Monday, 21 July 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.07.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 21 July 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      संसदेचं आजपासून पावसाळी अधिवेशन, ऑपरेशन सिंदूरबाबत निवेदन देण्याची सरकारची तयारी - किरेन रिजीजू यांचं प्रतिपादन

·      मलेरिया निर्मूलनासाठी स्वदेशी लस तयार करण्यात भारताला यश

·      धाराशिव जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध उपक्रमांचा शुभारंभ, आयटीआयसाठी मिळणार नवे संकुल

आणि

·      मराठवाड्यात परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा आज यलो अलर्ट

****

संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. २१ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात दोन्ही सभागृहांच्या २१ बैठका होतील. या अधिवेशनात जनविश्वास सुधारणा विधेयक २०२५, राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ सभागृहात चर्चेला येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या भूमिका तसंच अधिवेशनात मांडू इच्छिणाऱ्या मुद्यांची चर्चा केली, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना दिली. दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले…

 

बाईट-किरेन रिजिजू

****

अधिवेशनात पंतप्रधानांनी संसदेत महत्त्वाच्या विषयांवर निवेदन द्यावं, अशी मागणी काँग्रेस पक्षाने या बैठकीत केल्याची माहिती पक्षाचे नेते गौरव गोगोई यांनी दिली. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाच विमानं पाडली गेल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला, त्यावर आणि पहलगाममधल्या सुरक्षेतल्या त्रुटीवर पंतप्रधानांनी बोलावं, अशी मागणी गोगोई यांनी केली. ते म्हणाले,

 

बाईट- गौरव गोगोई,माहिती पक्षाचे नेते,काँग्रेस

 

ऑपरेशन सिंदूरबाबत संसदेत बोलण्यासाठी सरकार तयार असून, भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी केल्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याबाबतही सरकार सभागृहात योग्य उत्तर देईल, असंही रिजिजू यांनी सांगितलं.

या बैठकीला भाजप नेते जे पी नड्डा, अर्जुन राम मेघवाल, एल मुरूगन, काँग्रेसचे गौरव गोगोई, प्रमोद तिवारी, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, द्रमुकचे तिरुची सिवा आणि टी आर बालु, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

****

मलेरिया निर्मूलनातल्या प्रयत्नात पहिली स्वदेशी लस तयार करण्यात भारताला मोठं यश मिळालं आहे. या लसीच्या उत्पादनासंदर्भात लवकरच खासगी कंपनीसोबत करार केला जाणार असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद - आयसीएमआरनं म्हटलं आहे. ऑक्सफर्ड आणि जागतिक आरोग्य संघटनेने तयार केलेल्या लसीपेक्षा ही लस प्रभावी असल्याचं आयसीएमआरनं म्हटलं आहे.

****

"भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार", उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना जाहीर झाला आहे. श्री नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त, पंढरपूरच्या संत श्री नामदेव महाराज फड संस्थान आणि संत वंशज यांच्यातर्फे २४ जुलै रोजी हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. संत नामदेव महाराज जसे पंजाब, महाराष्ट्र, आणि उत्तर भारतात आपली संत परंपरा पोहचवणारे झाले, या प्रेरणेतूनच एकनाथ शिंदे यांनी आजच्या युगात ‘संत विचारांचा शासनसत्तेतून जागर’ घडवल्यानं या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात येत असल्याचं सोहळ्याचे प्रमुख निवृत्तीमहाराज नामदास यांनी सांगितलं.

****

यंदाचा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून धूमधडाक्यात साजरा करण्याचं आवाहन, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केलं. गणपतीचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेण इथल्या हमरापूर इथं गावात मुर्तीकारांच्या विविध संघटनातर्फे शेलार यांचा काल जाहीर सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. गणेशोत्सवाची रुपरेषा देखील त्यांनी यावेळी जाहीर केली.

****

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत सध्यातरी कोणताही विचार नाही, असं राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे, जर तसं काही करायचं असेल तर मित्र पक्षांचा सल्ला घेणं, त्यांना विश्वासात घेणं आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच असल्याचं भुजबळ म्हणाले.

****

पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सोलापूर जिल्हा प्रशासनासोबत एक आढावा बैठक घेतली. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख यांनी यावेळी भूसंपादनासंदर्भात माहिती दिली. सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून पंढरपूर इथल्या स्थानिक नागरिकांच्या कॉरिडॉर संदर्भातल्या शंका दूर करण्यासाठी तीन उपजिल्हाधिकारी पदाच्या अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

****

विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. विधीमंडळ अधिवेशनानंतर शहरात आल्यानंतर काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली. राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीने महापालिका प्रशासनात भ्रष्टाचार वाढत असल्याचं ते म्हणाले. विरोधी पक्षनेता म्हणून अधिवेशनकाळात केलेल्या कामाची माहिती देखील दानवे यावेळी दिली.

****

आगामी निवडणुकीत आपला पक्ष चांगलं यश मिळवेल, अशी खात्री कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून वाटत आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी म्हटलं आहे. बीड इथं काल पक्षाच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. यावेळी आमदार धनंजय मुंडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर उपस्थित होते.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा इथल्या बसस्थानकाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झालं. मागील अनेक वर्षापासून उमरगा इथल्या नागरिकांचं बसस्थानकाचं स्वप्न प्रत्यक्षात येत असून, उमरगा बस स्थानकाच्या बांधकामासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही, असं आश्वासन सरनाईक यांनी यावेळी दिलं.

दरम्यान, सरनाईक यांनी काल जिल्ह्यातल्या नळदुर्ग किल्ल्याची सविस्तर पाहणी केली. ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्वाचा नळदुर्ग किल्ल्याच्या सौंदर्यवर्धनासह पर्यटन वाढीच्या दृष्टीने भव्य विकास प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सरनाईक यांनी यावेळी दिली. 

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण - म्हाडाच्या नव महोत्सवाअंतर्गत काल लोहारा तालुक्यातल्या जेवळी इथं वृक्ष लागवडीचा शुभारंभ पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते झाला.

****

धाराशिव इथल्या शासकीय आयटीआयचे स्थलांतर करून नवीन अद्ययावत संकुल बांधण्यासाठी ४० कोटी रुपयांचा निधी महायुती सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाच्या बांधकामासाठी यापूर्वीच ४३५ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. आता आयटीआयसाठी ४० कोटीचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

****

सोलापूर इथल्या डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या ३५ व्या वर्धापन दिनाच्या समारंभ मेळाव्यात, २०२४-२५ मध्ये सर्वाधिक रक्तदान शिबिरं घेऊन सर्वाधिक रक्त संकलन करण्यात धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्याबद्दल डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे अध्यक्ष रमेश विश्वरूपे यांच्या हस्ते माजी नगरसेवक अमर हंगरगेकर यांच्यासह इतर सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तुळजापूर शहरात यावर्षी एकूण ४३ शिबिराच्या माध्यमातून  रक्त संकलन करण्यात आलं.

****

बीड इथं काल जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. नागरिक आणि प्रशासनात समन्वय साधण्यासाठी माध्यमे मोलाची जबाबदारी पार पाडत असतात, तरीही माध्यमांनी सकारात्मक, विश्लेष्णात्मक पत्रकारितेवर अधिक भर द्यावा, असं आवाहन जिल्हाधिकार्यांनी यावेळी केलं.

****

हवामान

कोकण आणि विदर्भात आज बहुतेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाड्यात परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

**** 

No comments:

Post a Comment