Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 August 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
मराठवाड्यातल्या
पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
·
ज्योतिर्लिंग
विकास आराखड्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती
·
रिझर्व्ह
बँकेच्या द्वैमासिक पतधोरणात रेपो दर साडे पाच टक्क्यांवर कायम
·
मराठा
आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत पुन्हा आंदोलनाचा इशारा
आणि
·
उत्तराखंडात
ढगफुटीमुळे आलेल्या आपत्तीत महाराष्ट्रातले ५१ नागरिक सुरक्षित
****
मराठवाड्यातल्या पुढच्या पिढीला दुष्काळ
पाहू देणार नाही, अशी
ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या
वैजापूर तालुक्यात देवगाव शनी इथं योगीराज सदगुरु श्री गंगागिरीजी महाराज यांच्या १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहात
बोलत होते. समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचं काम याच वर्षात सुरू
होईल, असं
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या परिसराचा विकास आराखडा मंजूर करण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी
दिलं, ते
म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना
आज श्रीक्षेत्र देवगांव शनि येथे ‘अखंड हरिनाम सप्ताह’दरम्यान लाडक्या बहिणींनी राखी बांधली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस
यांनी या जिव्हाळ्यासाठी सर्व लाडक्या बहिणींचे आभार मानले.
****
बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रातल्या
पाच ज्योतिर्लिगांच्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगवान अंमलबजावणी व्हावी,
यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार
पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित ज्योतिर्लिंगांच्या
विकास आराखड्यांतील कामांचा नियमितपणे आढावा घेऊन, त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करतील. भीमाशंकरसाठी
सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांची तर त्र्यंबकेश्वरसाठी
वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठवाड्यातल्या
तीन ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्र्वरसाठी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त
मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांची, औंढा नागनाथसाठी वित्त विभागाच्या प्रधान सचिव रिचा बागला यांची
तर परळी वैजनाथसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज यांची नियुक्ती
करण्यात आली आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक
पतधोरणात रेपो दर साडे पाच टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. मुंबईत झालेल्या पतधोरण
समितीच्या बैठकीनंतर, गव्हर्नर
संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली. चालू आर्थिक वर्षात महागाई दर आणखी कमी होऊन
३ पूर्णांक १ दशांश टक्के राहील, समाधानकारक मोसमी पावसामुळे खरीप पिकांचं उत्पादनही चांगलं होण्याची
अपेक्षा मल्होत्रा यांनी व्यक्त केली. सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेची
वाटचाल उत्तम राहण्याचा अंदाज व्यक्त करत, एकूण देशांतर्गत उत्पन्न वाढीचा दर साडे सहा टक्के राहण्याचा
अंदाजही मल्होत्रा यांनी वर्तवला.
****
व्यापारी नौवहन विधेयक २०२४ आज लोकसभेनं
मंजूर केलं. केंद्रीय जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी हे विधेयक
लोकसभेत मांडलं. या विधेयकात १९५८ च्या व्यापारी नौवहन कायद्यातल्या आंतरराष्ट्रीय
सागरी करारांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. भारतीय नौवहन क्षेत्राचा विकास आणि
भारताच्या व्यावसायिक सागरी क्षेत्राच्या सर्वोत्तम पद्धतीने देखभाल सुनिश्चित करणं,
हा या विधेयकाचा उद्देश आहे.
दरम्यान,
विरोधी पक्षानं वेगवेगळ्या मुद्द्यांवरून
केलेल्या घोषणाबाजीनंतर संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात
आलं.
त्यापूर्वी लोकसभेत सकाळी कामकाज सुरू
होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हिरोशिमा दिनाच्या पार्श्वभूमीवर आदरांजलीचा प्रस्ताव
मांडला, सदनानं
या अणुबॉम्ब हल्ल्यातल्या पीडितांना आदरांजली अर्पण केली. राज्यसभेत सदनाचे माजी सदस्य,
माजी राज्यपाल दिवंगत सत्यपाल मलिक
यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
****
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा
भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भक्कम पाठिंबा असल्याचं,
शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांसह
आज दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली इथं भेट घेतली,
त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
अमित शाह यांनी सर्वाधिक काळ गृहमंत्री म्हणून काम केल्याबद्दल शिंदे यांनी त्यांचं
अभिनंदन केलं.
****
पुणे विमानतळावर सीमाशुल्क विभागाने
आज केलेल्या एका कारवाईत सहा किलो ११९ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केलं. या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातली
किंमत अंदाजे सहा कोटी रुपये असल्याचं म्हटलं आहे. बँकॉकहून आलेल्या अतुल सुशील हिवाळे
नावाच्या प्रवाशाकडे हे पदार्थ आढळून आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुका व्हीव्हीपॅट शिवाय घेऊ नये, ही यंत्र उपलब्ध नसतील तर मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात,
अशी मागणी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ
नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
निवडणुका पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी व्हीव्हीपॅटची आवश्यकता असल्याचं वडेट्टीवार
म्हणाले. कबुतरखान्याबाबत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष जैन समाजाची दिशाभूल करत असल्याचा
आरोप वडेट्टीवार यांनी केला.
****
मराठा आणि कुणबी एकच असून याबाबतचा
निर्णय सरकारने तातडीने घ्यावा अन्यथा मुंबईत पुन्हा आंदोलनाचा इशारा मराठा आरक्षण
आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सोलापूर इथे दौऱ्यावर असताना ते माध्यम
प्रतिनिधींशी बोलत होते. यापूर्वी आपण मुंबईला गेलो होतो,
त्यावेळी सरकारने आरक्षणाचं आश्वासन
देऊन परत पाठवलं होतं. मात्र, सरकारने आपली फसवणूक केली असून आता २९ ऑगस्ट रोजी आपण आंदोलन
करण्यावर ठाम राहणार असल्याचं जरांगे यावेळी म्हणाले.
****
उत्तराखंडात भीषण ढगफुटीमुळे आलेल्या
आपत्तीत महाराष्ट्रातले ५१ नागरिक सुरक्षित आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्रानं
ही माहिती दिली. या सर्व पर्यटकांचा आपापल्या कुटुंबीयांशी संपर्क झाला असल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे. सोलापूर जिल्ह्यातले विठ्ठल पुजारी यांनी आपण आणि आपल्या सोबतचे
सर्वजण सुखरूप असल्याची माहिती दिली.
बाईट - विठ्ठल पुजारी
दरम्यान,
या आपत्तीत बचाव कार्य करणारे सेनेचे
एक अधिकारी आणि आठ सैनिक बेपत्ता झाले आहेत, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे मोहसीन शाहिदी यांनी ही माहिती
दिली. आतापर्यंत १९० जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून
त्यांच्यासाठी अन्न, पाणी
आणि औषधाची सोय करण्यात आली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या
सततच्या पावसामुळे उत्तराखंडच्या विविध भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसंच डोंगराळ
भागात अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले आहेत.
दरम्यान,
मराठवाड्यातल्या धाराशिव,
परभणी,
हिंगोली,
नांदेड जिल्ह्यांसह राज्यात १४ जिल्ह्यांना
हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात विजांच्या
कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
****
राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच
शिस्त लागावी, यासाठी
एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचं,
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी
म्हटलं आहे. आज मंत्रालयात यासंदर्भातल्या बैठकीत एनसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भुसे
यांनी चर्चा केली. यासाठी राज्यातील एनसीसीची प्रशिक्षण केंद्रं वाढवून देण्याचं तसंच
अधिक शाळांमधील विद्यार्थी यात सहभागी व्हावेत, यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करण्यात येणार असल्याचं भुसे
यांनी सांगितलं.
****
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नांदेड
इथं माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचं सांत्वन
केलं. खतगावकर यांच्या पत्नी स्नेहलता पाटील यांचं निधन झालं होतं. या भेटीनंतर पवार
हे बीड दौऱ्यावर रवाना झाले.
****
लातूर जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त
ग्रामपंचायतींनी ‘टीबीमुक्त गाव माझी
जबाबदारी - टीबीमुक्त ग्रामपंचायत’ या अभियानात सहभागी होऊन,
जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी पुढाकार
घ्यावा, असं
आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. या अभियानांतर्गत सलग दोन वर्षे
क्षयरोगमुक्त राहिलेल्या ३२ ग्रामपंचायतींचा रौप्य पुरस्कार देऊन आज गौरव करण्यात आला,
त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा
क्षयरोगमुक्त करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे,
असंही ठाकूर यांनी यावेळी सांगितलं.
****
स्वाध्याय परिवाराचा रक्षाबंधन सोहळा
येत्या शनिवारी छत्रपती संभाजीनगर इथं साजरा होणार आहे. परिवाराच्या प्रमुख धनश्री
दिदी तळवळकर यांच्या उपस्थितीत वाळुज इथं हा सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर
परवा शुक्रवारी स्वाध्यायी दुचाकी फेरी काढण्यात येणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात
आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं येत्या १० ऑगस्ट
रोजी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने एका कवि संमेलनाचं आयोजन करण्यात आलं
आहे. सिडको परिसरातल्या ललित कला भवनात होणाऱ्या या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा,
असं आवाहन कामगार कल्याण मंडळाच्या
वतीने करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावर
आज एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती
समोर आली आहे.
****
No comments:
Post a Comment