Wednesday, 9 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.07.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 09 July 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ जूलै २०२ सकाळी .०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात आज नामिबिया इथं पोहोचले. नामिबियाचे अध्यक्ष नेतुम्बो नंदी नदैतवाह यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करतील. पंतप्रधान मोदी नामिबियाच्या संसदेत उपस्थितांना संबोधित करणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधानांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. 

****

निष्क्रीय असलेली प्रधानमंत्री जनधन बँक खाती बंद करण्याचे कोणतेही निर्देश बँकांना दिलेले नाहीत, असं अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. वित्तीय सेवा विभागाने अशी खाती बंद करायला सांगितल्याची वृत्त माध्यमांमधून प्रसारित झाल्यानंतर मंत्रालयाने हे स्पष्टीकरण दिलं. निष्क्रीय जनधन खात्यांच्या संख्येवर मंत्रालयाची देखरेख असून संबंधित खातेदारांशी संपर्क साधून त्यांची खाती कार्यरत ठेवण्याचा सल्ला वेळोवेळी देण्यात येत असल्याचंही मंत्रालयाने म्हटलं आहे. जनधन योजना खाती, जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना आणि इतर कल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी तीन महिन्यांची मोहीम सुरू असल्याची माहिती देखील अर्थ मंत्रालयानं दिली आहे.

****

तान्ह्या बाळांसाठी आणि बालकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या जगातल्या पहिल्या हिवताप उपचारपद्धतीच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे. नोवार्टिस या फार्मा कंपनीला हिवतापावरच्या ‘कोआर्टेम’ नावाच्या नवीन औषधाला स्विस अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाली आहे. हिवतापामुळे मृत्यू पावणाऱ्यांमध्ये पाच वर्षांखालील मुलांचं प्रमाण अत्याधिक असल्यानं हे औषध विकसित होणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. हिवतापाच्या उपचारासाठी आतापर्यंत तान्ह्या बाळांना मोठ्या मुलांसाठीचं औषध दिलं जात होतं, ज्यामुळे त्यांना अनेक धोके संभवत होते.

****

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कला सेतू या रियल टाईम लँग्वेज टेक फॉर इंडिया चॅलेंजला सुरुवात केली. भारतातल्या आघाडीच्या एआय स्टार्टअप्सना अनेक भारतीय भाषांमधला मजकूर दृकश्राव्य अथवा ग्राफिकच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी ॲप्लिकेशन विकसित करण्याचं आव्हान या उपक्रमात ठेवण्यात आलं आहे. लेखी साहित्यापासून व्हिडीओ, ग्राफिक्स आणि ऑडिओ निर्मितीवर या उपक्रमात भर देण्यात आला आहे. या महिन्याच्या ३० तारखेपर्यंत डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट वेव्ह एक्स डॉट वेव्ह्ज बाझार डॉट कॉम (www.wavex.wavesbazaar.com) या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून नोंदणी करता येईल.

****

गुरुपौर्णिमा उत्सव उद्या साजरा होणार आहे. यानिमित्त शिर्डी इथल्या साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाची सुरुवात झाली असून आज पहिल्या दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी आणि विणेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****

यंदा आषाढी वारीतल्या गर्दीनं उच्चांक गाठला असून, पंढरपुरात एकादशीच्या दिवशी २७ लाखापेक्षा जास्त वारकरी दाखल झाल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे. यंदा ड्रोनच्या माध्यमातून एआय प्रणालीद्वारे जमलेल्या गर्दीचं विश्लेषण करण्यात आलं, त्यात ही माहिती स्पष्ट झाली आहे. यावर्षी प्रथमच व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आल्यामुळे पदस्पर्श दर्शनाचा कालावधी किमान पाच ते सहा तासांनी कमी झाला.

****

तुळजापूर पत्रकार संघ आणि जिल्हा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजापूर इथं तुळजापूर श्री या पत्रकारिता पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यावेळी जेष्ठ पत्रकार अंबादास पोफळे, किशोर कुलकर्णी, महिपत कदम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकारांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेण्यात आल्या.

****

स्पेन मध्ये माद्रिद इथं झालेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात भारताच्या ॠषभ यादव आणि ज्योति सुरेखा वेन्नम यांच्या कामगिरीने भारताला पहिलं स्थान मिळवून दिलं. ॠषभनं ७१६ गुणांसह, तर ज्योतीनं ७१५ गुणांसह सर्वोच्च स्थान मिळवलं.

****

राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कायम आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. पैठण इथल्या जायकवाडी धरणात ५७ हजार २४२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, धरणाचा पाणीसाठा सुमारे ६४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. 

वाशिम जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे.

गोंदिया जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत असून, काही गावांचा संपर्क तुटला आहे. भंडारा जिल्ह्याची जीवनदायी मानल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, गोसेखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत.

नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, जिल्हा प्रशासनाने आज शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहिर केली आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

पावसाळ्यात पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात "जलोत्सव" हे विशेष अभियान सुरु करण्यात आलं आहे.

****

 

 

No comments:

Post a Comment