Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 August 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०
****
· लोकसभेत सादर १३० व्या घटना दुरुस्ती विधेयकासह तीन विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे
वर्ग
· ऑनलाइन गेमिंग प्रोत्साहन आणि नियामक विधेयक लोकसभेत आवाजी मतदानानं संमत
· एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा उमेदवारी
अर्ज दाखल
· एमकेसीएलने २५ वर्षांच्या वाटचालीत उत्तम काम केल्याचे मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार
आणि
· मुंबईसह कोकणाला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट तर कोकणालगतच्या भागात रेड अलर्ट
जारी
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘१३०वं घटना दुरुस्ती विधेयक
२०२५’,
‘केंद्रशासित प्रदेश सरकार विधेयक २०२५ आणि ‘जम्मू आणि काश्मीर
पुनर्रचना विधेयक’ २०२५ आज लोकसभेत मांडलं. काँग्रेस, एमआयएम
तसंच समाजवादी पक्षासह विरोधकांनी या विधेयकांचा विरोध केला. ही विधेयकं संसदीय लोकशाहीला
मारक असल्याची टीका विरोधकांनी केली. सदनानं ही तीनही विधेयकं सविस्तर अभ्यासासाठी
संसदेच्या संयुक्त समितीकडे वर्ग केली. त्यापूर्वी सकाळी सदनाचं कामकाज सुरू झाल्यावर
विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज वारंवार बाधित झालं. सायंकाळी पाच वाजता कामकाज
पुन्हा सुरू झाल्यावरही गदारोळ सुरूच राहिल्यानं, अध्यक्षांनी
कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. दरम्यान, संसदेच्या
पावसाळी अधिवेशनाचा उद्या समारोप होत आहे.
****
राज्यसभेत विविध राजकीय पक्षांनी दिलेले १८ स्थगन प्रस्ताव फेटाळल्याचं, उपाध्यक्ष हरिवंश यांनी सांगितलं. त्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. उपसभापतींनी
शून्य प्रहर पुकारला, मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी राज्यसभेचं
कामकाज प्रथम दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर २ वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाज पुन्हा
सुरु झाल्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारतीय व्यवस्थापन संस्था सुधारणा
विधेयक राज्यसभेत सादर केलं.
****
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव
यांनी,
प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग विधेयक, २०२५ आज लोकसभेत मांडलं. विरोधकांच्या गदारोळातच सदनानं ते आवाजी मतदानानं संमत
केलं.
ई-स्पोर्ट्स, शैक्षणिक आणि सामाजिक गेम्स
यासह ऑनलाइन गेमिंग क्षेत्राला चालना देण्यासोबतच त्यावर नियमन आणणं, हा या विधेयकाचा उद्देश आहे. याद्वारे गेमिंग क्षेत्राबाबत राष्ट्रीय पातळीवर एक
कायदेशीर चौकट तयार केली जाईल. तसंच कोणत्याही प्रकारे ऑनलाईन गेम्सद्वारे सेवा, जाहिरातींच्या रूपाने आर्थिक व्यवहारांवर पूर्ण बंदीची तरतूद या विधेयकात आहे. या विधेयकात तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास
आणि एक कोटी रुपये दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे. या विधेयकामुळे नागरिकांवर, विशेषतः तरुणांवर होणारे सामाजिक, आर्थिक, मानसिक आणि गोपनीयतेशी संबंधित दुष्परिणाम टाळायला मदत होईल, असा विश्वास छत्रपती संभाजीनगर इथले मानसोपचार तज्ज्ञ डॉ संजीव सावजी यांनी आकाशवाणीशी
बोलतांना व्यक्त केला. ते म्हणाले –
बाईट - डॉ
संजीव सावजी,
मानसोपचार तज्ज्ञ
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार राज्यपाल
सी. पी. राधाकृष्णन यांनी आज संसद भवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातले मान्यवर सदस्य तसंच एनडीएच्या घटक पक्षांचे
खासदार यावेळी उपस्थित होते. अर्ज दाखल दाखल करण्यापूर्वी राधाकृष्णन यांनी यांनी संसद
भवन संकुलातल्या प्रेरणास्थळावर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली.
****
मुंबईतल्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या स्थापनेच्या
१२५ वर्षपूर्तीनिमित्त तसंच संस्थापक गायनाचार्य पंडित विष्णु दिगंबर पलुसकर यांच्या
१५२ व्या जयंतीचं औचित्य साधून विशेष पदवी प्रदान सोहळा पार पडला. या सोहळ्यात -‘संगीत
महामहोपाध्याय’ हा संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा सन्मान युवा गायक डॉ. भरत बलवल्ली
यांना प्रदान करण्यात आला. हा सन्मान म्हणजे संगीत साधनेच्या अध्यात्मिक प्रवासाला
दिलेली प्रतिष्ठा असल्याची भावना बलवल्ली यांनी व्यक्त केली.
****
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधीसाठी
परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन नियमावली तयार केली जात आहे. ही नियमावली अंतिम करून
याबाबत तातडीने अधिसूचना जारी करावी, असे निर्देश परिवहन मंत्री
प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. आज परिवहन आयुक्त कार्यालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत
ते बोलत होते. शाळांच्या नियमावली मध्ये परिवहन समित्यांचं सक्षमीकरण करुन महिन्यातून
एकदा समितीची बैठक घ्यावी, प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांच्या
सुरक्षेसाठी एक नोडल अधिकारी नेमावा आदी बाबींचा समावेश या नियमावलीत असणार आहे.
****
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ८१व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना आदरांजली अर्पण केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन
खरगे,
महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी नवी दिल्लीत
वीरभूमी इथं राजीव गांधी यांच्या समाधीवर पुष्पांजली वाहिली. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहातही
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह इतर सदस्यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला
पुष्पांजली अर्पण केली.
मुंबईत राजभवनात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून
त्यांना अभिवादन करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने राजीव गांधी यांच्या
पुर्णाकृती पुतळ्यास सहाय्यक आयुक्त अशोक गिरी
यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. या वेळी सद्भावना दिवसाची
शपथ देखील घेण्यात आली.
परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कार्यालयातल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना
सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली.
****
सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून उभारलेल्या महाराष्ट्र ज्ञान
महामंडळ एमकेसीएल संस्थेने गेल्या २५ वर्षांच्या वाटचालीत उत्तम काम केल्याचे गौरवोद्गार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत. एमकेसीएलच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त
पुण्यात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत
होते. या संस्थेमुळे उद्योजकांचं जाळ राज्यात उभं राहिल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद
केलं. ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
****
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार
रुपये मदत तातडीने द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या मागणीचं पत्र सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्याकडे सादर केलं आहे. या कठीण प्रसंगी सर्व नियम, अटी,
शर्ती बाजूला ठेवून शासनानं शेतकऱ्यांची मदत करावी, अस या पत्रात म्हटलं आहे.
****
राज्यात मुंबईसह कोकणातल्या बहुतांश भागात आज ऑरेंज अलर्ट तर
कोकणालगतच्या अनेक जिल्ह्यांतल्या घाट भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात
आज पावसाचा जोर ओसरला तरी, विदर्भात मात्र बहुतांश जिल्ह्यांना
यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
आज मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन राज्यातल्या पूरस्थितीचा
आढावा घेतला. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत पावसाचा
जोर कायम राहण्याची शक्यता असल्यानं जिल्हा प्रशासन, आपत्ती
व्यवस्थापन यंत्रणा तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क राहण्याची सूचना पवार यांनी
केली आहे. जीवनावश्यक सेवा खंडित होऊ नयेत, यासाठी
सर्व विभागांनी समन्वयानं काम करण्याचे निर्देशही पवार यांनी दिले आहेत.
****
नांदेड तहसील कार्यालयात नागरिकांसाठी विशेष आपत्ती हेल्पलाइन
केंद्र सुरू करण्यात आलं आहे.
नागरिकांनी 024 62-23 67 69 आणि 72
62 89 88 15 या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असं आवाहन तहसील प्रशासनामार्फत करण्यात आलं आहे.
लातूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सरासरी २ पूर्णांक १ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण, कन्नड
तसंच सिल्लोड नगरपालिकेचा प्रारुप आराखडा घोषीत करण्यात आला आहे. या आराखड्यावर ३१
ऑगस्टपर्यंत हरकती दाखल करता येणार असल्याचं, प्रशासनाकडून
सांगण्यात आलं आहे.
****
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त जनजाती
गौरव विशेष कार्यक्रमांतर्गत बीड इथं २४ आणि २५ ऑगस्ट रोजी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय
चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘भारतीय इतिहासाच्या जडणघडणीत आदिवासी समाजाचे योगदान आणि भूमिका’ या विषयावर या चर्चासत्रात अनेक मान्यवर आपले विचार मांडणार आहेत.
****
No comments:
Post a Comment