Friday, 8 August 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 08 August 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ ऑगस्ट २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      देशात पोषण सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता पंतप्रधानांकडून व्यक्त

·      शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात समिती स्थापन, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

·      बीड इथं नियोजित सी ट्रिपल आय टी प्रकल्पाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

·      स्वातंत्र्यदिनापर्यंत चालणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ

आणि

·      मराठवाड्यात परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना पुढील दोन दिवसांसाठी हवामान खात्याकडून पावसाचा यलो अलर्ट

****

देशात गेल्या शतकातल्या शास्त्रज्ञांनी अन्न सुरक्षा सुनिश्चित केली; आता पोषण सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्लीत काल हरित क्रांतीचे प्रणेते एम.एस. स्वामीनाथन यांच्या जन्म शताब्दीनिमित्त आंतरराष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. २१ व्या शतकातला भारत सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

ओबीसी समाजाने देशाच्या जडणघडणीत दिलेलं योगदान पाहता, या समाजाच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल गोव्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दहाव्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. ओबीसी समाजाचं हित लक्षात घेऊन जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेण्यात आल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात समिती स्थापन करण्यात आल्याचं, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. 'योग्य शेतकऱ्यांना कर्जमाफी' देण्यावर सरकार भर देत असून, ही समिती शेतकऱ्यांचं सर्वेक्षण करणार असून, त्या सर्वेक्षणानंतर गरजू आणि पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळेल, असं त्यांनी सांगितलं.

****

दरम्यान, धाराशिव इथं काल पत्रकार परिषदेत बोलताना बानवकुळे यांनी, महसूल विभाग आगामी काळात जनतेच्या ३५ विषयांवर काम करणार असल्याचं सांगितलं. यासंदर्भात माहिती देणारा हा वृत्तांत...

बाईट - देविदास पाठक, (आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव)

****

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं ३६८ कोटी रुपयांहून अधिक मदत द्यायला मान्यता दिली आहे. यंदाच्या जून महिन्यात छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभाग आणि गेल्यावर्षीच्या सप्टेंबर - ऑक्टोबर मध्ये धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे जिल्ह्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी ही मदत दिली जाणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

****

अकरावा राष्ट्रीय हातमाग दिन काल साजरा झाला. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी काल नवी दिल्लीत संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान केले. सोलापूरच्या राजेंद्र सुदर्शन अंकम यांना संत कबीर हातमाग पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. सुती वॉल हँगिंग, गालिचे यांच्यावर चित्र विणण्याच्या एकमेवाद्वितीय कौशल्यासाठी अंकम यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

****

माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी काल मुंबईत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मंत्री अमित देशमुख यावेळी उपस्थित होते. दुर्राणी यांच्या अनेक समर्थकांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

****

बीड इथं नियोजित सी ट्रिपल आय टी या प्रकल्पाचं काल उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. हा प्रकल्प केवळ बीडच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याच्या युवा वर्गासाठी संधीची नवीन दारं उघडणारा ठरेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. टाटा टेक्नॉलॉजी आणि राज्य सरकारच्या संयुक्त उपक्रमातून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या केंद्रामार्फत दरवर्षी सात हजार विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, उद्योग-अनुकूल प्रशिक्षण तसंच स्टार्टअपसाठी योग्य मार्गदर्शन मिळणार असल्याचं, पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवस्थानचा विकास आराखडा २८६ कोटींवरून ३५१ कोटी रुपये करण्यास, पवार यांनी मान्यता दिली. काल त्यांनी परळी इथं मंदिर आणि परिसराच्या विकास कामांचा आढावा घेतला, त्यावेळी ही माहिती देण्यात आली.

बीड जिल्ह्याने एकाच दिवशी ३० लाखांहून अधिक रोपांची लागवड करून विक्रम प्रस्थापित केला, त्यासाठी अजित पवार यांनी हरित बीड अभियानात सहभागींचं कौतुक केलं. याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये घेतली असून, त्याचं प्रमाणपत्र काल पवार यांना सुपुर्द करण्यात आलं.

****

हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून प्रारंभ होत आहे. येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच आणि गावकऱ्यांनी सहभागी होऊन, मोठ्या उत्साहात ही मोहीम राबवण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी केलं. या मोहिमेत स्वच्छ सुजल गाव प्रतिज्ञा, सार्वजनिक स्वच्छता मोहीम, जनजागृती उपक्रम, जलसंवर्धन आणि १५ ऑगस्ट रोजी अमृत सरोवर तसंच सार्वजनिक स्थळांवर ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

नांदेड जिल्ह्यात हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत स्वच्छता ही विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचं, जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी सांगितलं.

****

धाराशिव तालुक्यात उपळा इथं सोयाबीनच्या उत्पादकतेत वाढ व्हावी या उद्देशाने एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. या प्रयोगांतर्गत १० शेतकऱ्यांच्या शेतात स्वयंचलित हवामान केंद्र तर १० शेतकऱ्यांच्या शेतात एआय सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं सुरू झालेला हा देशातला पहिला प्रकल्प आहे. धाराशिवचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महादेव आसलकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले,

बाईट - जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महादेव आसलकर

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २६ कृषी सेवा केंद्रांनी ऑफलाईन पद्धतीने खतांची विक्री केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. अनुदानित खतांची विक्री, ई-पॉस प्रणालीद्वारे करणं बंधनकारक आहे, शेतकऱ्यांनी देखील अनुदानित खतांची खरेदी करताना ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करावा, असं आवाहन कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी केलं.

****

लातूर जिल्ह्यात रद्द केलेल्या एक हजार ४७३ जन्म प्रमाणपत्रापैकी फक्त ३१९ नागरिकांनी सदर प्रमाणपत्रं परत केली आहेत. उर्वरित नागरिकांनी आपली जन्म प्रमाणपत्रं संबंधित कार्यालयात जमा करावीत, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

महसूल सप्ताहाचा काल समारोप झाला. परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं.

****

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीड इथं काल उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी तळागाळात जाऊन संघटना बांधणी करून पक्ष मजबूत करण्याचं आवाहन सामंत यांनी यावेळी केलं.

****

देशातल्या ओबीसी आणि भटके-विमुक्त समाजाच्या हक्कासाठी निर्णायक ठरलेल्या मंडळ आयोग लागू दिनानिमित्त जालना जिल्ह्यातल्या दोदडगाव इथल्या मंडल स्तंभावर काल सामाजिक न्याय अभियान राबवण्यात आलं. या कार्यक्रमाला मंडळ संघाचे निर्माते डॉ. नारायणराव मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

****

हवामान

राज्यात काल मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. पुढच्या दोन दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी आज तर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

****

No comments:

Post a Comment