Friday, 22 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.08.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 22 August 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

ऑपरेशन सिंदूरने भारताच्या संरक्षण धोरणात एक नवीन रेषा आखली असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. बिहारमधल्या गयाजी इथं आज १३ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारतात दहशतवादी हल्ले करुन कोणीही पळून जाऊ शकणार नाही, असं पंतप्रधान म्हणाले.

बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कायदा करणार असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.

गयाजी ते दिल्ली दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस आणि वैशाली कोडरमा दरम्यान बौद्ध सर्किट रेल्वेलाही त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं.

पंतप्रधान यानंतर पश्चिम बंगालच्या दौर्यावर जाणार असून, कोलकाता इथं कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करणार आहेत. तसंच कोलकाता इथं पाच हजार २०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.

****

ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक पारित झाल्यानंतर ड्रीम स्पोर्ट्स, गेम्सक्राफ्ट, मोबाईल प्रिमियर लीग आणि जूपी सारख्या कंपन्यांनी आर्थिक देवाणघेवाणीवर आधारित खेळांवर बंदी आणण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक लाभासाठी पैसे लाऊन खेळल्या जाणाऱ्या सर्व खेळांवर बंदी घालण्याची तरतूद या विधेयकात आहे.

****

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र - दिल्ली एनसीआर परिसरातल्या भटक्या कुत्र्यांसंदर्भात यापूर्वी दिलेल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयानं बदल केला आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजारिया यांनी, रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांचं निर्बिजिकरण आणि लसीकरण करून त्यांना पुन्हा त्यांच्या भागात सोडण्याचे आदेश दिले. भटक्या कुत्र्यांना श्वान आसरा केंद्रात पाठवण्याचा आधीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. रेबिजग्रस्त किंवा आक्रमक कुत्र्यांना श्वान आसरा केंद्रात ठेवलं जाईल, या निर्णयामुळे जानवरांचं कल्याण आणि सार्वजनिक सुरक्षेचं संतुलन राखण्यास मदत होईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

****

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी आज उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, नोहर लाल, अर्जुन राम मेघवाल, हर्ष मल्होत्रा यांच्यासह दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानातले खासदार यावेळी उपस्थित होते. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी या खासदारांनी राधाकृष्णन यांना शुभेच्छा दिल्या.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्राने अलिकडेच झालेल्या जमीन वाटप समितीच्या बैठकीत अनेक कंपन्यांना औद्योगिक भूखंड वाटप करण्यास मान्यता दिली आहे. विशेष अन्न घटक, कागद उत्पादनं, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, रस्ते बांधकाम उपकरणं आणि मिश्र धातु कास्टिंग यासारख्या प्रकल्पांना ही मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पांमध्ये २०० कोटीहून अधिक गुंतवणूक होणार असून, एक हजारापेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार आहेत.  

****

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनूरी तालुक्यात पूरग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या हळद, केळी, सोयाबीन आणि ऊस आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, शासन आणि प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. गंगापूर इथं पुरात अडकेल्या आठ नागरीकांचीही दानवे यांनी भेट घेतली.

****

पोळ्याचा सण आज साजरा होत आहे. वर्षभर शेतात राबवणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. बैलांना धुवून, शिंगाला रंग लावून आकर्षक झुली, रंगीबेरंगी सजावट करून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. शेतकऱ्यांच्या घरातील सदस्य असल्याचं मानत घरी आल्यानंतर सर्वजण बैलांची पूजा करतात.

****

पालघर जिल्ह्यातल्या बोईसर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या मेडली फार्मास्युटिकल्स कंपनीत वायू गळती होऊन चार कामगारांचा मृत्यू झाला. काल दुपारच्या सुमारास या कंपनीत एलबेंडाजोल या औषधाचं उत्पादन घेत असताना नायट्रोजन रिएक्शन टॅंक मध्ये गॅस गळती झाल्याने हा अपघात घडला

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९६ टक्क्यांवर गेला आहे. धरणात सध्या ६२ हजार २८४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, ४७ हजार १६० घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीच्या काठावर असलेल्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नाथसागर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात असलेली लहान - मोठी २५ धरणं, बंधारे जवळपास पूर्ण भरले आहेत.

****

No comments:

Post a Comment