Wednesday, 23 July 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.07.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 23 July 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ जूलै २०२ सकाळी.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर जात आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील तसंच ब्रिटनचे राजे चार्ल्स यांची भेट घेतील. दोन्ही देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान विविध उद्योगांच्या प्रतिनिधींशी चर्चा करतील. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी २६ जुलैला मालदीवच्या ६० व्या स्वातंत्र्यदिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या भेटीत ते मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईज्जु यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार असून, अनेक प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत.

****

९८ वा भारतीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे.२३ जुलै १९२७ रोजी मुंबई केंद्राची स्थापना होऊन प्रसारण सुरू झालं. तेव्हापासून हा प्रसारण दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत सेहगल यांनी आकाशवाणीवरुन दिलेल्या संदेशात देशातल्या नागरीकांना प्रसारण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या वर्षाचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपण राष्ट्राची आवाज असलेल्या आकाशवाणीच्या ९० वर्षांच्या पर्वाच्या उंबरठ्यावर असल्याचं त्यांनी सांगितलं.

प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी प्रसारण दिनानिमित्त दिलेल्या संदेशात, गेल्या नऊ दशकांपासून आकाशवाणीने माहिती, शिक्षण आणि निरोगी मनोरंजन देत श्रोत्यांशी नातं जपल्याचं सांगितल. हा राष्ट्रीय ठेवा आजही तितक्याच ताकदीने चालत आहे, काळानुसार बदलत आहे आणि श्रोत्यांना गुंतवून ठेवत असल्याचं ते म्हणाले. २३ जुलै २०२७ रोजी भारतातल्या पहिल्या रेडिओ प्रसारणाच्या शताब्दी वर्षाचा उत्सव साजरा करू, असंही त्यांनी सांगितलं.

आकाशवाणीच्या महासंचालक प्रज्ञा पालिवाल-गौर यांनी प्रसारण दिनाच्या शुभेच्छा देताना, आकाशवाणीमध्ये गेल्या अनेक वर्षात झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती दिली. अनेक वर्षांपासून आकाशवाणी आजही विश्वासार्ह माध्यम असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

थोर स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून लोकमान्य टिळकांना आदरांजली वाहिली आहे. टिळक हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला ज्वाला देणारे अग्रणी नेते होते, ज्ञान, सेवा आणि राष्ट्रप्रेमावर विश्वास ठेवणारे थोर विचारवंत म्हणूनही ते नेहमी स्मरणात राहतील, असं पंतप्रधानांनी या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही लोकमान्य टिळकांना अभिवादन केलं आहे.

****

महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्यात येत आहे. चंद्रशेखर आझाद यांचं शौर्य, धैर्य आणि बलिदान अजरामर आहे. स्वातंत्र्यलढ्यातलं त्यांचं योगदान अमूल्य असून, आजच्या तरुणांना अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा देत असल्याचं, पंतप्रधान मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत यावर्षीच्या खरीप हंगामाकरता शेतकऱ्यांसाठी विमा नोंदणी सध्या सुरू आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असून, शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेण्याचं आवाहन भारतीय कृषी विमा कंपनीनं केलं आहे.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडी तालुक्यात नापणे धबधबा परिसरात उभारण्यात आलेल्या काचेच्या पुलाचं काल सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण झालं. हा महाराष्ट्रातला पहिला काचेचा पूल आहे. इथे पर्यटनाचा आनंद घेतांना, सुरक्षा नियमांचं पालन आवश्यक असल्याचं राणे यांनी नमूद केलं.

****

छावाचे संघटनेचे विजय घाडगे पाटील यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यात काल ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. जिल्ह्यातल्या अहमदपूर आणि औसा शहरात व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून निषेध नोंदवला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली.

****

परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या झिरोफाटा इथल्या हायटेक शाळेतल्या मुलीची टीसी काढण्यासाठी गेलेल्या पालकाचा मारहाणीत मृत्यू झालेल्या प्रकरणातील संस्थाचालकाला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं. संस्थाचालक आणि त्याच्या पत्नीवर पूर्णा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, पोलिसांनी दोघांनाही फरार घोषित करून सापडण्यासाठी बक्षिस जाहीर केलं होतं.

****

जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.  भायगव्हाण, खापरदेव, हिवरा, बाचेगाव आणि शहागड इथं रस्त्यांवरील पूल आणि नाले पाण्याखाली गेले असून, वाहतूक ठप्प झाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातही ढगफुटीसदृश्य पाऊस झाला.

 

No comments:

Post a Comment