Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 17 August 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ ऑगस्ट २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीत
अकरा हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. यात द्वारका
एक्सप्रेसवेचा दिल्ली विभाग आणि शहरी विस्तार रस्ता-२ यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे
प्रवाशांची वाहतूक सुलभ होऊन, प्रवासाचा वेळ वाचणार
आहे.
****
पारदर्शकता तसंच, कायदे आणि नियमांचं पालन करूनच मतदार
यादी तयार केली जाते असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलं आहे. मतदार यादी तयार करताना
प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षांचा सहभाग होता तसंच पक्ष आणि त्यांच्या मतदान केंद्रावरील
कार्यकर्त्यांनी प्रारूप मतदार यादीवर कोणताही आक्षेप नोंदवला नसल्याचं आयोगानं म्हटलं
आहे.
****
यशस्वी अंतराळ मोहिमेनंतर भारतीय
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचं आज पहाटे नवी दिल्लीत आगमन झालं. केंद्रीय मंत्री जितेंद्र
सिंह, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता
आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी विमानतळावर
त्यांचं स्वागत केलं. आपल्या मूळ गावी लखनौला जाण्यापूर्वी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांची भेट घेतील. जून महिन्यात ॲक्झिओम फोर मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात
पोहोचणारे शुक्ला हे पहिले भारतीय बनले.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या दहिटणे आणि
शेळगी इथं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत, पहिल्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या १ हजार ३४८ सदनिकांचं
वितरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री
तसंच सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री जयकुमार गोरे, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर उपस्थित राहणार आहेत.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर
इथल्या सर्किट बेंचचं उद्घाटन आज सरन्यायाधीश
न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत
होणार आहे. या सर्किट बेंचचा लाभ कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा
जिल्ह्यांना होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मुंबई उच्च
न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
****
बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज
"नशामुक्त समाज - सुरक्षित भविष्य" या संकल्पनेखाली मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात
आली. समाजामध्ये नशामुक्तीबाबत जनजागृती घडवून आणणं, तसंच युवकांना व्यसनमुक्त जीवनशैलीकडे प्रेरित करणं, हे या उपक्रमाचं उद्दीष्ट होतं.
****
लातूर शहरातल्या गंजगोलाई परिसरात
आज ‘लातूर हरितोत्सव’ या उपक्रमाअंतर्गत कृषी
तंत्रज्ञान व्यवस्थापन कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव भरवण्यात येणार आहे. याठिकाणी औषधी
वनस्पती, फळझाडे, फुलझाडे, सेंद्रिय खते, कुंड्या आणि इतर आवश्यक साहित्याबरोबच
महिला बचत गटांचे खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल्सही उभारण्यात आले आहेत. नागरिकांनी या
उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. व्ही. लाडके यांनी
केलं आहे.
****
मिलिंद विंचुरकर हौशी नाट्य कलावंत
पुरस्कार आज छत्रपती संभाजीनगर इथं, चाळीसगाव इथले डॉ. मुकुंद
करंबेळकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. नाट्य प्रेमींना जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी
केलं आहे.
****
विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धीमत्तेचं
शिक्षण मिळावं यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून
गरज पडल्यास या निधीत वाढ करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
काल सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथल्या प्राध्यापक डॉ. एन .डी. पाटील विधी महाविद्यालय आणि श्रीमती
सरोज नारायण पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्राचं उद्घाटन तसंच प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचं भूमिपूजन
पवार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
म्हैसाळ उपसा सिंचन योजना, शक्तिपीठ महामार्ग, तसंच केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या
सुरू असलेल्या विविध विकास योजनांचा पवार यांनी यावेळी आढावा घेतला.
****
मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात अनेक
भागात जोरदार पाऊस सुरू असून, ६५ मंडळात अतिवृष्टीची
नोंद झाली. छत्रपती संभाजीनगरच्या १०, धाराशिव ११, बीड १७ तर नांदेड जिल्ह्यातल्या २७
मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यात
झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील मांजरा तेरणा आणि वासेरा या नद्यांना पूर आला
आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेती पिकांचं आणि घरांचं नुकसान झालं आहे, अशी माहिती तहसीलदार हेमंत ढोकले यांनी दिली. दरम्यान
पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या खोदला गावच्या शुभ्रा लांडगे यांचा मृतदेह शोधण्याचं
काम सुरू असून सुरक्षा दलाच्या मदतीनं शोधकार्य सुरू असल्याची माहिती ढोकले यांनी दिली.
राज्यात आजपासून २१ तारखेपर्यंत मुसळधार
पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment