Tuesday, 5 August 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 05.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 05 August 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ ऑगस्ट २०२ सकाळी .०० वाजता

****

फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्निनांड मार्कोस ज्युनिअर पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून, आज सकाळी त्यांचं राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात झालं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते. राष्ट्राध्यक्ष मार्कोस आणि पंतप्रधान मोदी यांच्यात आज महत्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा होणार आहे. यावेळी अनेक संयुक्त सहकार्य करारांवरही स्वाक्षर्या केल्या जाणार आहेत.

****

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय मंडळाची बैठक आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. संसदेच्या चालू अधिवेशनातील शासकीय विधेयकं, विरोधकांचा पवित्रा तसंच इतर महत्वाच्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्त आहे.

****

महिला आणि बालविकास मंत्रालयानं प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी विशेष नोंदणी १५ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांकडून घरोघरी जाऊन जागरूकता आणि नावनोंदणी मोहिमेचा उद्देश गर्भवती आणि स्तनदा मातांपर्यंत पोहोचणं आणि नोंदणी सुनिश्चित करणं हा आहे.

****

राष्ट्रीय रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून गेल्या १६ महिन्यांत ११ लाख जणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालानुसार गेल्या दशकात १७ कोटीहून अधिक युवकांना रोजगार मिळाला आहे, प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत येत्या पाच वर्षात चार कोटींहून अधिक रोजगार संधी निर्माण करण्यासाठी सरकारनं दोन लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहितीही मांडवीय यांनी दिली.

****

औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी आणि त्याबद्दल जनजागृतीसाठी आयुष मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळानं काल नवी दिल्लीत दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी आयुषमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते.

****

पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेतल्यानंतर ते तीन वर्षांत पूर्ण व्हायला हवेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मुख्यमंत्री वॉररुमधील विविध ३० पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेताना ते काल बोलत होते. वॉररुमधल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभारावे, मेट्रो प्रकल्प तसंच इतर सुविधा प्रकल्पांसाठी लागणारा निधी तातडीनं वितरित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

****

कर्नाटक राज्यातल्या अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यामधल्या बांधकामबाबतची अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणाकडून तपासली जाणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. काल दिल्लीत शिष्टमंडळासह केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांची भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे; मात्र या निर्णयामुळे भविष्यात सांगली, कोल्हापूर भागात पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, ही आपत्ती टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत पाटील यांनी अलमट्टी धरण बांधतांना केलेल्या अनियमिततेची तपासणीचे निर्देश दिल्याचं, विखे पाटील यांनी सांगितलं.

****

लातूर काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी लातूर इथं पदभार स्वीकारला. यावेळी प्रदेश कार्यकारिणीत सचिव म्हणून निवड झालेले श्रीशैल उटगे, समद पटेल, कल्याण पाटील, एन.आर.पाटील, डॉ. दिनेश नवगिरे यांचाही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

****

राज्यात अवयवदानाची चळवळ बळकट करण्यासाठी ‘अवयवदान पंधरवडा’ विविध जनजागृती उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. धाराशिव जिल्हा आरोग्य विभागाने या अभियानाला जनतेच्या सक्रिय सहभागाने यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या संदर्भात माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी अवयवदानास प्रोत्साहन देण्यासाठी सर्व स्तरांवर सकारात्मक सहभागाची अपेक्षा व्यक्त केली.

****

बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर तालुक्यातल्या भोन गावात असलेल्या भूमिगत बुद्ध स्तूप स्थळ परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या उपसंचालकांनी काल भोन परिसराला भेट दिली. या भागात लवकरच उत्खननाला सुरुवात होणार आहे.

****

महावितरणच्या वीजग्राहकांसाठी बीड इथं उद्या, सहा तारखेला उपविभागीय स्तरावरचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यातून, बीड शहर, बीड ग्रामीण, गेवराई, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार या उपविभागामधल्या नागरिकांच्या तक्रारींचं लगेच निवारण करण्यात येणार आहे.

****

महिलांच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी नवी दिल्ली इथं झालेल्या पात्रता सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या वैष्णवी पाटीलनं ६५ किलो वजन गटात आपलं स्थान निश्चित केलं आहे.

****

No comments:

Post a Comment