत तयार केलेल्या जनपुनर्भरण संरचनांचे २० ते ३० सेकंदांचे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करण्याचं आवाहन वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केलं आहे.

****

No comments:

Post a Comment