Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 15
August 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ ऑगस्ट २०२५ दुपारी १.०० वा.
****
७९ व्या स्वातंत्र्य दिनी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रीय समर स्मारक इथं शहिदांना श्रद्धांजली
वाहिली.
****
स्वातंत्र्य दिनानिमित्त आज
नवी दिल्लीत लाल किल्ल्याच्या तटबंदीवर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, त्यानंतर त्यांनी
देशवासियांना संबोधित केले. आजच्या दिनाचं
औचित्य साधून देशातील युवकांसाठी आजपासून एक लाख कोटी रुपयांची प्रधानमंत्री विकसित
भारत रोजगार योजना सुरु करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.
पहिली नोकरी करणाऱ्या तरुण-तरुणींना
पंधरा हजार रुपये मिळतील तर रोजगार देणाऱ्या कंपन्यांनाही प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल, असं त्यांनी
सांगितलं. या योजनेचा देशातील साडेतीन कोटी तरुणांना फायदा होणार असल्याचंही ते म्हणाले.
आगामी दिवाळीत जीएसटी-वस्तू
आणि सेवा कर प्रणालीमध्ये सुधारणा केल्या जातील, यामुळे करांचा बोजा कमी होईल, असं त्यांनी
यावेळी सांगितलं. शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालक यांना प्राधान्य असून त्यांच्या
हिताशी कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही असं पंतप्रधान म्हणाले.
****
स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मंत्रालयात ध्वजारोहण केलं. यानंतर उपस्थितांना त्यांनी
संबोधित केलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना
आणि शहीद झालेल्या सैनिकांनाही त्यांनी आदरांजली वाहिली.
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतीय
सैन्याने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने दहशतवादी आणि पाकिस्तानच्या लक्ष्यांना उद्ध्वस्त
करून भारताची ताकद जगाला दाखवून दिली असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
नेतृत्वाखाली भारत वेगाने प्रगती करत असून भारताची अर्थव्यवस्था एका दशकात ११व्या क्रमांकावरून
चौथ्या क्रमांकावर पोहोचली असल्याचं त्यांनी सांगितलं. स्वदेशी उत्पादनांचा वापर करून
आत्मनिर्भर भारताला बळकटी देण्यात येत असून जगातील सर्वोत्तम उत्पादने भारतात तयार
करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
देशात येणाऱ्या परदेशी गुंतवणुकीपैकी
४० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे, वस्तू निर्मिती, निर्यात आणि
स्टार्ट-अप्समध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असून उत्तम शिक्षण आणि मानव संसाधन
विकासाच्या जोरावर महाराष्ट्र, देशाच्या विकासाचं नेतृत्व करेल, असा विश्वासही
मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
सोलापूर इथं पालकमंत्री जयकुमार
गोरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं.
कोल्हापूर इथं सार्वजनिक आरोग्य
आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते, यवतमाळ इथं
पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते तर सांगली इथं राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण, संसदीय कार्य
मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात
आलं.
नाशिकच्या विभागीय आयुक्त
कार्यालयात राज्याचे जलसंपदा मंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते
ध्वजारोहण करण्यात आलं.
अहिल्यानगर इथं राज्याचे जलसंपदा
मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात
आलं.
****
हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी
झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं मुख्य ध्वजारोहण
पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आलं. महानगर पालिकेच्या मुख्यालयात प्रशासक
तथा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित
यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, तसंच मुंबर्इ उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठात प्रशासकीय न्यायमुर्ती मनीष पितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात
आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी
यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं शहर
पोलिस आयुक्त आणि जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी तीन
पोलिस अधिकाऱ्यांना पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार देण्यात
आले. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक दीपक परदेशी, सहायक पोलिस उपनिरिक्षक प्रमोद
पवार आणि राजेंद्र मोरे यांचा समावेश आहे.
****
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर
शहर आणि जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह आहे. तर उद्या विविध राजकीय पक्षांच्या
नेत्यांच्या वतीनं दहीहंडीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड
तालुक्यात काल रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. खतगाव
इथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून पुरामुळे अनेक शेतातील पिकं वाहून
गेली आहेत. या भागात तत्काळ पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
धाराशिव जिल्ह्यातही काल रात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे.
****
No comments:
Post a Comment