Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 23 August 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ ऑगस्ट २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती
संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगर
मधल्या पैठणमधील फारोळा इथं पाणी पुरवठा योजनेचं जलपूजन होणार असून त्यानंतर या कामाची
पाहणी आणि आढावा देखील मुख्यमंत्री घेणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
उपस्थित काल मुंबईत विविध क्षेत्रातील गुंतवणुकीचे १० सामंजस्य करार करण्यात आले. त्यानुसार
राज्यात ४२ हजार ८९२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून याद्वारे २५ हजार ८९२
रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र हे डेटा सेंटर कॅपिटल; आणि सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल म्हणून
पुढे येत आहे, अनेक कंपन्या या क्षेत्रांत
येत असल्यानं उत्पादन क्षेत्रातही मोठी क्रांती घडणार आहे; असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
ब्रिटन समवेत झालेल्या रणनीतिक करारामुळे नवे दरवाजे उघडले असून भारतात अधिक गुंतवणूक
होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
***
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील
भारतीय कृषी संशोधन परिषदेत राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाचा शुभारंभ करतील. २०२५-२६
या वर्षात या योजनेचा खर्च २,४८१ कोटी रुपये आहे.
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाचे उद्दिष्ट मातीचे आरोग्य सुधारणे आणि शेतकऱ्यांचा
खर्च कमी करून हवामान बदलाचा सामना करणे हा आहे. शाश्वतता, हवामान बदल आणि सुरक्षित अन्नासाठी
वैज्ञानिक दृष्टिकोनांसह कृषी पद्धती मजबूत करण्यावर या अभियानाद्वारे भर देण्यात येणार
आहे.
***
येत्या तीन आणि चार सप्टेंबर रोजी
वस्तु आणि सेवा कर- जीएसटी परिषदेची छप्पन्नावी बैठक नवी दिल्लीत होणार आहे. केंद्रीय
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून, या बैठकी दरम्यान जीएसटीशी संबंधित
घेण्यात आलेल्या काही निर्णयांमध्ये बदल करण्याची शिफारस होण्याची शक्यता आहे. यात
पोषणयुक्त तांदळाच्या दरांमध्ये ५ टक्क्यांनी कपात करणं तसंच पॅक्ड आणि लेबल असलेल्या
वस्तुंची परिभाषा बदलण्याच्या निर्णयांचा समावेश आहे.
***
छत्रपती संभाजीनगर इथं आज डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६७ वा वर्धापन साजरा केला जात आहे. सकाळी नऊ वाजता कुलगुरू
डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर ध्वजारोहण करण्यात
आलं.
वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठातल्या
नाट्यगृहात सकाळी ११ वाजता जेष्ठ कृषी तज्ज्ञ कृषीरत्न विजय बोराडे यांचा जीवन साधना
पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. दरम्यान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे.
****
दिवाळी आणि छट पूजेनिमित्त प्रवाशांची
संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे विभागाने जालना- छपरा-जालना आणि तिरुपती-हिसार-तिरुपती
या विशेष रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. जालना-छपरा-जालना ही रेल्वेगाडी
२७ ऑगस्ट ते २६ नोव्हेंबर या कालावधीत दर बुधवारी जालन्याहून रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी
सुटेल आणि छपरा इथून शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजता परतीचा प्रवास सुरु करेल तर
एक ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत तिरुपती-हिसार-तिरुपती ही रेल्वे प्रत्येक
बुधवारी रात्री पावणे बारा वाजता तिरुपती इथून सुटेल आणि हिसार इथून रविवारी म्हणजे
चौथ्या दिवशी रात्री साडे ११ वाजता परतीचा प्रवास सुरु करेल.
***
येत्या २७ ऑगस्टला बुधवारी गणेश चतुर्थी
तसंच एक सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी पूजनानिमित्त स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.
या दिवशी लातूर इथल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग
बंद राहणार आहे, मात्र उद्या रविवारी
३१ ऑगस्ट आणि मंगळवारी दोन सप्टेंबरला बाह्यरुग्णविभाग नियमितपणे सुरु राहणार असल्याचं
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन जाधव यांनी कळवलं आहे.
***
ठाणे मध्यवर्ती कारागृहातील न्यायबंदींना
औषधोपचारासाठी कळव्यातील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात नेल्यानंतर
त्यांना तिथून बाहेर खासगी वाहनाने हॉटेलात मद्य पार्टीसाठी जाण्याला मोकळीक देणाऱ्या
ठाणे शहर मुख्यालयातील दोन पोलिस हवालदारांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आलं. पोलिस
हवालदार योगेश शेळके आणि गिरिश पाटील या दोघांवर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी
काल ही कारवाई केली.
***
येत्या २४ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी
मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भातल्या
काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. या भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या
पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम
पावसासह सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज आहे.
***
No comments:
Post a Comment