Sunday, 3 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.08.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 August 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      भारतीय रेल्वेचं मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन

·      राज्यात अवयवदान पंधरवड्याला प्रारंभ, विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन

·      वार्षिक अमरनाथ यात्रा प्रतिकूल हवामान आणि खराब रस्त्यांमुळे स्थगित

आणि

·      शैक्षणिक संस्थांमधून ग्रंथालयांची अवस्था सुधारण्याची गरज वाचक चळवळीतले कार्यकर्ते अभिजीत जोंधळे यांच्याकडून व्यक्त, छत्रपती संभाजीनगर इथं, ग्रंथसखा श्याम देशपांडे पुरस्काराचं वितरण

****

भारतीय रेल्वेचं मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत असल्याचं प्रतिपादन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. गुजरातमध्ये भावनगर रेल्वे स्थानकात आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. गेल्या अकरा वर्षात ३४ हजार किलोमीटरचे नवे रेल्वेमार्ग तयार झाले असून, देशातल्या तेराशे रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास प्रकल्प हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प असल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले

बाईट - रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

 मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेगाने होत असून, लवकरच या दोन शहरातलं अंतर केवळ दोन तास सात मिनिटांवर येईल असं वैष्णव यावेळी म्हणाले. भावनगर ते अयोध्या या साप्ताहिक गाडीला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला, तसंच पुण्याहून मध्यप्रदेशातल्या रिवा कडे जाणाऱ्या तसंच जबलपूर ते रायपूर या गाडीचं उद्घाटनही त्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं.

****

राज्यात आज अवयवदान पंधरवड्याला प्रारंभ झाला. अवयवदान व्यापक समाज चळवळीचे पाऊल या अनुषंगानं राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातर्फे हा उपक्रम राबवला जात आहे. यानिमित्त जनजागृतीपर रॅली, सायकल रॅली, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकरता अवयवदान विषयावर कार्यशाळा, पॅरामेडिकल कर्मचारी आणि आशा सेविका यांच्यासाठीही कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते अवयवदान करणाऱ्यांच्या कुटुंबाचा सत्कार होणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य विभागानं सांगितलं.

ठाणे शासकीय रुग्णालयात आज अवयवदान दिनानिमित्त कार्यक्रम झाला. अवयवदान ही सर्वात मोठी मानवसेवा असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास पवार यावेळी म्हणाले.

****

स्वातंत्र्यसंग्रामातले थोर सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथल्या शासकीय निवासस्थानी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशातून नाना पाटील यांना अभिवादन केलं. प्रतिसरकारचे प्रणेते, महान स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असं पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही क्रांतिसिंहांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं.

****

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल जारी करण्यात आला. या हप्त्याअंतर्गत देशभरातल्या ९ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २१ हजार कोटी रुपये थेट हस्तांतरित झाले. हिंगोली जिल्ह्यातले लाभार्थी भोजराज गंगाधर राखोंडे यांनी यासंदर्भात सांगितलं

बाईट - भोजराज गंगाधर राखोंडे

****

वार्षिक अमरनाथ यात्रा प्रतिकूल हवामान आणि खराब रस्ते या कारणांमुळे आजपासून स्थगित करण्यात आली आहे. ही यात्रा ९ ऑगस्ट रोजी समाप्त होणार होती. तीन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली होती. मात्र बालताल आणि पहलगाम हे दोन्ही मार्ग यात्रेसाठी सुरक्षित नसून या मार्गांवरून यात्रा पुन्हा सुरू होणार नसल्याची घोषणा काल अधिकाऱ्यांनी केली. यावर्षी सुमारे चार लाख यात्रेकरूंनी अमरनाथ गुहेचं दर्शन घेतलं आहे.

****

शैक्षणिक संस्था विशेषतः शाळांमधून ग्रंथालयांची अवस्था सुधारण्याची गरज, वाचक चळवळीतले कार्यकर्ते अभिजीत जोंधळे यांनी व्यक्त केली आहे. आज छत्रपती संभाजी नगर इथं, ग्रंथसखा श्याम देशपांडे पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. वाचनाच्या सवयीचे परिणाम दिसून येण्यासाठी संयमाने वाट पहावी लागेल, असं मत जोंधळे यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले

बाईट - अभिजीत जोंधळे

 आपल्या पुस्तक पेटी उपक्रमाबद्दल जोंधळे यांनी माहिती दिली. अंबाजोगाई परिसरातल्या शाळांमधून सुरू झालेला हा उपक्रम राज्यभरात विस्तारत गेला असून, प्रत्येकी सरासरी शंभर पुस्तकं असलेल्या पुस्तक पेट्यांची संख्या आता पावणे दोनशेपर्यंत पोहोचल्याचं जोंधळे यांनी सांगितलं.

****

बीड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचं प्रारूप प्रसिद्ध झाल्यावर त्यावर ६६ आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. यावर येत्या मंगळवारी विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी होईल. सर्वाधिक आक्षेप केज तालुक्यातले आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल अंतर्गत मी आयुक्त होणार हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये महानगरपालिकेच्या मिटमिटा इथल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आयुक्तांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी आयुक्तांनी या विद्यार्थ्यांसोबत फ्रेंडशिप डे साजरा केला.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राजू नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आज हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या बाभुळगाव इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात महाआरोग्य शिबिर घेण्यात आलं. यावेळी पाच हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर ते खुलताबाद रस्त्यावर आज सकाळी वेरुळकडे दर्शनासाठी जाणाऱ्या कारनं, दोघांना जोरानं धडक दिली. यात दोन्ही पादचाऱ्यांचा जागेवरच मृत्यू झाला. अशोक घुसळे आणि ज्ञानेश्‍वर जाधव अशी मृतांची नावं आहेत.

****

अहिल्यानगर जिल्ह्यात भोजापूर चारीला तब्बल चाळीस वर्षांनंतर पाणी मिळवून देण्यात यश आलं असून, यानिमित्ताने संगमनेर तालुक्यातल्या तिगाव इथं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन झालं. भोजापूर चारीचा समावेश दमणगंगा - वैतरणा - गोदावरी नदीजोड प्रकल्पात करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ३३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याची शक्यता आहे. संबंधित प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असून, लवकरच अंमलबजावणी सुरू होणार आहे. भोजापूर चारीच्या विस्तारीकरणासाठी ३० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून, लवकरच या भागाचा पाणी प्रश्न सुटणार आहे, अशी ग्वाही विखे पाटील यांनी दिली.

****

स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी बुलढाणा जिल्ह्यातली सर्प मैत्रीण वनिता बोराडे यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. वनिता बोराडे यांनी आतापर्यंत ७१ हजारांहून अधिक सापांना लोक वस्तीतील संकटग्रस्त भागातून पकडून जंगलात सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिलं आहे. भारत सरकार द्वारे त्यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

****

क्रिकेट

भारत आणि इंग्लंडदरम्यान लंडन इथं सुरू असलेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या आज चौथ्या दिवशी उपाहारापर्यंत खेळ थांबला तेव्हा इंग्लंडच्या तीन बाद १६४ धावा झाल्या आहेत. जो रूट २३ तर हॅरी ब्रुक ३८ धावांवर खेळत आहेत. मोहम्मद सिराजनं दोन बळी घेतले आहेत. जिंकण्यासाठी भारताला अजून सात बळींची आवश्यकता आहे तर इंग्लंडला २१० धावांची गरज आहे.

****

राज्यात पावसानं विश्रांती घेतली असून, सध्या मुसळधार पावसाची शक्यता कमी असल्याचं वृत्त आहे. अनेक ठिकाणी दिवसाच्या तापमानात वाढ झाली आहे. मात्र, विदर्भात येत्या चार दिवसांत काही भागात मध्यम तसंच मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

****

No comments:

Post a Comment