Thursday, 10 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.07.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 10 July 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर एनडीपीएस कायद्यासोबतच मकोका अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या अंतर्गत कारवाई करण्यासंदर्भातलं विधेयक आज विधानपरिषदेत मांडण्यात येणार आहे. व्यावसायिक पातळीवर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मकोका लावण्याची तरतूद या अधिनियमात असून यामुळे अंमली पदार्थांची साखळी तोडण्यात मोठी मदत होईल, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी काल विधानसभेत दिली. हे विधेयक काल विधानसभेनं एकमताने मंजूर केलं, त्यावेळी ते बोलत होते. याबद्दल राज्याचं झिरो टोलरन्स धोरण असून अंमली पदार्थांची तस्करी प्रकरणात सहभागी असलेल्या पोलिसांवर थेट बडतर्फीची कारवाई करण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

****

राज्य सरकार आज महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मांडणार आहे. आजच्या दिवसाच्या कामकाजात याचा उल्लेख करण्यात आला आहे. यापूर्वी हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं होतं.

****

मुंबई आणि महाराष्ट्रात सगळ्यात पहिला हक्क हा मराठी माणसाचा आहे, तो हक्क डावलला जाणार नाही, अशी ग्वाही मंत्री शंभुराज देसाई यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी तारांकित प्रश्नांद्वारे हा मुद्दा उपस्थित केला होता. एखाद्या ठिकाणी मराठी माणसाला घर नाकारलं जात असेल तर त्या विकासकावर निश्चित कारवाई केली जाईल, असेही देसाई यांनी सांगितलं.

****

गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात येईल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत दिली. आमदार हेमंत रासने यांनी उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्द्याला ते उत्तर देत होते. या उत्सवात विविध अडथळे आणण्याचे, न्यायालयांमध्ये जाण्याचे सगळे प्रयत्न दूर करायला आपलं सरकार वचनबद्ध असून जितका हवा तितका निधी या उत्सवासाठी उपलब्ध करून देऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं.

****

प्रत्येक गावात वेगळं हवामान अंदाज केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज विधानसभेत दिली. यामुळे त्या गावाच्या आजूबाजूच्या वीस किलोमीटर परिसरातील हवामानाचा अंदाज त्यात दिसून येईल त्यातून फळ विमा योजनेला आवश्यक निकष लागू करणं सोपं होईल असं ते महणाले.

****

एक रुपयात विमा या योजनेत विमा कंपन्यांना सुमारे साडे सात हजार कोटी रुपयांचा नफा झाला आहे, त्या मानाने शेतकऱ्यांना हवा तसा लाभ मिळाला नाही त्यामुळे पुन्हा जुनी पीक विमा योजना राबवण्यात येत आहे अशी माहिती कोकाटे यांनी दिली. याबाबची लक्षवेधी सूचना राजेश विटेकर यांनी उपस्थित केली होती. जुन्या विमा योजनेमुळे साधारण पणे साडे चार ते पाच हजार कोटी रुपये वाचणार आहे, त्यातून सुमारे पंचवीस हजार कोटी रुपयांची कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

जालना जिल्ह्यात सन २०२२ ते २०२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीपोटी शेतकऱ्यांना देण्याच्या अनुदानात घोटाळा झाल्याचे आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे असून, सर्व संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचं आश्वासन कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी आज विधानसभेत दिलं. संतोष दानवे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. या घोटाळ्यात अपहार झालेली शासनाची रक्कम या दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारातून कापून घेतली जाईल, ती भरेपर्यंत त्यांना सेवेत पुन्हा घेतलं जाऊ नये, अशा सूचनाही देण्यात येतील, सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असंही जैस्वाल यांनी सांगितलं.

****

गुरुपौर्णिमा आज साजरी होत आहे. अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाणाऱ्या गुरुजनांच्या चरणी कृतज्ञतेचं वंदन करण्याचा हा दिवस आहे. या निमित्तानं सर्वत्र गुरुपूजनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिर्डीमध्ये श्री साईबाबा संस्थानचा उत्सव भक्तिभावात सुरू आहे. आज सकाळी श्री साई सच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. पारायण समाप्ती मिरवणूकीत शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांना समाज आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासनानं मिशन वात्सल्य हाती घेतलं असून, त्याअंतर्गत २९ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ३१ फिरती पथकं सुरू करण्यात येत आहेत. त्यासाठी आठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात एका फिरत्या पथकाद्वारे रेल्वे आणि बस स्थानक, आणि गर्दीच्या ठिकाणी पाहणी करुन अशा मुलांची निवड झाल्यानंतर महिनाभर त्यांना महिला आणि बालविकास विभागातर्फेच शिकवण्यात येईल. त्यामुळे ही मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून राहिली आहेत, असं महिला आणि बालविकास विभागाचे कार्यक्रम व्यवस्थापक योगेश जवांदे यांनी सांगितलं.

****

पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत - इंग्लंड दरम्यान तिसरा कसोटी सामना आजपासून इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीण वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरुच असून, धरणातला पाणीसाठा ६८ टक्क्याच्या वर गेला आहे.

****

No comments:

Post a Comment