Saturday, 19 July 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.07.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 19 July 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

सिक्कीम मधल्या नाथुला मार्ग इथून कैलास मानसरोवर यात्रा सुरळीतपणे सुरु आहे. आज नाथुला इथून तिब्बत स्वायत्त क्षेत्राकडे भाविकांचा सहावा जत्था रवाना झाला. आतापर्यंत भाविकांच्या चार जथ्यांनी आपली कैलास मानसरोवर यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली आहे, तर पाचवा जत्था यात्रा पूर्ण करुन गंगटोककडे रवाना झाला आहे. दरम्यान नाथुला मार्ग इथून भाविकांचे आणखीन चार जत्थे कैलास मानसरोवरसाठी मार्गस्थ होणार आहेत. या सर्व भाविकांसोबत डॉक्टर्स, स्वंयपाकी, तसंच संपर्क अधिकारी देखील आहेत. कैलास मानसरोवर यात्रेत सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून सिक्कीम इथं येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सिक्कीम प्रशासनाच्या वतीनं अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. 

****

केंद्र सरकार नजीकच्या काळात जातीनिहाय जनगणना करणार आहे. जातीनिहाय जनगणनेचे महत्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तीव्र लढा उभारू, असं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी म्हटलं आहे. जळगाव इथं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या जनगणनेमुळं ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातले अनेक प्रश्न आणि असंख्य मुद्यांचे निराकरण यातून होणार असल्याचंही भूजबळ यांनी सांगितलं.

****

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव इथल्या पद्मालय साठवण तलावासाठी जलसंपदा विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत १ हजार ७२ कोटी ४५ लाख  रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.  जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आकाशवाणी प्रतिनिधीला ही माहिती दिली. एरंडोल तालुक्यातील पद्मालय इथं उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत ७० पूर्णांक ३६ दशलक्ष घनमीटर क्षमतेचं धरण बांधणं प्रस्तावित असून या धरणामुळे एरंडोल तसंच धरणगाव तालुक्यातील ९ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होईल तसंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही मार्गी लागणार  आहे.

****

हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आज हिंगोली इथल्या सखी वन स्टॉप सेंटरला भेट दिली. या ठिकाणी सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेऊन त्यांनी समाधान व्यक्त केलं. पीडित महिलांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशानं ही योजना राबवली जाते. त्यामुळे पीडित महिलांनी, विद्यार्थिनीनी या मदत केंद्राची मदत घेऊन आपले प्रश्न सोडावावेत, असं आवाहन यावेळी रूपाली चाकणकर यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

****

नंदुरबार तालुक्यातल्या शिंदे गावातले शेतकरी प्रकाश पटेल यांनी युट्युबवर मिळालेल्या माहीतीच्या आधारे ड्रॅगन फ्रुटच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. यंदा त्यांच्या या ड्रँगन फ्रुट शेतीचं तिसरं वर्ष असून त्यांना पाच एकरातून ३० ते ३५ टन उत्पन्न मिळणार आहे.  सध्या ड्रगन फ्रुटला दिडशे रुपयापर्यंत आहे. या उत्पादनातून त्यांना ४० ते ४५ लाखांच्या नफ्याची अपेक्षा आहे. कमी पाणी तसंच अल्पमजूर लागत असल्यानं हे पीक या शेतकऱ्यासाठी वरदान ठरलं असून सध्या त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी भेट देत आहेत.

****

भारतीय ग्रँडमास्टर्स कोनेरू हम्पी, डी. हरिका, आर. वैशाली आणि आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख यांनी फिडे जागतिक बुद्धीबळ महिला कप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.  या स्पर्धेत अंतिम आठ टप्प्यात चार खेळाडू असलेला भारत हा पहिलाच देश बनला आहे.

****

हंगेरीच्या बुडापेस्ट इथं झालेल्या पोलाक इमरे आणि वर्गा जानोस मेमोरियल कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीगीरांनी दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकलं. ऑलिंपियन अनंत पंघलने ५३ किलो गटाच्या अंतिम फेरीत रशियाच्या नतालिया मालिशेवाचा सात विरुद्ध चार असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. हरसितानं ७२ किलो गटात भारतासाठी दिवसातील दुसरे सुवर्णपदक जिंकलं. तिनं अंतिम फेरीत चार वेळा आशियाई विजेती कझाकस्तानच्या झामिला बाकबर्गेनोवाचा दहा विरुद्ध शुन्य असा पराभव केला. दरम्यान, ५७ किलो गटाच्या अंतिम फेरीत  नेहा सांगवानला रौप्य तर ५० किलो वजन गटात, नीलमनं कांस्यपदक मिळवलं.

****

इंग्लंड आणि भारत महिला संघांमधील तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना आज लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. पहिला सामना जिंकून भारत या मालिकेत एक शून्यने आघाडीवर असून तिसरा आणि शेवटचा सामना २२ जुलै रोजी होणार आहे.

****

मराठवाड्याच्या काही भागात आज जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****

No comments:

Post a Comment