Monday, 11 August 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.08.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 11 August 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत संसद सदस्यांसाठी बांधलेल्या १८४ निवासस्थानांचं उद्घाटन झालं. या संकुलाला कृष्णा, गोदावरी, कोसी आणि हुगळी या चार महान नद्यांची नावं देण्यात आली आहेत. या संकुलामुळे खासदारांचं जीवनमान सुधारेल आणि लोकांसाठी अधिक कार्यक्षम राहता येईल अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली. २०१४ नंतर ३५० पेक्षा जास्त घरं बांधण्यात आली असून, यामुळे खर्चातही मोठी बचत होणार आहे. हे संकुल ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ च्या संकल्पनेचं प्रतीक असून, प्रत्येक प्रांताच्या सणांचं आयोजन इथं होण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले -

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

यावेळी पंतप्रधानांनी शेंदूर वृक्षाचं रोप लावलं, तसंच या संकुलांचं बांधकाम करणाऱ्या कामगारांशी संवाद साधला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, मनोहरलाल खट्टर आदी मान्यवर उपस्थित होते.

****

बिहारमधल्या मतदार यादी पुनरिक्षणाच्या मुद्यावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही होऊ शकलं नाही. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं. मागील १४ दिवसांपासून संसदेचं कामकाज सुरळीत होत नसल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली.

****

दरम्यान, मतदार यादीतल्या अनियमिततेप्रकरणी विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या वतीने आज संसद भवनापासून ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस नेते लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत यावेळी उपस्थित होते.

****

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आज राजस्थानातल्या झुंझुनू इथं एका कार्यक्रमात ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना तीन हजार २०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या पीक विमा दाव्यांचं वाटप करणार आहेत. पंतप्रधान पीक विमा योजनेतल्या गेल्या वर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामातल्या दाव्यांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवर प्रथमच एका कार्यक्रमातून नुकसानभरपाईचं वाटप होणार आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना खरिपातल्या नुकसानभरपाईपोटी ८०९ कोटी तर रब्बीसाठी ११२ कोटी असे एकंदर ९२१ कोटी रुपये मिळणार आहेत.

****

बौद्धिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिशा अभियान राबवण्यात आलं असून, एक नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम राज्यातल्या ४५३ विशेष शाळांमध्ये लागू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बौद्धिकरीत्या अक्षम असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अश्या प्रकारचा अभ्यासक्रम राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. राज्यातल्या सर्व शासकीय अनुदानित आणि विनाअनुदानित विशेष शाळांमध्ये हा अभ्यासक्रम राबविण्यात येतो. दिशा अभियान ४५३ शाळांमध्ये राबवण्यात येत असून यामध्ये सुमारे अडीच हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. या अभियानाचा थेट लाभ १८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळाला आहे.

****

हिंगोली नगर परिषदेच्या वतीनं आज तिरंगा रॅली काढण्यात आली. उपमुख्य अधिकारी श्याम माळवटकर यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात केली.

****

असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कामगार कायद्याचे फायदे देण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. या क्षेत्राचं नियमन करण्यासाठी कामगार विभागाने एक मसुदा विधेयक तयार केलं आहे. कंपन्यांना उपकर योगदान द्यावं लागेल जेणेकरून कल्याणकारी निधी तयार होईल, हा निधी कामगार आणि त्यांच्या कुटुंबांसाठी आरोग्य कवच, जीवन विमा, निश्चित वेतन आणि शैक्षणिक लाभ यासारख्या योजनांना वित्तपुरवठा करेल, अशी तरतूद या विधेयकात आहे. आगामी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येणार असल्याचं, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितलं.

****

तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं आज राज्यातल्या शिव मंदीरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मराठवाड्यात वेरुळ इथलं घृष्णेश्वर, परळी इथलं वैद्यनाथ आणि औंढा इथल्या नागनाथ, या ज्योतिर्लिंग स्थळीदेखील नागरिक मोठ्या संख्येनं दाखल होत आहे. स्थानिक प्रशासनांनी भाविकांच्या सोयी सुविधांसाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथं ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत.

****

No comments:

Post a Comment