Friday, 22 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 22 August 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ऑगस्ट २०२ सकाळी.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. गया इथं १३ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं कार्यकर्ता मेळाव्याला पंतप्रधान संबोधित करणार आहेत, तसंच नव्याने बांधलेल्या मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील आणि कोलकाता इथं पाच हजार २०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन ही त्‍यांचा हस्‍ते होणार आहे.

****

भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम असलेल्या गगनयान ची पहिली चाचणी यंदाच्या डिसेंबर मध्ये होईल, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी दिली. ते काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. गगनयान मोहिमेची प्रगती समाधानकारक आहे. तसंच यामध्ये आतापर्यंत सुमारे सात हजार ७०० चाचण्या घेण्यात आल्या असून, पुढल्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत उर्वरित दोन हजार ३०० चाचण्या घेतल्या जातील, असं ते यावेळी म्हणाले.

****

पालघर जिल्ह्यातल्या बोईसर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या मेडली फार्मास्युटिकल्स कंपनीत वायू गळती होऊन चार कामगारांचा मृत्यू झाला. काल दुपारच्या सुमारास या कंपनीत एलबेंडाजोल या औषधाचं उत्पादन घेत असताना नायट्रोजन रिएक्शन टॅंक मध्ये गॅस गळती झाल्याने हा अपघात घडला. या गॅस गळती मुळे सहा कामगारांना बाधा झाली. त्यानंतर त्यांना बोईसर मधल्या शिंदे हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

****

रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी काल मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. महिन्याभरापूर्वी शिवसेना आणि रिपब्लिकन सेना यांच्यात युती जाहीर झाली होती. या बैठकीत आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्हास्तरावर समन्वय साधणं, त्यासाठी योग्य धोरण तयार करणं, तसंच कार्यकर्त्यांमध्ये याबाबत योग्य तो संदेश पोहचवण्याबाबत या बैठकीत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.

****

पोळ्याचा सण आज साजरा होत आहे. वर्षभर शेतात राबवणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. बैलांना धुवून, शिंगाला रंग लावून आकर्षक झुली, रंगीबेरंगी सजावट करून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. शेतकऱ्यांच्या घरातील सदस्य असल्याचं मानत घरी आल्यानंतर सर्वजण बैलांची पूजा करतात.

****

शासकीय सेवेत कार्यक्षमतेने नागरीकांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, तसंच शासनाच्या विविध योजनांची सकारात्मकतेने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. नगर परिषद विभागातल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण सत्राचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. या एक दिवसीय प्रशिक्षणात उत्कृष्ट काम करणाऱ्या १८ अधिकारी - कर्मचाऱ्यांना प्रशिस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं.

****

नाशिक महापालिकेच्या पुढाकाराने एकाच दिवशी सोळा हजार शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करुन इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. नाशिक महानगरपालिका आणि द गोदावरी ईनीशेटीव्ह स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने काल नाशिक शहरातल्या १२० शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला.

****

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या शिवाजीनगर भुयारी मार्गामुळे नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काल आंदोलन करण्यात आलं. भुयारी मार्गाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, पावसाळ्यात नागरिकांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे. पालकमंत्र्यांच्या दबावापोटी घाईघाईत या भूयारी मार्गाचं उद्घाटन करण्यात आल्याची टिका यावेळी करण्यात आली.

****

सातत्याने रक्तदान करणाऱ्या दात्यांचा जागतिक वैश्य महासंघातर्फे नुकताच नवी दिल्ली इथं सत्कार करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथले ६२ वेळा रक्तदान करणारे रक्तदाते अतुल बेवाल यांनाही या सोहळ्यात लद्दाखचे नायब राज्यपाल कविंद्र गुप्ता यांच्या हस्ते गौरवण्यात आलं.

****

कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अर्जुन बबुता, रुद्रांक्ष पाटील आणि किरण जाधव यांच्या संघाने १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. या स्पर्धेत महिला गटात मानसी रघुवंशीने सुवर्णपदक तर भारताच्याच यशस्वी राठोडने महिलांच्या कनिष्ठ गटात कांस्यपदक जिंकलं.

****

अठराव्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेचा काल मुंबईत समारोप झाला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या पाचही भारतीय स्पर्धकांनी पदकांची कमाई केली. आरुष मिश्रा, अक्षत श्रीवास्तव, बनिब्रत माजी आणि पाणिनी यांनी सुवर्णपद जिंकलं, तर सुमंत गुप्ता यांनी रौप्यपदक पटकावलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पश्चिम क्षेत्रीय कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धेचं उद्घाटन काल पश्चिम क्षेत्राच्या प्रादेशिक प्रबंधक रुपम नाखवा यांच्या हस्ते झालं. या स्पर्धेत आयुर्विमा महामंडळाचे १०४ कर्मचारी सहभागी झाले आहेत. आज या स्पर्धेचा समारोप होईल.

****

No comments:

Post a Comment