Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 17
August 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ ऑगस्ट २०२५ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आज दिल्लीतील रोहिणी इथं अकरा हजार कोटी रुपयांच्या दोन प्रमुख महामार्ग प्रकल्पांचं
उद्घाटन केलं. यात दिल्ली विभागाच्या दहा किलोमीटर लांबीच्या द्वारका एक्सप्रेस वे
आणि ३३ किलोमीटर लांबीच्या शहरी विस्तार रस्ता-२ चा समावेश आहे. यामुळे दिल्लीच्या
रस्त्यांवरील वाहतूक कमी होईल आणि जड वाहतूक जलद आणि सुलभ होणार आहे.
****
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या
वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. वंचित
बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी समाजमाध्यमांवर ही माहिती
दिली. आंबेडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेत निवडणूक आयोगानं मतदानाच्या दिवशी सायंकाळी
सहा नंतर झालेल्या ७६ लाख मतांची माहिती जतन करून न ठेवण्याबाबत आक्षेप नोंदवला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने याबाबतची याचिका फेटाळली होती.
****
परभणी शहरात पोलीस प्रशासनाच्या
वतीनं अमंली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीमेअंतर्गत आज सायकल फेरी काढण्यात आली. आरोग्य
राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी हिरवा झेंडा दाखवत सायकल रॅलीचा
शुभारंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह
परदेशी, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्यासह पोलिस अधीकारी उपस्थित होते. पोलिस अधीक्षक
कार्यालयातून सुरू झालेल्या या फेरीत नागरिक तसंच शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.
या फेरीत सहभागी झालेल्या सायकलपटूंनी या फेरीबाबत माहिती दिली.…
बाईट - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
****
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज
यांच्या साडेसातशेव्या जयंती निमित्त धाराशिव इथं आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयातील
विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनपटाचं सादरीकरण केलं. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, चांगदेव उपदेश
तसेच रेड्याच्या मुखी वेद वदवणे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी हे प्रसंग
यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले.
****
नुकत्याच सुरू झालेल्या नागपूर-पुणे
वंदे भारत एक्सप्रेसचे अकोला रेल्वे स्थानकांवर पुष्पवृष्टी, ढोल-ताशांच्या
गजरात स्वागत करण्यात आलं. या स्वागत सोहळ्यास आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप
धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकडे, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या रेल्वेला अकोला
आणि शेगाव इथं थांबा मिळाल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून आलं.
****
धाराशिव इथं काल डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसराचा एकविसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना
पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक, तसंच उपयोजित ज्ञान देणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन कुलगुरू
रजनिश कामत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. सुप्रसिद्ध कथाकार, समीक्षक भास्कर
चंदनशिव यांना 'जीवनसाधना पुरस्कार'ने सन्मानित करण्यात आले, तसंच प्राध्यापक वेदकुमार
वेदालंकार यांनी अनुवादित केलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चार ग्रंथाचे
प्रकाशन ही यावेळी करण्यात आले.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा
नागनाथ तालुक्यातल्या पूर्णा प्रकल्पाचे सिद्धेश्वर धरण पूर्णक्षमतेने भरले. आज सकाळी
धरणाचे आठ दरवाजे एक फूट उघडण्यात आले असून सात हजार घनफूट प्रति सेकंद वेगाने पाण्याचा
विसर्ग सुरू आहे. तसंच इसापूर धरणाचे तेरा दरवाजे उघडण्यात आले असून, धरणातून सध्या
५४ हजार ४६६ घनफूट प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पैनगंगा नदी काठावरील
गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मुसळधार
पाऊस आणि पूरग्रस्त परिस्थितीचा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी आज आढावा घेतला. परिस्थिती
नियंत्रणात असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा गोपछडे यांनी दिला आहे.
****
जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात
मध्यरात्री झालेल्या ढगफुटीमुळे चार जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता असल्याची
शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घटनेत घटनेत रेल्वेमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गासह
कठुआ पोलीस स्थानकाचे नुकसान झाले आहे. अनेक घरे मलब्याच्या ढिगाऱ्याखाली आली असून
पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद बल यांच्या संयुक्त पथकाने मदत आणि बचाव कार्य सुरू
केलं आहे.
****
राज्यात आजपासून २१ तारखेपर्यंत
मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. या कालावधीत मराठवाड्यात काही
ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजा आणि गडगडाटासह अधूनमधून
४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment