Monday, 18 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 18.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 18 August 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ ऑगस्ट २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी राज्यपाल सी पी राधाकृष्णन् यांना उमेदवारी

·      न्याय हा पक्षकारांच्या दारी पोहोचला पाहिजे, सरन्यायाधीश भूषण गवई यांचं प्रतीपादन, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन

·      निवडणूक आयोगाचं काम पारदर्शक पद्धतीने - मतचोरीचे आरोप खोटे, आयोगाकडून स्पष्टीकरण

·      महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

आणि

·      मराठवाड्यात सर्वदूर पाऊस, पिकांचं मोठं नुकसान - प्रशासनाकडून आजपासून पंचनामे

****

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन् यांची निवड झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या काल दिल्लीत झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नऊ सप्टेंबरला होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सी. पी. राधाकृष्णन यांच्या समर्पण, नम्रता आणि समाजसेवेसाठी केलेल्या कार्याचं कौतुक करत, उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए उमेदवार म्हणून त्यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सी. पी. राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांची ही निवड ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

****

न्याय हा पक्षकारांच्या दारी पोहोचला पाहिजे, या संकल्पनेचे आपण समर्थक असल्याचं, सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन काल गवई यांच्या हस्ते झालं, त्यानंतर ते बोलत होते. सरन्यायाधीश पद हे अधिकार गाजवण्यासाठी नाही, तर समाजाची, देशाची सेवा करण्याची मिळालेली संधी असल्याचं ते म्हणाले. न्यायालयीन पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र अजिबात मागे नाही, असं गवई यांनी नमूद केलं. ते म्हणाले,

बाईट- सरन्यायाधीश भूषण गवई

 

या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज छत्रपती उपस्थित होते.

न्यायालयासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून, याद्वारे न्यायदानाची उत्तम व्यवस्था उभी राहत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. वकिलांच्या सुरक्षेसाठी वकिल संरक्षण कायदा आणण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार सरकार करत आहे, यावर लवकरच निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलं.

****

केंद्रीय निवडणूक आयोग पारदर्शक पद्धतीनं काम करत असून, मतचोरीचे आरोप खोटे आहेत, काही जण दिशाभूल करत आहेत, असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. मतचोरीचा आरोप करणं हा संविधानाचा अपमान नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अशा आरोपांना निवडणूक आयोग आणि मतदार घाबरणार नाही, असं त्यांनी नमूद केलं.

बाईट- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार

आयोगासाठी सर्व पक्ष समान आहेत, गेल्या वीस वर्षांपासून जवळपास सगळेच राजकीय पक्ष मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाची मागणी करत असून, त्यामुळेच विशेष पुनरिक्षणाची सुरुवात बिहारमधून केल्याचं कुमार यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ही याचिका दाखल केली असून, मतदानाच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर झालेल्या मतदानाचा डेटा निवडणूक आयोगानं जतन केला नसल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतले आहेत. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळली होती.

****

शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा - टी आय टी २०२५ चा निकाल आज जाहिर होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं काल ही माहिती दिली. या परीक्षेसाठी एकूण दोन लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी दोन लाख ११ हजार ३०८ उमेदवारांनी परीक्षा दिली.

****

राज्यात गेले दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली असून, अनेक धरणांमधून विसर्ग सुरु आहे. पिकांचं मोठं नुकसान झालं असून, आजपासून पंचनामे करण्यास सुरुवात होईल.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा सुमारे ९४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.  

 

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या पूर्णा प्रकल्पाचं सिद्धेश्वर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. काल धरणाचे आठ दरवाजे उघडून सात हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने, तर इसापूर धरणाचे तेरा दरवाजे उघडून ५४ हजार ४६६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पैनगंगा नदी काठावरच्या गावांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी काल विष्णुपुरी प्रकल्पाला भेट देवून पाहणी केली. प्रकल्पातल्या चार दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पूरस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणा कार्यरत असून, आवश्यक ती खबरदारी आणि उपाययोजना प्रशासनामार्फत करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

 

परभणी जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने ओढे, नाले आणि नद्यांना पूर आला आहे. गोदावरी, पूर्णा, दुधना नदीत विसर्ग वाढल्याने पाणी पातळीत वाढ होत असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा तसंच पशूधनही सुरक्षित ठिकाणी बांधावं, असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं. ते म्हणाले,

बाईट- जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

दरम्यान, जिल्हाधिकारी गावडे यांनी काल पूर्णा तालुक्यात पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. जिल्ह्यातल्या जवळपास ८८ हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालं आहे.

बीड जिल्ह्यात २४ गावांमधल्या ९३० हेक्टरवरील खरीप पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. 

जालना शहरासह जिल्ह्यात रात्रीपासून पाऊस सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

दरम्यान, राज्यात येत्या २१ तारखेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. आज मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्‍ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

बीड शहरात पोलिस दलानं आयोजित केलेली नशामुक्त बीड दौड २०२५मॅरेथॉन स्पर्धा काल पार पडली. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. या स्पर्धेत पोलिस कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी, शिवसंग्रामचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. 

****

अमंली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीमेअंतर्गत परभणी इथं काल सायकल रॅली काढण्यात आली. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, यावेळी उपस्थित होते. प्रारंभी बोर्डीकर यांनी नशा मुक्तीची शपथ दिली. जिल्ह्यात असे पदार्थ आढळून आले, तर तत्काळ कळवण्याचं आवाहन पोलीस अधिक्षक परदेशी यांनी केलं. ते म्हणाले,

बाईट- पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी

****

धाराशिव इथं, भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा या प्रवीण सरदेशमुख लिखित पुस्तकाचं प्रकाशन काल आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते झालं. हैद्राबाद मुक्तीसंग्रामात मराठवाड्याचं योगदान अनन्यसाधारण आहे, मराठवाड्यातल्या हुतात्म्यांनी जो लढा दिला तो विसरता येणार नाही. आजच्या तरुणांनी त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असं मत आमदार पाटील यांनी व्यक्त केलं.

****

राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमाने वारसा सह्याद्रीचाहा सांस्कृतिक कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर इथं उद्या होणार आहे. एम.आय.टी. महाविद्यालयात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे

****

जालना-राजूर रोडवरील शोर्य लॉन्सजवळ काल सायंकाळी ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. भरत खोसे, गणेश बारसे आणि सुनीता वैद्य, अशी मृतांची नावं असून तिघेही बदनापूर तालुक्यातल्या मांडवा इथले रहिवासी होते.

****

No comments:

Post a Comment