Sunday, 20 July 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.07.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 20 July 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक

·      विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पाया भक्कम करायचं काम वेगाने सुरू-माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन

·      हिंगोलीच्या सखी वन स्टॉप सेंटरच्या कामकाजाबाबत महिला आयोगाकडून समाधान व्यक्त

आणि

·      विक्रमी १५ लाख वृक्षांची लागवड करून धाराशिव जिल्ह्याची इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड तसंच आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

****

संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार असून, या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सर्व पक्षांना सहकार्याचं आवाहन, या बैठकीत करणार असल्याचं, संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. कोणत्याही मुद्यावर संसदेत चर्चेसाठी सरकार तयार असल्याचं ते म्हणाले. २१ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनांच्या प्रत्येकी २१ बैठका होतील. जन विश्वास दुरुस्ती विधेयक २०२५, राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ यासह इतर अनेक महत्त्वाची विधेयकं या अधिवेशनात चर्चेसाठी येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

****

विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पाया भक्कम करायचं काम वेगाने सुरू आहे, असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केलं. हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पदवीदान सोहळ्यात ते बोलत होते. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं तंत्रज्ञान आणि उत्पादनं तयार करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

****

'सायबर सुरक्षा म्हणजे केवळ राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न नाही, तर आपल्या युवकांना डिजिटल सुरक्षित भारताचे रक्षक बनवण्याचा मार्ग असल्याचं, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत कांदिवली इथल्या स्किल अॅण्ड करिअर सेंटरमध्ये डी एस सी आय अॅडव्हान्स्ड सायबर स्किल सेंटरचं उद्घाटन गोयल यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. या केंद्रामुळे युवकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. ते म्हणाले..

बाईट - केंद्रीय मंत्री पियुष गोयल

हे केंद्र पीएम कौशल विकास योजनेअंतर्गत उभारण्यात आलं असून, या केंद्रात दरवर्षी सुमारे एक हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

****

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी काल हिंगोली इथल्या सखी वन स्टॉप सेंटरला भेट दिली. या ठिकाणी सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेऊन त्यांनी समाधान व्यक्त केलं. पीडित महिला तसंच विद्यार्थिनींनी या केंद्राची मदत घेऊन आपले प्रश्न सोडावावेत, असं आवाहन त्यांनी केलं.

परभणी इथल्या सखी वन स्टॉप सेंटरलाही चाकणकर यांनी काल भेट दिली. केंद्राकडे सहकार्याच्या अपेक्षेने आलेल्या महिला आणि बालिकांना सेवा कशा प्रकारे देता ये, यावर लक्ष केंद्रित करण्याची सूचना त्यांनी संबंधितांना केली. भित्तीपत्रकांसह विविध साहित्याचं यावेळी प्रकाशन करण्यात आलं.

****

राज्यातल्या सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याचं, उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या अनुषंगाने काल बीड जिल्ह्यात गेवराई इथं गोर बंजारा समाजाच्या एकता मेळाव्यात ते बोलत होते. राज्यमंत्री नाईक यांना राज्यस्तरीय बंजारा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला.

****

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकारातून लातूर जिल्ह्यात तीन ग्रामपंचायतींच्या इमारतीसाठी शासनाने ७५ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. अहमदपूर तालुक्यातलं ढाळेगाव तसंच चाकूर तालुक्यातल्या चापोली आणि घरणी या ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतींचं बांधकाम यातून केलं जाईल, हे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

****

एक पेड मां के नाम, हरित महाराष्ट्र हरित धाराशिव या मोहिमेअंतर्गत काल दिवसभरात विक्रमी १५ लाख वृक्षांची लागवड करून, धाराशिव जिल्ह्याची इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड तसंच आशिया बुक ऑफ रेकॉर्ड या दोन्हीमध्ये नोंद झाली आहे. हे वृक्ष जगवण्यासाठी प्रशासनाबरोबर सर्वांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. या दोन्ही संस्थांची प्रमाणपत्र आणि पदकं देऊन पालकमंत्री सरनाईक यांनी, जिल्हाधिकारी कीर्ति किरण पुजार तसंच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष यांना सन्मानित केलं.

जिल्ह्यातल्या २४३ ग्रामपंचायती तसंच नगरपरिषदा आणि नगरपंचायत क्षेत्रामध्ये ही वृक्षलागवड करण्यात आली. तुळजापूर तालुक्यातल्या चिकुंद्रा या गावात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान- उमेदअंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन, तीन हजार झाडं लावली. या झाडांचं संगोपन करून ती मोठी करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी आकाशवाणीशी बोलतांना व्यक्त केला...

बाईट - गावकरी

****

बीड इथल्या यशवंतराव चव्हाण तंत्रनिकेतन महाविद्यालयातल्या पाच विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यू मधून चीनमधल्या ग्वांगदोंग इथल्या मायडिया कंपनीत निवड झाली आहे. यामध्ये सिराज अन्सारी, शेख रहमत अन्वर, ओंकार धायतोंडे, अभिषेक जैन आणि प्रेमविलास हातगळे यांचा समावेश आहे. याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूराव मार्लापल्ले यांनी अधिक माहिती दिली..

बाईट - प्राचार्य डॉ. बापूराव मार्लापल्ले

****

नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यात मौजे साळवाडी इथं आदिवासी आश्रमशाळेतील मुला-मुलींचं आरोग्य तपासणी शिबीर काल पार पडलं. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख यांनी मुला मुलींना पावसाळ्यात घ्यायची दक्षता तसंच वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात मार्गदर्शन केलं. आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळण्याचं महत्त्व ही देशमुख यांनी विशद केलं.

****

तळागाळातील ग्राहकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं आवाहन, सोलापूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त रवी पवार यांनी केलं आहे. धाराशिव इथं ग्राहक पंचायत अधिवेशनाच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. या अधिवेशनाला राज्यभरातून सुमारे सहाशे प्रतिनिधी उपस्थित आहेत. अधिवेशनाचा आज समारोप होत आहे.

****

पंढरपूर इथं चंद्रभागा नदीत बुडून दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला. मृत महिला जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या धावडा इथल्या रहिवासी असून, संगीता संजय सपकाळ आणि सुनिता माधव सपकाळ अशी त्यांची नावं आहेत. काल पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

****

ऑपरेशन सिंदूर आणि आत्मनिर्भर भारत याविषयी वरिष्ठ शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर यांनी बीड इथं स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालयातल्या विद्यार्थ्यांशी काल संवाद साधला. भारतीय सैन्यासाठी तयार करण्यात आलेल्या अनेक क्षेपणास्त्रांची देवधर यांनी सविस्तर माहिती दिली.

****

परभणी जिल्हा निवडणूक विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं काल जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ए आय तंत्रज्ञान कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा माहिती अधिकारी देवेंद्रसिंह यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्र आणि पत्रकारीता या विषयी मार्गदर्शन केलं. विविध माध्यमांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

****

ऑस्ट्रेलियात सनशाइन कोस्ट इथं झालेल्या ६६व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाडमध्ये भारतीय संघानं तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्य पदकांची कमाई केली. महाराष्ट्राच्या आदित्य मांगुडी याच्यासह दिल्लीचे कणव तलवार आणि आरव गुप्ता या तिघांनी सुवर्णपदक पटकावलं.

****

हंगेरीच्या बुडापेस्ट इथं झालेल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीगीरांनी चमकदार कामगिरी केली. अंतिम पंघलने ५३ किलो गटात तर हर्षितानं ७२ किलो गटात सुवर्णपदक जिंकलं. ५७ किलो गटात नेहा सांगवानला रौप्य तर ५० किलो वजन गटात, नीलमनं कांस्यपदक मिळवलं.

****

हवामान

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल तर राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

No comments:

Post a Comment