Monday, 25 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 25 August 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ऑगस्ट २०२ सकाळी.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या दौर्यावर असून, अहमदाबाद इथं पाच हजार ४०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये ६५ किलोमीटर लांबीच्या मेहसाणा - पालनपूर रेल्वे मार्गाचं दुपदरीकरण, कलोल - काडी - काटोसन रोड आणि बेचराजी - रानुज रेल्वे मर्गांचे गेज रुपांतरण आदी प्रकल्पांचा समावेश आहे.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोनं गगनयान मोहिमेसाठी महत्वाची असलेली पहिली एकत्रित एयर डॉप चाचणी काल यशस्वी केली. पॅराशुट धारित डिसीलरेशन यंत्रणा यामुळे प्रमाणित होण्यास मदत होणार आहे. इसरो, हवाईदल, डीआरडीओ, नौदल आणि तटरक्षक दल यांनी संयुक्तपणे ही चाचणी घेतली. गगनयान मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांना स्वदेशी बनावटीच्या यानातून अवकाशात पाठवणं आणि परत आणण्यात येणार आहे. यासाठी ही एयर ड्रॉप प्रणाली कौशल्यपूर्ण असणं आवश्यक आहे.

****

२०४७ पर्यंत भारत जगातील पहिल्या पाच क्रीडा राष्ट्रांमध्ये स्थान मिळवण्याची अपेक्षा क्रीडा मंत्री मनसुख मांडविय यांनी व्यक्त केली. अहमदाबाद इथं झालेल्या राष्ट्रकुल भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते काल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्रीडा क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे, आणि या क्षेत्रात अनेक सुधारणा करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

नांदेड - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. फडणवीस हे हजूर साहिब नांदेड इथून या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवतील. नांदेड ते मुंबई दरम्यानचं ६१० किलोमीटरचं अंतर ही गाडी साडे नऊ तासांत पूर्ण करेल.

****

गणेश मंडळांनी पुढाकार घेऊन शांततेत आणि उत्साहाच्या वातावरणात डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करावा, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समन्वय समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. मंडळांनी डीजे ऐवजी पारंपारिक वाद्य, ढोलताशे आणि इतर वाद्यांचा वापर करावा, असं त्यांनी सूचित केलं.

****

उमेद स्वयंसहायता समूह, ग्रामीण भागातल्या महिलांनी तयार केलेल्या गणपती मूर्तीची विक्री करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीनं गणपती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या विक्री स्टॉलचं उद्घघाटन काल माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते झालं. महिला बचत गटांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन कराड यानीं दिलं.

****

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेनं कार ऑन ट्रेन अर्थात आपल्या गाडीसह येण्याची अनोखी सुविधा गणेशभक्त कोकणवासीयांना उपलब्ध करून दिली आहे. कोकण रेल्वेच्या पहिल्या कार ऑन ट्रेननं शनिवारी कोलाड ते सिंधुदुर्ग प्रवास केला. या सेवेसाठी सिंधुदुर्गात नांदगाव आणि गोव्यात वेर्णे या दोन स्थानकावर ही सुविधा आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूप चांगला प्रवास झाल्याचं प्रवाशांनी सांगितल.

****

सोलापूर शहरात मिरवणुकींमध्ये वाढत चालेल्या डिजे डॉल्बीच्या वापरावर कायमची बंदी घालावी यासाठी आता जनआंदोलन उभं राहत आहे. डॉल्बी वापरावर बंदी घालून पारंपरिक वाद्यांना परवानगी देण्याचं आश्वासन जिल्हा प्रशासनानं दिलं असलं तरी डॉल्बी बंद होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका ज्येष्ठ नागरिकांनी घेतली आहे.

****

जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव इथं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले स्मारकाचं लोकार्पण काल अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते  झालं. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेच्या घेतलेल्या निर्णयामुळे वंचित समाजघटकांना न्याय मिळणार असून, हा निर्णय क्रांतिकारी ठरेल, असं भुजबळ यावेळी म्हणाले.

****

जैन धर्मियांच्या पवित्र पर्युषण पर्वाला सुरवात झाली आहे. भाद्रपद महिन्यात संवत्सरी या दिवशी आत्म्याच्या शुद्धतेसाठी आत्मचिंतन आणि सर्व सजीव प्राण्यांची क्षमायाचना असं आठ दिवस होणाऱ्या या उत्सवाचं स्वरूप आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी पर्वानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

बुलडाणा जिल्ह्यात संत नगरी शेगाव इथं कालपासून संत श्री गजानन महाराजांच्या ११५ व्या पुण्यतिथीचं औचित्य साधून ऋषीपंचमी उत्सवाला सुरुवात झाली. या उत्सवात पुढचे पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. संपूर्ण राज्यभरातून काल शेगाव शहरात दिंड्यांसह हजारो वारकरी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

****

कॅनडात विनीपेग इथं झालेल्या युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या स्पर्धेत प्रितिका प्रदीप हिने दोन रौप्य पदक, तर गाथा खडके आणि शर्वरी शेंडे यांनी कांस्य पदक पटकावलं. गाथा आणि शर्वरी यांनी अमेरिकेच्या संघावर अचूक निशाणा साधत एकतर्फी विजय मिळवला. या यशाबद्दल राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी खेळाडू आणि प्रशिक्षकांचं अभिनंदन केलं आहे.

****

No comments:

Post a Comment