Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 August 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०
****
· संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप-विरोधकांच्या गदारोळात दोन्ही सदनांचं कामकाज
संस्थगित
· ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयकाला राज्यसभेचीही मंजुरी
· अमेरिकेनं लादलेल्या आयात शुल्काला इष्टापत्ती समजावं-मुख्यमंत्र्यांचं आवाहन
· उद्या बैलपोळा-सर्जाराजाची खांदेमळणी तसंच रंगरंगोटीत बळीराजा दंग
आणि
· खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवाला आजपासून जम्मू-काश्मीरमध्ये प्रारंभ
****
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज समारोप झाला. दोन्ही सदनांचं
कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित झालं. २१ जुलैपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात लोकसभेत
३७ तास कामकाज झालं, यादरम्यान एकूण १४ विधेयकं सादर झाली, त्यातली १२ मंजूर करण्यात आली.
राज्यसभेत या अधिवेशनात ४१ तास आणि १५ मिनिटं म्हणजे सुमारे
३९ टक्के कामकाज झालं. या दरम्यान १४ शासकीय विधेयकं मंजूर झाली. दोन्ही सदनात ऑपरेशन
सिंदूरवरही या अधिवेशनात चर्चा झाली.
****
दरम्यान, बिहार मतदार याद्यांच्या मुद्यावरून
संसदेच्या दोन्ही सदनात आजही विरोधकांनी गदारोळ केला. दोन्ही सदनांचं कामकाज वारंवार
बाधित झाल्यावर,
कामकाज संस्थगित करण्यात आलं.
****
त्यापूर्वी राज्यसभेनं एकशे तिसावं घटनादुरुस्ती विधेयक २०२५, केंद्रशासीत प्रदेश सुधारणा विधेयक २०२५ आणि जम्मू काश्मीर पुनर्स्थापना विधेयक
२०२५ ही तीन विधेयकं संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठवण्यास मंजुरी दिली. ऑनलाईन गेमिंग
प्रोत्साहन आणि नियमन विधेयक २०२५ लाही राज्यसभेनं मंजुरी दिली. संसदेच्या मंजुरीनंतर
आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायद्यात रुपांतरित होईल. धाराशिव जिल्ह्यातल्या
बावी गावचे सरपंच इंद्रजीत मनसुके यांनी या विधेयकाचं स्वागत करत, तरुणांनी व्यसन लावणाऱ्या खेळांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले –
बाईट - इंद्रजीत मनसुके
****
उपराष्ट्रपतीपदासाठी इंडिया या विरोधी आघाडीचे उमेदवार, माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यापूर्वी त्यांनी संसद भवन संकुलातील प्रेरणा स्थळावर जाऊन महात्मा गांधींच्या पुतळ्याला
अभिवादन केलं.
एनडीएकडून सी पी राधाकृष्णन यांनी कालच उमेदवारी अर्ज दाखल केला
आहे. या अर्जांची उद्या छाननी होणार असून २५ ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेता येईल. तर नऊ
सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे.
****
अमेरिकेनं लादलेल्या आयात शुल्काला अडचण न समजता इष्टापत्ती
समजावं,
असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज
मुंबईत जागतिक आयात निर्यात धोरणाबाबतच्या बैठकीत बोलत होते. व्यापार सुलभता धोरण सरकारनं
आखलं असून त्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र वॉर रूम स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी
यावेळी दिले.
उद्योगांच्या परवानग्यांसाठी असलेलं सिंगल विंडो पोर्टल अधिक
सक्षम करावं,
पाच हेक्टर क्षेत्रावरील कृषी प्रक्रिया किंवा कृषीवर आधारित
उद्योगांसाठी कुठल्याही परवानगीची आवश्यकता असू नये, यासाठी
यंत्रणा कार्यान्वित करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
****
मुंबईतल्या वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना सुचवण्यासाठी महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शहरातल्या
मूळ समस्यांकडे दुर्लक्ष करुन कबुतरे, हत्ती या विषयांवर अधिक
लक्ष दिल्याबद्दल ठाकरे यांनी या बैठकीत टीका केली.
****
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नाव राजगड करण्याचा निर्णय
महसूल विभागाने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. याबाबतचं
राजपत्र लवकरच जारी होईल.
****
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचं प्रसारण आणि चुकीच्या व्यापार
पद्धतींसाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण- CCPA नं एका खासगी वाहन सेवा कंपनीला १० लाख रुपये दंड ठोठावला आहे. ग्राहकांची दिशाभूल
करणारी ही जाहिरात तत्काळ बंद करावीं, तसंच या जाहिरातीला भुलून
ज्या ग्राहकांची फसवणूक झाली आहे, त्यांना तत्काळ नुकसानभरपाई
देण्याचे निर्देशही प्राधिकरणाने दिले.
****
पोळ्याचा सण उद्या साजरा होत आहे. वर्षभर शेतात राबवणाऱ्या बैलांप्रती
कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या सणाच्या पार्श्वभूमीवर आज ठिकठिकाणच्या
नद्या आणि जलाशयांवर बैलांच्या खांदेमळणीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. बैलांची रंगरंगोटी
करण्यासाठी तसंच सजावटीच्या साहित्याने ग्रामीण भागातल्या बाजारपेठा फुलून गेल्या आहेत.
****
शेतकऱ्याचं आपल्या बैलावर जेवढं प्रेम असतं, त्यापेक्षा काकणभर जास्त प्रेम बैल आपल्या मालकावर करत असतो. मालकाने केलेल्या
प्रेमाची बैलाने परतफेड केल्याचं एक अनोखं उदाहरण सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यात
पहायला मिळतं. वाळूज इथले शेतकरी इंद्रसेन मोटे यांच्या घरच्या गायीला झालेल्या सोन्या
बैलाचे दोन्ही डोळे कर्करोग झाल्यामुळे काढावे लागले. डोळे नसल्याने निरुपयोगी झालेला
हा बैल,
कसायाला विकून टाकण्याचा अनेकांनी दिलेला सल्ला धुडकावून लावत, इंद्रसेन मोटे यांनी या बैलाला आयुष्यभर सांभाळण्याचा निर्णय घेतला. सोन्या बैलानेही
मालकाच्या या ऋणातून उतराई होण्याचा निर्णय घेतला. गेली पंधरा वर्ष हा दृष्टीहीन बैल
आपल्या जोडीदारांच्या साथीने मालकाच्या शेतात राबतोय. मालकावर भार न होता, आधार झालेल्या या सोन्या बैलाची ही कहाणी –
बाईट - इंद्रसेन मोटे
****
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसाग्रस्त भागाचे पंचनामे करून मदत
जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. गेल्या मे महिन्यात झालेल्या नुकसानाची
भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही, याकडेही पाटील यांनी
लक्ष वेधलं आहे.
****
गेल्या काही दिवसांत अतिवृष्टी आणि पुरामुळे नांदेड जिल्ह्यात
सव्वातीन लाख शेतकरी प्रभावित झाले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले –
बाईट - राहुल
कर्डिले, जिल्हाधिकारी, नांदेड
लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातल्या बोरगाव बुद्रुक, धडकनाळ आणि टाकळी या पूरग्रस्त गावांना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी काल
भेट दिली. सदर पंचनामे तातडीने पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान त्वरित
वितरित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात ४० हजार ७४४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं आवक सुरु असून, धरणाच्या १८ दरवाजातून २८ हजार २९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरु आहे. नागरिकांनी
खबरदारी घेण्याचं आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागानं केलं आहे. धरणाचा पणीसाठा ९५ टक्क्यांवर गेला आहे.
जळगावच्या हतनूर
धरणातून तापी नदीपात्रात होत असलेल्या विसर्गामुळे नंदुरबार जिल्ह्यातल्या
सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यात कोयना धरणासह इतर धरणांच्या पाणलोट
क्षेत्रातला पाऊस कमी झाल्यामुळे विसर्ग कमी करण्यात आला आहे.
****
राज्यात मुंबईसह कोकणातल्या बहुतांश भागात आज यलो अलर्ट तर पुणे
जिल्ह्यांतल्या घाट भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा तसंच विदर्भात पावसाचा जोर ओसरला असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याचं, हवामान
विभागानं वर्तवली आहे.
****
खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवाला आजपासून जम्मू-काश्मीरची राजधानी
श्रीनगर इथल्या दल सरोवरात प्रारंभ झाला. परवा २३ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात
एकूण ३६ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधले ५०० पेक्षा जास्त खेळाडू रोइंग, कॅनोइंग आणि कायाकिंग या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होतील. यावेळी वॉटर स्कीइंग, ड्रॅगन बोट आणि शिकारा शर्यत यासारखे जल क्रीडा प्रकारही सादर होतील.
****
भारताच्या महिला हॉकी संघाच्या कर्णधारपदी सलीमा टेटे हिची निवड
झाली आहे. चीनमध्ये हांगचाओ इथे पाच ते १४ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत
हा संघ भारताचं प्रतिनिधीत्व करेल. भारताचा पहिला सामना पाच सप्टेंबरला थायलंडसोबत
तर सहा सप्टेंबरला जपानसोबत होणार आहे.
****
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या तळेगावच्या ग्रामविकास अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज २५ हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडलं. विजय मोतीलाल शिंदे असं त्याचं नाव आहे. कंत्राटदाराचं देयक अदा करण्यासाठी त्यानं लाचेची मागणी केली होती.
****
परभणी महानगरपालिकेला नवीन अग्निशमन केंद्र मंजूर झालं आहे. शहरातील
वसमत मार्गावर हे केंद्र उभारलं जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment