Saturday, 16 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.08.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र



 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 16 August 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं आजपासून देशातील सुमारे १ हजार १५० पथकर नाक्यावर फास्ट टॅग वार्षिक पासची सुविधा सुरू केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार, काल संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुमारे १ लाख ४० हजार लोकांनी वार्षिक पास खरेदी करुन सक्रिय केला. वार्षिक पाससह सुरळीत प्रवासासाठी, प्रत्येक पथकर नाक्यावर प्राधिकरणाचे अधिकारी आणि समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सांगितलं. तीन हजार रुपये किमतीचा हा पास एक वर्षासाठी किंवा पथकर नाक्यावरून २०० वेळा वाहतूक करेपर्यंत मर्यादीत राहील. 

****

भारतातून होणाऱ्या वस्तूंच्या निर्यातीत जुलै महिन्यात लक्षणीय वाढ झाली असून ती ३७ अब्ज ३४ कोटी डॉलर इतकी झाली आहे. वार्षिक आधारावर ही सात पुर्णांक तीन टक्के वाढ आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, अभियांत्रिकी वस्तू, रत्नं आणि दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, औषध आणि सेंद्रिय तसंच अजैविक रसायनांच्या निर्यातीत प्रामुख्याने वाढ झाली आहे. जुलैमध्ये व्यापार तूट २७ अब्ज ३५ कोटी डॉलर झाली असून ती आठ महिन्यांतील सर्वाधिक आहे. आयातीमध्ये तीव्र वाढ झाल्यामुळे हे घडलं असून जुलैमध्ये आयात आठ पुर्णांक सहा टक्क्यांनी वाढून ती ६४ अब्ज ५९ कोटी डॉलर इतकी झाली आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या पुढील पिढीच्या जीएसटी सुधारणांच्या घोषणेचं देशभरातील व्यापारी आणि व्यावसायिकांनी स्वागत केलं आहे. त्यांनी करप्रणाली सुलभ करण्यासाठी आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी हे अत्यंत आवश्यक पाऊल असल्याचं म्हटलं आहे. या सुधारणांमुळे ५ ते २८ टक्के करदरांना तोंड देणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असं सदर बाजार व्यापारी संघटनेनं म्हटलं आहे.

****

नंदूरबार जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आज बुलढाणा इथं काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री काँग्रेस नेते वसंत पुरके उपस्थित होते. लवकरच नंदूरबार इथं एका मोठ्या समारंभाच्या माध्यमातून वळवी यांच्या सहकाऱ्यांचाही काँग्रेस पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान श्रीकृष्णानं सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी समर्पित राहून मानवजातीला धर्मानुसार कर्तव्य बजावण्याचा मार्ग दाखवला. भगवान श्रीकृष्णांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करून समाज आणि राष्ट्राला बळकटी देण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशातून नागरिकांनी केलं आहे.

****

गोपाळकालानिमित्त राज्यात आज दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहचला आहे, ठाण्यातील भगवती शाळेच्या मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहीहंडित किसन नगरचा राजा गोविंदा पथकानं आठ थर लावून सलामी दिली तर कोकण नगर गोविंदा पथकानं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान दहिहंडीत इथं नऊ थर लावले आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर शहरात दहीहंडी निमित्त वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. शहरात गुलमंडी, क्रांती चौक, टीव्ही सेंटर, कॅनॉट प्लेस, कोकणवाडी तसंच गजानन मंदीरासमोर दहीहंडी आयोजित करण्यात आली असून, या मार्गावरचे रस्ते दुपारनंतर बंद राहणार आहेत. काल श्रीकृष्ण जन्माष्टमी सर्वत्र भक्तिभावाने साजरी करण्यात आली. ठिकठिकाणच्या कृष्ण मंदीरांमध्ये तसंच घरोघरी देखील मध्यरात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव पार पडला.

****

मुंबईत मुसळधार पाऊस पडत असून यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. कुर्ला भागातल्या लोकमान्य टिळक टर्मिनस इथं पावसामुळं रेल्वे रुळावर पाणी साचलं असून अनावश्यक घराबाहेर पडू नये, अशा सुचना मुंबई वाहतूक विभागानं दिल्या आहेत.

****

वाशिम जिल्ह्यात काल झालेल्या पावसाने सोयाबीन, हळद पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून अनेक ठिकाणी नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरलं. रिसोड तालुक्यात या पावसाळ्यात चौथ्यांदा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, वाडी रायताळ इथं कालच्या पावसात वाहून गेलेल्या व्यक्तीचा आज सकाळी नाल्यात मृतदेह आढळला.

****

हिंगोली जिल्ह्यात दमदार पावसामुळं नदी नाले ओसंडून वाहत आहेत, कळमनुरी तालुक्यातल्या कामठा फाटा ते येलकी रस्त्यावरील ओढ्याला मोठा पूर आला असून पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे येलकी, बेलथर, कसबे धांवडा या गावांना जाणारा रस्ता बंद झाला असून संपर्कही तुटला आहे. दरम्यान, ईसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू असल्यानं धरणाचे सात वक्र दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडण्यात आले, सध्या ११ हजार ६३८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळं नदी काठच्या गावातील नागरिकांना पूर नियंत्रण कक्षाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

****

आशियाई नेमबाजी स्पर्धा आजपासून सुरू होत असून दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती मनू भाकर भारताचे नेतृत्व करत आहे. ३० ऑगस्ट रोजी या स्पर्धेचा कझाकस्तानमधील श्यामकेंट शूटिंग प्लाझा इथं समारोप होईल. या स्पर्धेत भारताने १६४ नेमबाजांचा समावेश असलेला मोठा संघ स्पर्धेसाठी पाठवला असून २८ देशांतील ७३४ नेमबाज सहभागी झाले आहेत. भारतीय वरिष्ठ नेमबाजी पथकात ३५ सदस्य असून ते १५ स्पर्धांमध्ये सहभाग घेतील तर मनू भाकर महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल आणि २५ मीटर पिस्तूल या दोन्ही स्पर्धेत भाग घेईल.

****

No comments:

Post a Comment