Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 12 August 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ ऑगस्ट २०२५ दुपारी १.०० वा.
****
अलाहबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती
यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची घोषणा लोकसभा
अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज लोकसभेत केली. या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती
अरविंद कुमार, चेन्नई
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मनींद्र मोहन श्रीवास्तव, आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील बी. व्ही. आचार्य यांचा समावेश आहे.
ही समिती लवकरात लवकर अहवाल सादर करेल, चौकशी अहवाल मिळेपर्यंत
वर्मा यांना पदावरुन हटवण्यासाठीचा प्रस्ताव स्थगित राहील, असं
बिर्ला यांनी सांगितलं.
दरम्यान, विविध मुद्द्यांवर विरोधी पक्षांच्या
गोंधळामुळे संसदेच्या कामकाजात आजही व्यत्यय आला. लोकसभेचं कामकाज दुपारी तीन वाजेपर्यंत,
तर राज्यसभेचं कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.
****
महाराष्ट्र राज्य पोलिस दलात सुमारे
१५ हजार पोलिस भरतीस राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासोबतच
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीतील विविध महामंडळांमार्फत राबवण्यात
येणाऱ्या विविध कर्ज योजनेतल्या जामीनदाराच्या अटी शिथिल करण्याचा, तसंच शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ
देण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. तसंच, अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या राज्यातल्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये
वाढ करण्याच्या प्रस्तावास आणि सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरता निधी देण्याचा
निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
****
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर
राबवण्यात येणार्या हर घर तिरंगा अभियानाचा देशभरात उत्साह दिसून येत आहे. ठिकठिकाणी
तिरंगा फेरीसह विविध कार्यक्रम राबवले जात आहेत.
सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने
आज दिल्लीत तिरंगा दुचाकी रॅली काढण्यात आली. सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह
शेखावत, केंद्रीय
मंत्री किरेन रिजिजू, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी
फेरीचं नेतृत्व केलं.
जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर
इथं देखील आज तिरंगा यात्रा काढण्यात आली. शेर-ए-कश्मीर आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्रापासून
ते बॉटनिकल गार्डनपर्यंत काढलेल्या या यात्रेत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला सहभागी झाले
होते. बॉटनिकल गार्डनमध्ये तिरंगा महोत्सवाचंही आयोजन करण्यात आलं आहे.
परभणी महामनगरपालिकेतर्फे आज शहरात
हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत तिरंगा सायकल फेरी काढण्यात आली. राजगोपालाचारी उद्यानात
असलेल्या स्मृती स्तंभाला अभिवादन करुन या सहा किलोमीटर अंतराच्या फेरीचा समारोप झाला.
क्रीडा प्रेमी, सायकलिस्ट,
विद्यार्थी आणि नागरीक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. हर घर
तिरंगा या अभियानात सर्वांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन महानगपालिकेचे मुख्य
लेखाधिकारी डॉ. प्रभाकर काळदाते यांनी केलं.
****
उत्तराखंडमधल्या धाराली इथं झालेल्या
ढगफुटीच्या घटनेनंतर अद्यापही शोध आणि बचावकार्य सुरु आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती
प्रतिसाद दलाच्या संयुक्त शोधकार्यात आतापर्यंत ३४० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात
आलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय युवा दिन आज साजरा
केला जात आहे. या दिवसाचा मुख्य उद्देश शाश्वत विकास उद्दिष्टे आणि स्थानिक पातळीवरील
युवकांच्या कृतीवर लक्ष केंद्रित करण हा आहे. समुदायाच्या एकत्रित प्रयत्नांच्या माध्यमातून
जागतिक मानवी हितासाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. युवक हे बदलाचे अग्रभागी
असून, त्यांनी
आपल्या क्रियांनी सामाजिक आणि पर्यावरणीय विकासाला चालना देणं आवश्यक आहे. या विशेष
दिवशी युवकांना प्रोत्साहित करून त्यांच्या कार्याची महती पटवून देणं गरजेचं असल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पृथ्वीवरील सर्वात मोठ्या प्राण्यांपैकी
एक असलेल्या हत्तीचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं यासाठी जागतिक हत्ती दिवस आज साजरा
केला जातो. यानिमित्त यावर्षी तामिळनाडुत कोईम्बतूर इथं राष्ट्रीय उत्सवाचं आयोजन करण्यात
आलं असून, यामध्ये
हत्तींचं संवर्धन, मानव - हत्ती संघर्ष सोडवणं या विषयांवर चर्चासत्र
होणार आहेत.
****
जळगाव इथं गोदावरी अभियांत्रिकी
महाविद्यालयाच्या मैदानावर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते खेलो
इंडिया अस्मिता फुटबॉल लीगचं उद्घाटन झालं. विविध समाजघटकांतल्या युवा महिला खेळाडूंची
प्रतिभा शोधून त्यांना प्रोत्साहन देणं हे या स्पर्धेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. हा उपक्रम
आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजातल्या महिला खेळाडूंना ओळख देणारा असून ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राला अधोरेखित करतो,
असं रक्षा खडसे यावेळी म्हणाल्या.
****
चीनच्या चेंगडू इथं झालेल्या जागतिक
क्रीडा स्पर्धेत वुशू मध्ये महिलांच्या ५२ किलो वजनी गटात भारताच्या नम्रता बत्रानं
अंतिम फेरीत प्रवेश करून जागतिक पदक निश्चित केलं आहे. तिने फिलिपिन्सच्या क्रिझन फेथ
कोलाडोचा २-० असा पराभव केला. अंतिम फेरीत तिचा सामना चीन च्या मेंग्यू चेनशी होणार
आहे. या स्पर्धेत पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात ऋषभ यादवनं कांस्यपदक मिळवून
भारताला पहिले वैयक्तिक पदक मिळवून दिलं.
****
No comments:
Post a Comment