Sunday, 24 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.08.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 24 August 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

अखिल भारतीय विधीमंडळ पीठासीन अधिकारी परिषदेचे आज दिल्ली इथं आयोजन करण्यात आलं आहे. या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सकाळी साडे अकराच्या वाजता पार पडलं. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. या परिषदेला २९ राज्यांच्या विधानसभांचे सभापती, सहा राज्यांतील विधान परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित आहेत.

विधानसभेचे पहिले निर्वाचित अध्यक्ष विट्ठलभाई पटेल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त याचं आयोजन करण्यात आलं आहे. विधीमंडळ कामकाजाची सुधारित शैली, नव्या संसाधनांचा उपयोग तसंच कायदे निर्माणात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचं बळकटीकरणाचा परिषदेचा उद्देश आहे.

****

भारत आज रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म अर्थात  सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन या मंत्राद्वारे जागतिक मंदीला गतीने होणाऱ्या विकासासाठी उभारी देण्याच्या स्थितीत आहे. असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दिल्ली इथं एका खाजगी माध्यम संस्थेच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. आपला देश जगातील सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असून लवकरच जागतिक स्तरावर आपण तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर तसंच २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्यातही अग्रेसर आहोत असही ते म्हणाले.

वस्तु् आणि  सेवा कर - जीएसटीतील नव्या सुधारणांची प्रस्तावित प्रक्रिया दीवाळीपुर्वी पुर्ण होईल जेणेकरुन  देशभरात बहुतांश  वस्तुं स्वस्त होतील असही ते म्हणाले.

दरम्यान, भारत- अमेरिके दरम्यान व्यापार विषयक वाटाघाटी अद्यापही सुरु असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी याच कार्यक्रमात नमूद केलं.  देशातले शेतकरी आणि लघु उत्पादकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं जयशंकर म्हणाले. देशहित लक्षात घेऊनच कोणताही निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेनं भारताच्या तेल आयातीवर निर्बंध लादले असले, तरी सर्वात मोठा तेल आयातदार असलेल्या चीनला मात्र त्यामधून वगळल्याचं ते म्हणाले.

****

आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या रविवारी येत्या ३१ तारखेला सकाळी अकरा वाजता नागरीकांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १२५ वा भाग असणार आहे. यात जनतेला आपले विचार पोहोचवण्याची संधी असून यासाठी नि:शुल्क दुरध्वनी क्रमांक एक आठ शुन्य शुन्य- अकरा - सात आठ शुन्य शुन्य याचा उपयोग २९ ऑगस्टपर्यंत करता येणं शक्य असणार आहे.

****

फिट इंडीया मिहिमेंतर्गत ‘सायकलवरचा रविवार’ उपक्रमात देशभरात आज ठिकठिकाणी सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. आरोग्यविषयक जनजागृतीच्या या प्रभावी अशा आठवडी उपक्रमाद्वारे वैयक्तिक धडधाकटपणा हा आनंददायी-सर्वसमावेशक- समाजाभिमुख असल्याचा संदेश देण्यात येत आहे.

यानिमित्त, छत्रपती संभाजीनगर पोलिस अधिक्षक कार्यालयातर्फे आज  सकाळी साडे सहा वाजता दहा किलोमीटर सायकलेथॉन-२०२५चं आयोजन करण्यात आलं. शहरवासीयांनी  मोठ्या प्रमाणावर यात  सहभाग नोंदवला.

****

हिंगोली इथं आज जिल्हा पोलीस आणि राज्य राखीव पोलीस बल यांच्या संयुक्त विद्यमानं फिट इंडिया सायकल उपक्रम  घेण्यात आला.

 आज सकाळी संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली. नागरिक यात उत्स्फुर्तपणे सहभागी झाले.

****

परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड इथं आज जिल्हा पोलिस विभाग आणि गंगाखेड सायकल ग्रुपतर्फे अमली पदार्थांच्या विरुद्ध तसंच आरोग्याच्या जनजागृतीसाठी सायकल रॅली आणि माजी सैनिक,विद्यार्थी,नागरिकाची पायी प्रभात फेरी काढण्यात आली. या रॅलीला पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांसह अन्य प्रशासकीय अधिका-यांच्या उपस्थितीत हवेत तिरंगी फुगे सोडून सुरुवात करण्यात आली. नाशमुक्त गंगाखेड- नशामुक्त परभणी असा संदेश यातून देण्यात आला.

****

कॅनडामध्ये सुरू असलेल्या जागतिक युवा धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या चिकिथा तनिपर्थीनं महिलांच्या वैयक्तिक कनिष्ठ गट विभागात विजेतेपद मिळवत एतिहासिक कामगिरी केली आहे. हा किताब जिंकणारी चिकिथा ही पहिली भारतीय खेळाडु ठरली आहे.

तसंच या स्पर्धेत त्याआधी २१ वर्षांखालच्या भारतीय पुरुष संघानं विजेतेपद पटकावलं. कुशल दलाल, मिहिर अपार आणि गणेश मणी रत्नम यांनी कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.

****

कझाकस्तानच्या शिमकंद इथं आयोजित १६व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सुवर्णपदकांची संख्या आता २३ वर पोहोचली आहे. यासह भारतानं  आठ रौप्य, दहा कांस्य पदकांसह ४१ पदकं जिंकत पदकतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे. भारतानं दहा मीटर नेमबाजी प्रकारात वरिष्ठ आणि कनिष्ठ मिश्र गटात सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी केली आहे.

****

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेतर्फे 'कार ऑन ट्रे'न अर्थात आपल्या गाडीसह रेल्वेनं कोकणात येण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. काल या उपक्रमांद्वारे पहिल्या फेरीत नोंदणी केलेल्या पाच चारचाकींचा प्रवास संपन्न झाला.

या सेवेसाठी पनवेलमार्गे सिंधुदुर्गमध्ये नांदगाव आणि गोव्यात वेर्णे या दोन स्थानकावर हि सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

****

No comments:

Post a Comment