Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 10 July 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० जूलै २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांचा
यशस्वी दौरा पूर्ण करून भारतात परतले. या महत्त्वपूर्ण दौऱ्यात त्यांनी घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझिल आणि नामिबिया या पाच देशांना
भेटी दिल्या. पंतप्रधानांनी या दौऱ्यात भारतासोबत संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं
या देशांच्या प्रमुखांसोबत चर्चा केली.
****
गुरुपौर्णिमा आज साजरी होत आहे. अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाणाऱ्या
गुरुजनांच्या चरणी कृतज्ञतेचं वंदन करण्याचा हा दिवस आहे. या निमित्तानं सर्वत्र गुरुपूजनासह
विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिर्डीमध्ये श्री साईबाबा संस्थानचा उत्सव
भक्तिभावात सुरू आहे. आज सकाळी श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची
समाप्ती झाली. अखंड पारायण समाप्ती मिरवणूकीत
शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****
राज्य सरकार आज महाराष्ट्र विशेष
जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मांडणार आहे. आजच्या दिवसाच्या कामकाजात याचा उल्लेख करण्यात
आला आहे. यापूर्वी हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं होतं. या समितीच्या कामकाजाचा
अहवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत सादर केला. सुमारे १२ हजार
नागरिकांनी समितीकडे त्यांची मतं पाठवली होती. समिती सदस्यांच्या सूचनांनुसार विधेयकात
बदल केल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
****
जालना जिल्ह्यात सन २०२२ ते २०२४
या कालावधीत नैसर्गिक आपत्तीपोटी शेतकऱ्यांना देण्याच्या अनुदानात घोटाळा झाल्याचे
आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे असून, सर्व संबंधित अधिकाऱ्यांची
विभागीय चौकशी करण्याचं आश्वासन कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी आज विधानसभेत
दिलं. संतोष दानवे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. या घोटाळ्यात
अपहार झालेली शासनाची रक्कम या दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारातून कापून घेतली
जाईल, ती भरेपर्यंत त्यांना सेवेत पुन्हा
घेतलं जाऊ नये, अशा सूचनाही देण्यात
येतील, सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हा
दाखल करण्यात येईल, असंही जैस्वाल यांनी
सांगितलं.
****
आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा
भक्कम करण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी
काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सार्वजनिक
आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. नागरी क्षेत्रातल्या आरोग्य प्रकल्पांच्या
कामांसाठी प्रत्येक पालक सचिवांनी नियोजनबद्ध कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी, तसंच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या
जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात
याव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
****
लेखक, विचारवंत आणि व्याख्याते नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकाच्या
दुसऱ्या टप्प्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याची माहिती सांस्कृतिक
कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानपरिषदेत दिली. नांदेडमध्ये हे स्मारक उभारण्यात
येत आहे.
****
बीड जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे
झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी
प्रशासनाकडे केली आहे. जुन आणि जुलै महिन्यात म्हणजेच ऐन पावसाळ्यातच पाऊस अचानक बंद
झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकांचं पूर्णतः नुकसान झालं आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांवर दुबार
पेरणीचे संकट येऊन ठेपले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानींबाबत महसूल आणि कृषी विभागाकडून
पीकनिहाय पंचनामे करून शेतकरी बांधवांना अर्थसहाय्य आणि दुबार पेरणीसाठी सहकार्य करण्याची
मागणी आमदार क्षीरसागर यांनी केली.
****
लातूर तालुक्यातल्या ११० ग्रामपंचायतींच्या
सरपंच पदासाठी उद्या ११ तारखेला आरक्षण सोडत होणार आहे. तालुक्यातल्या सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांनी या
आरक्षण सोडत बैठकीस उपस्थित रहावं, असं तहसील कार्यालयामार्फत
कळवण्यात आलं आहे.
****
महिलांच्या टी-20 क्रिकेटमध्ये भारतानं काल मँचेस्टर
इथं झालेला चौथा सामना जिंकून मालिकेत
इंग्लंडविरुद्ध तीन-एक अशी विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी
करत दिलेलं १२७ धावांचं लक्ष्य भारतीय महिलांनी अठराव्या षटकात पूर्ण केलं.
पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत -
इंग्लंड दरम्यान तिसरा कसोटी सामना आजपासून इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर खेळवण्यात
येणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीण वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या
जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरुच असून, धरणातला पाणीसाठा ६८ टक्क्याच्या
वर गेला आहे.
****
मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे
पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यात नदी नाले भरून वाहत असून, काही गावांचा संपर्क तुटला आहे. नागपूर
शहरातही पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडक सागर तलाव
ओसंडून वाहू लागला आहे. विदर्भात आज जोराचे वारे आणि वीजांसह अतिवृष्टिचा इशारा देण्यात
आला आहे.
****
No comments:
Post a Comment