Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 August
2025
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ ऑगस्ट २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
केंद्रीय मंत्रिमंडळाची
चार नव्या सेमीकंडक्टर योजनांना मंजुरी, देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात गेल्या ११ वर्षांत
सहा पट वाढ
·
१८ व्या खगोलशास्त्र आणि
खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडला मुंबईत सुरुवात
·
पोलीस दलात शिपायांची १५
हजार पदं भरण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
·
हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत
राज्यात विविध उपक्रमांचं आयोजन
आणि
·
राज्याच्या बहुतांश भागात
पावासाचा अंदाज, मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना पुढील तीन दिवस हवामान विभागाकडून
यलो अलर्ट जारी
****
केंद्रीय
मंत्रिमंडळाने चार नव्या सेमीकंडक्टर योजनांना मंजुरी दिली. सुमारे चार हजार ५९४ कोटी
रुपयांचे हे प्रकल्प ओडिशा, पंजाब आणि आंध्रप्रदेशात उभारले जाणार आहेत. अरुणाचल प्रदेशातला
टॅटो टू जलविद्युत प्रकल्प तसंच लखनऊ मेट्रोच्या पुढच्या टप्प्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने
मंजुरी दिली.
दरम्यान, देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स
उत्पादनात गेल्या ११ वर्षांत सहा पट वाढ झाली असून, इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत आठ पट वाढ झाली आहे. केंद्रीय
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार
परिषदेत ही माहिती दिली. देशांतर्गत मोबाईल उत्पादनातही सुमारे दीडशे पट वाढ झाल्याचं
त्यांनी सांगितलं.
बाईट-
प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
****
भारतात
परंपरा आणि नवोन्मेष, आध्यात्मिकता आणि विज्ञान, औत्सुक्य आणि सर्जनशीलता हातात हात घालून चालतात, असं प्रतिपादन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलं. १८ व्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं
औपचारिक उद्घाटन काल मुंबईत झालं, या कार्यक्रमाला पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून
संबोधित करत होते. विज्ञानाच्या क्षेत्रात भारताने केलेली प्रगती आणि विविध प्रयोगाविषयी
त्यांनी यावेळी माहिती दिली. या ऑलिम्पियाड मध्ये ६४ देशांमधून एकंदर २८८ विद्यार्थी
सहभागी झाले असून, पंतप्रधानांनी त्यांचं स्वागत केलं.
****
राज्य
मंत्रिमंडळाची काल बैठक झाली, या बैठकीत पोलीस दलात शिपायांची १५ हजार पदं भरण्याला
मंजुरी देण्यात आली. या भरतीमध्ये २०२२ आणि २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा
ओलांडलेल्या उमेदवारांनाही विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे.
रास्त
भाव दुकानदारांच्या नफ्यात वाढ करण्याचा आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना
अन्नधान्याचं वितरण करण्याला, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत, विविध महामंडळांच्या कर्ज
योजनेतल्या जामीनदारीच्या अटी शिथिल करणं आणि शासन हमीला पाच वर्षांची मुदतवाढ देण्यालाही
मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.
****
नवी
मुंबईत ऐरोली इथं कॅपिटालॅंडच्या डाटा सेंटरचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते उद्घाटन झालं. यानंतर बातमीदारांशी बोलतांना फडणवीस यांनी, देशाची ६० टक्के डेटा सेंटर
महाराष्ट्रात असल्याची माहिती दिली. ते म्हणाले…
बाईट-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
राज्य
मार्ग परिवहन महामंडळ-एसटीला रक्षाबंधन तसंच सलगच्या सुट्टयांमुळे झालेल्या प्रवासी
वाहतुकी मधून १३७ कोटी रुपये उत्पन्न झालं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी
ही माहिती दिली. ११ ऑगस्ट या एकाच दिवशी तब्बल ३९ कोटी रुपये उत्पन्न महामंडळाला प्रवासी
वाहतुकीतून मिळालं, चालू आर्थिक वर्षात हे सर्वाधिक उत्पन्न असल्याचं सरनाईक
यांनी सांगितलं.
****
राज्य
सरकारचं जनसुरक्षा विधेयक तसंच त्रिभाषा सूत्राला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने विरोध
दर्शवला आहे. पक्ष कार्यकारिणीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत याबाबत पक्षाचं धोरण निश्चित
करण्यात आलं. भाकपचे राज्य सचिव सुभाष लांडे तसंच राज्य सचिव मंडळ सदस्य नामदेव चव्हाण
यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****
राज्यात
पॉलिटेक्निक अर्थात तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमाच्या २०२५-२६ या पहिल्या वर्षासाठी
आतापर्यंत एक लाख तीन हजार ११५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेशाची टक्केवारी
तब्बल ९३ टक्के झाली असून, हे मागील दहा वर्षांतलं सर्वोच्च प्रमाण आहे. विद्यार्थ्यांचा
कल पाहता, तंत्रनिकेतन
प्रवेशाची मुदत चार सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
****
हर
घर तिरंगा अभियानात सर्वत्र विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेअंतर्गत
या सर्व उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचं, आणि येत्या स्वातंत्र्यदिनी आपापल्या घरांवर तिरंगा
ध्वज फडकवण्याचं आवाहन महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केलं...
बाईट-
आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत
नांदेड
जिल्ह्यात या अभियानांतर्गत काल स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. जिल्ह्यातल्या सर्व
तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, भोकर, किनवट, हिमायतनगर या तालुका बसस्थानकांवरही स्वच्छता करण्यात
आली.
हर
घर तिरंगा या अभियानात सर्वांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन परभणी महानगपालिकेचे
मुख्य लेखाधिकारी डॉ. प्रभाकर काळदाते यांनी केलं. परभणी महानगरपालिकेतर्फे काल तिरंगा
सायकल फेरी काढण्यात आली. क्रीडा प्रेमी, सायकलिस्ट, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने यात सहभागी
झाले. या फेरीत सहभागी झालेले सायकलपटू कल्याण देशमुख यांनी या फेरीबाबत माहिती दिली...
बाईट-
सायकलपटू कल्याण देशमुख
लातूर
शहरातही महानगरपालिकेतर्फे मोटार सायकल फेरी काढण्यात आली. नागरिकांना महानगरपालिकेतर्फे
तिरंगा ध्वज मोफत दिला जाणार असून, प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावण्याचं आवाहन प्रशासनानं
केलं आहे.
दीनदयाळ
अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत लातूर महानगरपालिका परिसरात
तिरंगा ध्वज आणि त्यावर आधारित विविध वस्तूंचं विक्री केंद्र सुरु करण्यात आलं आहे.
धाराशिव
इथं हर घर तिरंगा अभियानाच्या आयोजनाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
मैनाक घोष यांनी माहिती दिली...
बाइट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी मैनाक घोष
****
पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या पुण्यतिथीनिमित्त कौशल्य विकास विभाग आणि क्रीडाभारती
यांच्या संयुक्त विद्यमाने "कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ २०२५"ला
आजपासून प्रारंभ होत आहे. मुंबईतल्या कुर्ला क्रीडा संकुल इथं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या हस्ते या महाकुंभचं उद्घाटन होणार असून, सोळा प्रकारच्या स्पर्धा यात होणार आहेत.
****
बीड
इथं काल केशरकाकू महाविद्यालयात बालरंगभूमी परिषदेच्या ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या स्पर्धेची
प्राथमिक फेरी पार पडली. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या हस्ते या फेरीचं
उद्घाटन झालं. या प्राथमिक फेरीत जिल्ह्यातले ३०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले.
****
शक्तीपीठ
महामार्गासाठी धाराशिव जिल्ह्यातल्या महाळंगी गावातील मोजणीचा टप्पा शंभर टक्के पूर्ण
झाला आहे. जिल्ह्यातल्या तेरा गटधारक शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी स्वेच्छेने
आपली जमीन देण्यास संमती दिली होती. त्यानुसार काल जिल्हा उपविभागीय अधिकारी ओंकार
देशमुख, उपअधीक्षक
भूमि अभिलेख मोरे यांच्या उपस्थितीत मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
****
हवामान
राज्यात
कोकण, विदर्भ
तसंच मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वगळता सर्व जिल्ह्यांना आज तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांना
उद्यापासून तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
****
No comments:
Post a Comment