Sunday, 20 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.07.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 20 July 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

मलेरिया निर्मूलनातील प्रयत्नात पहिली स्वदेशी लस तयार करण्यात भारताला मोठं यश मिळालं आहे. या लसीच्या उत्पादनासंदर्भात लवकरच खासगी कंपनीसोबत करार केला जाणार असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद - आयसीएमआरनं म्हटलं आहे. ऑक्सफर्ड आणि जागतिक आरोग्य संघटनेने तयार केलेल्या लसीपेक्षा ही लस प्रभावी आहे. मलेरियाचे संक्रमण रोखण्यात ही लस यशस्वी ठरणार असल्याचं आयसीएमआरनं म्हटलं आहे.

****

संसदेच्या उद्यापासून सुरू होणा-या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकारतर्फे आयोजित सर्वपक्षीय बैठकीत विविध पक्षाचे सदनातील सदस्य नेतेमंडळी सहभागी झाले. नवि दिल्ली इथं आज सकाळी साडेअकराच्या सुमारास बैठकीला सुरुवात झाली.

****

भारताला जगातली कोणतीही बाहेरची शक्ती स्वत:शी संबंधीत बाबींचा निपटारा करण्याबाबत निर्देश देऊ शकत नाही असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. काल नवी दिल्ल्ली इथं इंडीयन डिफेन्स इस्टेट सर्व्हीस- भारतीय सुरक्षा मालमत्ता सेवेच्या नवप्रशिक्षीत अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भारत हे एक सार्वभौम राष्ट्र असल्यानं राष्ट्राचे सर्व निर्णय हे त्याच्या नेतृत्वाकडूनच घेण्यात येत आहेत हे धनखड यांनी यावेळी बोलतांना नमूद केलं. देशाची अर्थव्यवस्था वृद्धींगत करणं केवळ एवढंच आपलं उद्दीष्ट नसून जनतेचं बळकटीकरण अपेक्षित असल्याचं ते म्हणाले.

****

सोलापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र पंढरपूरच्या विकास मार्गिका अर्थात पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. मुंबईत वर्षा बंगल्यावर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख यांच्या उपस्थितीत यातील भूसंपादनासंदर्भात माहिती घेण्यात आली.

काशी-उज्जैनच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर कॉरिडॉर निर्माण करण्याचं मुखमंत्री फडणवीस यांचं नियोजन आहे. याबाबत या बैठकीतून विकास आराखडा समजून घेण्यात आला. पंढरपूरच्या स्थानिक नागरिकांच्या या कॉरिडॉर संदर्भातील शंका दूर करण्यासाठी तीन उपजिल्हाधिकारी पदाच्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या २५ जुलै ते पाच ऑगस्टपर्यंत सर्व समावेशक चर्चा होण्यासाठी नियुक्त अधिकारी नागरिकांशी दररोज संवाद साधणर आहेत.

****

मध्य महाराष्ट्रासह कोकण गोव्यात आगामी पाच दिवसांत जोरदार पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं कळवलं आहे. विभागानं आज केरळसह कर्नाटकच्या किनारी भागात रेड अलर्ट जारी केला आहे. तर, येत्या काही दिवसांत बिहार, तमिळनाडूपासून, ओडिशा, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम - उत्तराखंड - जम्मू - काश्मिरच्या भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, मराठवाड्यात गेल्या काही दिवसांत पावसानं दडी मारली असून दिवसभरात उन्हाची तीव्रता आणि तापमान यात वाढ झाल्याची स्थिती आहे. छत्रपती संभाजीगर जिल्ह्यातील पैठणच्या जायकवाडी धरणात आज सकाळी प्राप्त आकडेवारीनुसार आता ७७ पूर्णांक ७६ शतांश टक्के इतकी पाणी पातळी झाली आहे.

****

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत सध्यातरी कोणताही विचार नाही, असं  राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते आज सकाळी नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते.

सध्या असा कोणाताही विचार नसल्याचं अजित पवार गटाचे प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे, जर तसं काही करायचं असल्यास मित्र पक्षांचा सल्ला घेणं, त्यांना विश्वासात घेणं आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच असल्याचं भुजबळ म्हणाले. विधानसभेत चर्चेत आलेल्या नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणाबाबत बोलताना भुजबळ यांनी या सर्व प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशी अंतीच खुलासा केलेला असल्याचं नमूद करत नाशिक नाहक बदनाम होत असल्याबद्दल खेद व्यक्त केला.

****

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष पात्र व गरजु रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. एक जानेवारी ते 30 जून या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून नांदेड जिल्ह्यात 385 रुग्णांना 3 कोटी 31 लाखांची मदत देण्यात आली. दिवसेंदिवस मदतीमध्ये वाढ होत आहे. गरजू रुग्णांना वेळेत मदत मिळावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून जिल्हा स्तरावर कक्ष उपलब्ध झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

****

आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिवस म्हणून आजच्या दिवसाची ओळख आहे.

आजच्या दिवशी १९२४ मध्ये, आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ संघटनेच्या स्थापनेप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. संघटनेनं यावर्षी, सर्वसमावेशकता, शिक्षण, सशक्तीकरण आणि मानसिक स्वास्थ्यासाठी बुध्दीबळ खेळाचा उपयोग म्हणून सामाजिक बुद्धीबळ वर्षाची सुरुवात केली आहे. बुद्धीबळातील प्रत्येक चालीला महत्व आहे. ज्यावरून आपल्याला आठवण होते की, आपला प्रत्येक निर्णय आपल्या जीवनाला आकार देत असतो या संकलपनेवर या दिवसाचं महत्व विशद करण्यात आलं आहे. बुद्धीबळाच्या क्षेत्रात भारतानं आतापर्यंत अतुलनीय योगदान दिलं असून अनेक प्रतिथयश भारतीय खेळाडूंची यात भर पडत आहे.

****

No comments:

Post a Comment