Tuesday, 19 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.08.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 19 August 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

लोकसभेचं कामकाज आता २१ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध झाल्याची माहिती अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सभागृहात दिली. आधी मराठीसह १८ भाषांमध्ये भाषांतर केलं जात होतं, त्यात आता काश्मीरी, कोकणी आणि संताली या भाषांचा समावेश झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी बिहार मतदार यादी पुनरिक्षणाच्या मुद्यावरुन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

या गदारोळात एका प्रश्नाला उत्तर देताना कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी, देशभरात यावर्षी तीन ऑक्टोबरला विकसित कृषी संकल्प अभियान सुरु करणार असल्याचं सांगितलं. शेतकरी आणि शास्त्रज्ञांमध्ये थेट संवाद घडवून आणणं, हा या अभियानाचा उद्देश असल्याचं ते म्हणाले. सदस्यांनी कामकाज सुरळीत चालू देण्याचं आवाहन अध्यक्षांनी केलं. मात्र गदारोळ सुरुच राहील्यानं सदनाचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि त्यानंतर दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

याच मुद्यावरुन राज्यसभेतही विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

****

नवी दिल्लीत आज झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांचं अभिनंदन करण्यात आलं. या पदासाठी राधाकृष्णन यांना सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. यासंदर्भात संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले

बाईट - संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात, शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पाअंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्पाचं जलपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे.

त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत “वारसा सह्याद्रीचा” या सांस्कृतिक कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर इथल्या एमआयटी महाविद्यालयात हा महोत्सव सुरु आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, पंजाब, गुजरात, णिपूर मधले ३०० लोककला कलावंत सहभागी झाले आहेत.

****

ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचं आज ठाणे इथं निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. चित्रपट, मालिका, जाहिरात, नाटक अशा माध्यमातून अच्युत पोतदार झळकले. थ्री इडियट्स, दहेक, आक्रोश, अर्ध सत्य, फर्ज अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केलं. मराठी आणि हिंदी मिळून तब्बल १२५ चित्रपटांमधून त्यांनी भूमिका केल्या.

****

राज्यातल्या अनेक भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातल्या आपत्कालीन कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईत मिठी नदीची पाणीपातळी धोका रेषेच्या जवळ पोहचली असून, नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथकं परिसरात दाखल झाली आहेत. ग्रामीण भागात सुमारे दहा लाख एकर क्षेत्र पूरामुळे बाधित झालं असून, त्याचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पवार यांनी दिले.

****

दरम्यान, मुंबईत आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, वडाळा सारखे सखल भाग जलमय झाले आहेत. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, रस्त्यांवर वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. मुंबईसाठी आज रेड अलर्ट जारी असून, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्येही पाऊस सुरु आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि परिसरात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची आज पाहणी केली आहे

रायगडमध्ये गाढी नदीला पूर आला असून, रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. अंबा आणि कुंडलिका नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहेत. रत्नागिरीत सततच्या पावसामुळे अनेक नद्यांमध्ये पाणी वाढलं असून, खेड-चिपळूण, संगमेश्वर, राजापूर इत्यादी भागात पूरस्थिती आहे. काजळी नदीची पाणीपातळी वाढल्याने रत्नागिरी तालुक्यातल्या चांदेराई, हरचिरी परिसरात पाणी भरलं असून, वाहतूक बंद झाली आहे.

पालघर जिल्ह्यात सूर्या नदीला पूर आला असून, नालासोपारा आणि भिवंडी भागातही पाणी शिरले आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

हवामान विभागाने आज मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी केला असून, मराठवाड्यात धाराशिव वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment