Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 August 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
उपराष्ट्रपती
पदाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी
·
देशात
पोषण सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता पंतप्रधानांकडून व्यक्त
·
सोलापूरचे
राजेंद्र अंकम यांना संत कबीर राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान
·
परळी
वैद्यनाथ देवस्थान विकास आराखडा २८६ कोटींवरून ३५१ कोटी रुपये करण्यास मान्यता
आणि
·
स्वातंत्र्यदिनापर्यंत
चालणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाला उद्यापासून प्रारंभ
****
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी
अधिसूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जारी केली. या पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची
शेवटची तारीख २१ ऑगस्ट असून, २५ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ९ सप्टेंबर
रोजी मतदान होणार आहे. देशातली उपराष्ट्रपतिपदासाठीची ही १७ वी निवडणूक आहे. जनदीप
धनखड यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं आहे.
****
देशात गेल्या शतकातल्या शास्त्रज्ञांनी
अन्न सुरक्षा सुनिश्चित केली; आता पोषण सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्लीत आज हरित क्रांतीचे प्रणेते एम.एस.
स्वामीनाथन यांच्या जन्म शताब्दीनिमित्त आंतरराष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर
ते बोलत होते. २१ व्या शतकातला भारत सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी
नमूद केलं. ते म्हणाले –
बाईट - पंतप्रधान नरेंद्र
मोदी
****
विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या
गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार व्यत्यय आला. संसदेच्या दोन्ही सदनांचं
कामकाज प्रथम दुपारी दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित झालं.
दरम्यान,
व्यापारी नौवहन विधेयक २०२४ आज राज्यसभेनं
मंजूर केलं, हे
विधेयक काल लोकसभेत संमत झालं होतं.
****
ओबीसी समाजाने देशाच्या जडणघडणीत दिलेलं
योगदान पाहता, आपल्या
सरकारला तसंच देशाला या समाजाच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता असल्याचं,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
म्हटलं आहे. ते आज गोव्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दहाव्या राष्ट्रीय परिषदेचं
उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. ओबीसी समाजाचं हित लक्षात घेऊन जातनिहाय जनगणनेचा निर्णय
घेण्यात आल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
****
माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव
बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बिहारमध्ये मतदार याद्यातल्या कथित
घोटाळ्यावरून केंद्र सरकारवर टीका केली. आज दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलतांना,
देशात अघोषित राष्ट्रीय नागरिक नोंदणी-
एनआरसी लागू झाला आहे का, असा
उपरोधिक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्ही
व्ही पॅटचा वापर न करण्याच्या मुद्यावरूनही त्यांनी टीका केली. ते म्हणाले –
बाईट - माजी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे
****
मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य
अत्रे पुरस्कार, ज्येष्ठ
पत्रकार तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार कदम यांना जाहीर झाला आहे.
शाल, श्रीफळ,
११ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं
या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी
आज मुंबईत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन
सपकाळ आणि माजी मंत्री अमित देशमुख यावेळी उपस्थित होते. दुर्राणी यांच्या अनेक समर्थकांनीही
काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
****
अकरावा राष्ट्रीय हातमाग दिन आज साजरा होत आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री
गिरीराज सिंह यांनी आज नवी दिल्लीत संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग
पुरस्कार प्रदान केले. सोलापूरच्या राजेंद्र सुदर्शन अंकम यांना संत कबीर हातमाग पुरस्कार
देऊन गौरवण्यात आलं. साडे तीन लाख रुपये, सुवर्णमुद्रा, ताम्रपट, शाल आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. सुती वॉल
हँगिंग, गालिचे
यांच्यावर चित्र विणण्याच्या एकमेवाद्वितीय कौशल्यासाठी अंकम यांना हा पुरस्कार मिळाला
आहे. याबाबत त्यांनी आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या –
बाईट – राजेंद्र अंकम
****
बीड जिल्ह्यात परळी इथल्या श्री वैद्यनाथ
ज्योतिर्लिंग देवस्थानचा विकास आराखडा २८६ कोटींवरून ३५१ कोटी रुपये करण्यास,
उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री
अजित पवार यांनी मान्यता दिली आहे. आज परळी इथं मंदिर आणि परिसराच्या विकास कामांचा
पवार यांनी आढावा घेतला, त्यावेळी
ही मान्यता दिली. याबद्दल आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांचे आभार मानले.
दरम्यान,
सामाजिक न्याय विभाग आणि जिल्हा परिषदेच्या
संयुक्त प्रयत्नातून ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्य मिशन अभियानाचा शुभारंभ आज पवार
यांच्या हस्ते झाला. ऊसतोड कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना
पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद आहे. मात्र कर्ता व्यक्ती गमावल्यावर कुटुंबासाठी पाच लाख रुपये ही रक्कम
अपुरी असल्याकडे, धनंजय
मुंडे यांनी लक्ष वेधत, ती
दुप्पट करण्याची मागणी केली. याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल,
असंही पवार यांनी सांगितलं. मिशन साथिया
योजनेअंतर्गत एक हजार आरोग्य किट वितरण यावेळी करण्यात आलं.
****
बीड विधानसभा मतदारसंघातल्या महामार्गासाठी
जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज पवार यांच्याकडे
केली. याबाबात तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
****
यंदाचा स्वातंत्र्यदिन विद्यार्थ्यांनी
देशभक्तीपर गीतांवर कवायती सादर करून उत्साहात साजरा करावा,
असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केलं आहे. आज ते गडचिरोली इथं माध्यम
प्रतिनिधींशी बोलत होते. राज्यातल्या सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीताच्या नंतर राज्य गीत
आणि सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली असून,
याच्या अंमलबजावणीची प्रत्येक शाळेमध्ये
जाऊन तपासणी करणार असल्याचं, दादाजी भुसे यांनी सांगितलं.
ते म्हणाले –
बाईट - दादाजी भुसे, शिक्षण मंत्री
****
येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत चालणाऱ्या
हर घर तिरंगा मोहिमेला उद्यापासून प्रारंभ होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ग्रामपंचायत
अधिकारी, सरपंच
आणि गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात मोहीम राबवावी, असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा
प्रशासक अंकित यांनी केलं आहे. ग्रामीण भागात स्वच्छ पाणीपुरवठा,
शाश्वत स्वच्छता आणि आरोग्य सुनिश्चित
करण्यासाठी पाणी, स्वच्छता
आणि आरोग्य म्हणजे वॉश उपक्रमाची या काळात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. स्वच्छ सुजल
गाव प्रतिज्ञा, सार्वजनिक
स्वच्छता मोहीम, जनजागृती
उपक्रम, जलसंवर्धन
आणि १५ ऑगस्ट
रोजी अमृत सरोवर आणि सार्वजनिक स्थळांवर ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २६ कृषी
सेवा केंद्रांनी ऑफलाईन पद्धतीने खतांची विक्री केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात
आली आहे, कृषी
विकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी ही माहिती दिली. अनुदानित खतांची विक्री,
ई-पॉस प्रणालीद्वारे करणं बंधनकारक
आहे, शेतकऱ्यांनी
देखील अनुदानित खतांची खरेदी करताना ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करावा,
असं आवाहन पाटील यांनी केलं.
****
धाराशिव तालुक्यात उपळा इथे सोयाबीनच्या
उत्पादकतेत वाढ व्हावी या उद्देशाने एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात
येणार आहे. या प्रयोगांतर्गत १० शेतकऱ्यांच्या शेतात स्वयंचलित हवामान केंद्र तर १०
शेतकऱ्यांच्या शेतात एआय सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या
वतीनं सुरू झालेला हा देशातला पहिला प्रकल्प आहे.
****
No comments:
Post a Comment