Tuesday, 22 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.07.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 July 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा

·      संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला गोंधळात सुरुवात, ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत १६ तास चर्चा होणार

·      मुंबई उपनगरी रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता, निकालाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात देणार आव्हान

·      छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्या महिला सक्षमीकरण उपक्रमांना महिला आयोग राष्ट्रीय पातळीवर राबवण्याचे प्रयत्न करणार

आणि

·      आठवडाभराच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाचं पुनरामगन

****

उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा काल सादर केला. प्रकृतीच्या कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचं, धनखड यांनी म्हटलं आहे. आपल्या कार्यकाळात केलेलं मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल त्यांनी राष्ट्रपतींचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सर्व सहकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

****

संसदेचं पावसाळी अधिवेशन काल सुरु झालं. पहिल्याच दिवशी लोकसभेत विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आला. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल सरकारने निवेदन देण्याची मागणी केली. विरोधकांनी रितसर मागणी करावी, सरकार ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती देईल, असं अध्यक्षांनी सांगितलं. यानंतरही गदारोळ सुरुच राहिल्यानं सदनाचं कामकाज सुरवातीला तीन वेळा आणि अखेरीस दिवसभरासाठी स्थगित झालं.

****

राज्यसभेत काल सामाजिक कार्यकर्ते सी. सदानंदन मास्टर, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. मीनाक्षी जैन या नवीन सदस्यांना शपथ देण्यात आली.

सदनाचं कामकाज सुरू होताच, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम २६७ अंतर्गत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. दहशतवादाविरोधात ऑपरेशन सिंदूरला काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला, त्यामुळे याबद्दल सरकारने सविस्तर माहिती द्यावी, असं खरगे म्हणाले.

सरकार पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल चर्चा करण्यास आणि देशाला माहिती देण्यास तयार आहे, असं सभागृह नेते जे पी नड्डा यांनी सांगितलं. मात्र या उत्तरावर विरोधकांचं समाधान न झाल्यानं सदनात गदारोळ सुरू झाला.

राज्यसभेत काल लॅडिंग विधेयक २०२५ मंजूर झालं. जलवाहतुकीसंदर्भात व्यवहारांचं सुलभीकरण करणारं हे विधेयक लोकसभेत गेल्या अधिवेशनात मंजूर झालं आहे.

****

दरम्यान, संसद भवनात काल कार्य यंत्रणा समितीची बैठक झाली. यावेळी लोकसभेत पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी १६ तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

****

मुंबईत उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये २००६ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाने सर्व १२ आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केलं आहे. सत्र न्यायालयाने या १२ पैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा, तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, या आरोपींविरुद्धचा एकही गुन्हा सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्याचं न्यायाधीश अनिल किलोर आणि न्यायाधीश श्याम चांडक यांच्या पीठाने या निकालावेळी नमूद केलं.

न्यायालयाच्या या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी ही घोषणा केली...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईत ११ जुलै २००६ रोजी उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये सात बॉम्बस्फोट झाले, यामध्ये १८९ जण मृत्युमुखी पडले, तर ७०० हून अधिक जण जखमी झाले होते.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यात, अचानक लुळेपणा आलेल्या तीन बालकांपैकी दोघांची प्रकृती सुधारली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी काल संबंधित गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. गावातल्या पेयजल स्त्रोताचे नमुने तपासणीसाठी पाठवल्याचं, तसंच गावात आणखी कोणीही या आजाराने त्रस्त नसल्याचं धानोरकर यांनी सांगितलं. ते म्हणाले...

बाईट - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनामार्फत राबवल्या जात असलेल्या महिला सक्षमीकरण उपक्रमांबाबत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी समाधान व्यक्त केलं आहे. हे उपक्रम राज्य तसंच देशस्तरावर राबवण्याची बाब विचाराधीन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘स्वप्न तुझे माझे’ च्या विवाहपूर्व संवाद केंद्राची काल पाहणी केल्यानंतर त्या बोलत होत्या.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मुख्यालयातही रहाटकर यांनी, महिलांच्या सुरक्षेबाबत तसंच कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला.

****

संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचं जन्मस्थान असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथं काल कामिका एकादशीनिमित्त वारकऱ्यांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली, याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर..

बाईट - रमेश कदम पिटीसी हिंगोली.

 

दरम्यान, परतीच्या मार्गावर असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं काल जालना शहरात आगमन झालं. ही पालखी आज जालना शहरात मुक्कामी थांबून उद्या पहाटे शेगावकडे मार्गस्थ होणार आहे.

****

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महायुती म्हणून लढवणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली. ते काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. लातूर इथं छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या मारहाणीप्रकरणी पक्षाचा पदाधिकारी सूरज चव्हाण याला बडतर्फ करण्यात आल्याचं तटकरे यांनी सांगितलं.

दरम्यान, घाडगे पाटील हल्ल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर इथं काल छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.

****

दलित वस्ती सुधारणा ही विकासाची नव्हे, तर सामाजिक न्यायाची बाब असल्याचं, आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी म्हटलं आहे. परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यात धारासुर इथं दलित वस्ती सभामंडपाचं भूमिपूजन केल्यानंतर ते काल बोलत होते. दलित वस्त्यांमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करत असल्याचं गुट्टे यांनी सांगितलं.

****

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दिवंगत उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या संचालक पदावर त्यांचे पुत्र शिवकुमार भोसीकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. संचालक मंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

बीड शहरातल्या नागरी समस्यांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे काल आंदोलन करण्यात आलं. विविध समस्यांसदर्भात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना निवेदन दिलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात मर्यादेपेक्षा जास्त गौण खनिज उपसा केल्यापोटी महसूल विभागाने १५ स्टोन क्रेशर मालकांना ४० कोटी २१ लाख ८० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवार्इची नोटीस देऊन ९ वर्ष उलटून गेले आहेत. याबाबत जिल्हा गौण खनिज अधिकारी यांच्या उपस्थितीत काल प्रत्यक्ष मोजणी करण्यात आली.

****

जवळपास आठवडाभराच्या खंडानंतर मराठवाड्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. काल अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला.

नांदेड जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरु आहे. पावसाअभावी जिल्ह्यात खरिपाची पिके सुकत होती. जिल्ह्यात अद्यापही २३ जल प्रकल्प कोरडेच आहेत. नांदेड शहराला पिण्याचं पाणी पुरवणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात केवळ २० टक्के पाणीसाठा आहे.

धाराशिव शहर आणि परिसरातही काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं असून, वातावरणातही गारवा निर्माण झाला आहे.

जालना छत्रपती संभाजीनगर शहर तसंच जिल्ह्यातही पहाटेपासून पावसाची संततधार सुरु आहे.

मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्याच्या काही भागात आज जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

****

No comments:

Post a Comment