Saturday, 23 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 August 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ऑगस्ट २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      भटक्या कुत्र्यांसंबंधी धोरण तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारांना निर्देश

·      दुसऱ्या अंतराळ दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

·      छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन

·      शेतकऱ्यांसाठी 'किसान कॉल सेंटर' सुरू करण्याची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची सूचना

आणि

·      बैलपोळ्याचा सण काल सर्वत्र उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा

****

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना भटक्या कुत्र्यांसंबंधीचं धोरण तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. देशभरातल्या विविध उच्च न्यायालयात अशा प्रकरणांशी संबंधित प्रलंबित याचिका सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याचे आदेशही न्यायालयाने काल दिले.

दरम्यान, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र - दिल्ली एनसीआर परिसरातल्या भटक्या कुत्र्यांसंदर्भात यापूर्वी दिलेल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयानं बदल केला आहे. आता फक्त रेबिजग्रस्त किंवा आक्रमक कुत्र्यांनाच श्वान आसरा केंद्रात ठेवलं जाईल, उर्वरित भटक्या कुत्र्यांचं निर्बिजिकरण आणि लसीकरण करून त्यांना पुन्हा त्यांच्या भागात सोडण्याचे आदेश न्यायालयानं दिले. या कामात अडथळा आणणाऱ्या संघटना किंवा गटावर कायदेशीर कारवाईचा इशाराही सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. 

****

नवीन आयकर कायदा एक एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहे. संसदेनं संमत केलेलं हे विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर कायद्यात रुपांतरित झालं आहे. त्यानंतर ते राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलं आहे. दरम्यान, ऑनलाइन गेमिंगचा प्रसार आणि नियमन विधेयक, २०२५ ला राष्ट्रपतींनी काल मंजुरी दिली.

****

देशभरात आज दुसरा राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करण्यात येत आहे. २३ ऑगस्ट २०२३ रोजी चांद्रयान या मोहिमेअंतर्गत विक्रम लँडरच्या माध्यमातून प्रज्ञान रोव्हरचं चंद्रावर यशस्वी अवतरण केल्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 'आर्यभट्ट ते गगनयान : प्राचीन ज्ञान ते अनंत शक्यता' हा या वर्षीच्या राष्ट्रीय अंतराळ दिनाचा विषय आहे. यानिमित्त भारतीय अंतराळ संस्था इसरोच्या वतीने काल राष्ट्रीय अंतरीक्ष संमेलन घेण्यात आलं.

****

राज्य सरकार सुमारे एक हजार ८०० भजनी मंडळांना भजन साहित्याच्या खरेदीसाठी २५ हजार रुपये अनुदान देणार आहे. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा भाग म्हणून ही मदत दिली जाणार आहे. यासाठी आजपासून ०६ सप्टेंबर पर्यंत mahaanudan.org या संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध उपक्रमांच्या प्रतिनिधींची काल बैठक घेतली. गणेशोत्सवात लोकसहभाग वाढवण्यासाठी सर्व सरकारी विभागांनी विविध उपक्रम राबवण्याची सूचना शेलार यांनी केली आहे.

****

सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा रस्ता लिंग समानतेतून जातो, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राष्ट्रीय महिला आयोग तसंच राज्य महिला आयोगाच्या शक्तिसंवाद या कार्यक्रमाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन सोहळ्यानंतर वार्ताहरांशी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी, या संवादातून निर्धारित होणारी कार्ययोजना राज्यात राबवण्याबाबत आश्वस्त केलं. ते म्हणाले...

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 दरम्यान, अमृत योजना तसंच आरोग्य विभागासह इतर प्रलंबित सर्व कामं ३१ मार्च २०२६ पूर्वी शासकीय यंत्रणांनी मिशन मोडवर पूर्ण करावीत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत या संदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते.

दरम्यान, मुख्यमंत्री आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. महापालिकेच्या फारोळा इथल्या पाणी पुरवठा योजनेचं जलपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या कामाची पाहणी आणि आढावा देखील मुख्यमंत्री घेणार आहे.

****

शेतकऱ्यांना तातडीने मार्गदर्शन मिळावं यासाठी 'किसान कॉल सेंटर' सुरू करण्याची सूचना राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. ते काल पुण्यात कृषी विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. शेतकरी केंद्रस्थानी ठेवून सर्व योजना राबवण्याचे स्पष्ट निर्देश भरणे यांनी या बैठकीत दिले. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं जाईल, मात्र हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा भरणे यांनी दिला.

****

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं नकार दिला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आपल्या पक्षाकडून राज्यातल्या मतदारयाद्यांचा अभ्यास सुरू केल्याची माहिती पवार यांनी दिली.

****

बैलपोळ्याचा सण काल सर्वत्र उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढून पूजा करण्यात आली. घरोघरी त्यांना पुरणपोळीचा घास भरवण्यात आला.

परभणी जिल्ह्यात गावा गावातून वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या, कातनेश्वर इथं  मोठ्या उत्साहात बैल पोळा साजरा करण्यात आला.

हिंगोली जिल्ह्यात पारंपारिक पध्दतीने गोरेगाव इथं कावरखे आणि खिल्लारी हनुमान मंदिर इथं बैलपोळा भरवत विवाह विधीने पोळा साजरा करण्यात आला. वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ इथे आज २३ आगस्ट रोजी महापोळा भरणार आहे.

छत्रपती संभाजीनगर इथंही हरसुल तसंच मुकुंदवाडी भागात पोळ्याची मिरवणूक काढण्यात आली.

नागपूर इथं तान्हा पोळा निमित्त १४४ वर्षांची परंपरा असलेली काळी आणि पिवळी मारबत बडगा मिरवणूक काढण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं जिगिषा नाट्यसहवासाला कालपासून प्रारंभ झाला. ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते या दोन दिवसीय नाट्य महोत्सवाचं उद्घाटन झालं. यावेळी मिलिंद सफई पुरस्कार अभिनेते अभिजीत झुंझारराव यांना प्रदान करण्यात आला. एमजीएम विद्यापीठात सुरू असलेल्या या महोत्सवात नाट्यपुस्तक प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात आलेल्या शास्ती से आजादी मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. थकीत मालमत्ताकर तसंच थकीत पाणीपट्टीवरच्या दंडात सूट देणाऱ्या या योजनेला मुदतवाढ दिल्याचं, मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितलं. नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन जी श्रीकांत यांनी केलं आहे...

बाईट- मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत

****

छत्रपती संभाजीनगरातल्या शेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्रात अर्थात ऑरिक सिटीत अनेक कंपन्यांना औद्योगिक भूखंड देण्यात आले आहेत. या कंपन्यांमध्ये खाद्यान्न, कागद, इलेक्ट्रॉनिक्स, रस्ते बांधणी उपकरणे, इत्यादी उद्योगांचा समावेश आहे. यामध्ये २०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून सुमारे एक हजार रोजगारनिर्मिती होण्याचा अंदाज आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातील पूरग्रस्तांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी काल मुक्रमाबाद या गावाला भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान, जिल्ह्यात पुरामुळे ५९ गावांमध्ये पशुधनाची हानी झाली आहे. जवळपास ७६ मोठी जनावरे, ५६ शेळ्या, ८२ कोंबड्या दगावल्या आहेत. या पशुधनाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली असल्याचं पशुसंवर्धन विभागतर्फे सांगण्यात आलं आहे. दरम्यान, पूर प्रभावित क्षेत्रात पशुधनासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून पशुपालकांनी जनावरांचे लसीकरण करुन घेण्याचं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त राजकुमार पडिले यांनी केलं आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मृत पावलेल्या व्यक्ती, जखमी व्यक्ती, मृत जनावरं, घरांची पडझड यासारख्या झालेल्या नुकसानी पोटी राज्यशासनानं २३लाख ६२ हजार रुपयांचं अनुदान मंजूर झालं असून लवकरच त्याचं वितरण होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी काल दिली .

धाराशिव जिल्ह्यातील अवकाळी पावसा दरम्यान मृत झालेल्या जखमी  व्यक्तींना नुकसान भरपाई देण्यासाठी आठ लाख, जनावरांच्या मृत्यू अनुदानापोटी १३ लाख ८२ हजार तर घरांच्या पडझडीपोटी नुकसान भरपाई म्हणून दोन लाख रुपये मंजुर झाले आहेत.

****

महसूल सप्ताहाच्या निमित्ताने बीड तालुक्यात संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा योजनेंतर्गत १४ हजार २४५ लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा करण्यात आलं आहे. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनात  विविध उपक्रम राबवून महसूल सप्ताह घेण्यात आला.

****

केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक प्रमाणावर अभियान राबवण्याचं आवाहन जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेतल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत त्या काल बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी कार्यालयीन परिसरात राबवलेल्या प्लास्टिक बंदी उपक्रमाची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशंसा करत हा उपक्रम जिल्ह्यात सर्वत्र राबविण्याची सूचना केली. गावातील शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालये, आरोग्य केंद्रे या ठिकाणी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडण्उकीच्या प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून प्रभाग रचनेचा आरखडा महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शहरात ११५ वॉर्डमधून २९ प्रभाग तयार करण्यात आले असून पसिद्ध आराखड्याबाबत संबंधितांना सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती नोंदवता येणार आहेत.

बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना काल जाहीर करण्यात आली. सर्व संबंधितांनी अंतिम प्रभाग रचनेचे अवलोकन करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात राक्षसभुवन इथल्या शनिमंदिराला पाण्याचा वेढा पडल्याचं आमच्या वार्ताहरानं  कळवलं आहे.

****

हवामान

राज्यात मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. या भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम पावसासह सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज आहे.

 

 

 

 

No comments:

Post a Comment