Tuesday, 26 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 26 August 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ऑगस्ट २०२ सकाळी.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबाद इथं हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड्सचं स्थानिक उत्पादन आणि शंभर देशांमध्ये निर्यात होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्याचं उद्घाटन करणार आहेत. मेक इन इंडिया उपक्रमाचं उदाहरण असलेल्या भारतात उत्पादन केलेल्या सुझुकीच्या पहिल्या बॅटरी इलेक्ट्रिक वाहनाचं आणि प्रदर्शनाचं उद्घाटनही यावेळी होणार आहे. हे वाहन युरोप आणि जपानसारख्या प्रमुख बाजारपेठांसह शंभराहून अधिक देशांमध्ये निर्यात होणार आहे.

****

भारतीय नौदलाच्या उदयगिरी आणि हिमगिरी या दोन अत्याधुनिक स्टील्थ प्रकारच्या युद्ध नौकांचं जलावतरण आज विशाखापट्टणम इथल्या नौदल तळावर होत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होईल. या दोन्ही जहाजांमध्ये रचना, शस्त्रे आणि सेन्सर प्रणालीमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात आल्या असून, सागरी मोहिमांना सामोरं जाण्यासाठी त्या सक्षम असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली.

****

२०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र करण्यासाठी अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांचा समावेश असलेलं व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येत आहे. या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये, जनसामान्यांच्या संकल्पनांचं प्रतिबिंब असावं, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विकसित महाराष्ट्र २०४७ व्हिजन डॉक्युमेंटच्या प्रारूप मसुदा सादरीकरण बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वित्त आणि नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल आदी उपस्थित होते. यासाठी जनतेच्या संकल्पना जाणून घेण्यात आल्या असून यामध्ये चार लाखापेक्षा जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. विकसित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून समोर येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

****

पर्यावरणाच्या रक्षणासाठी एकेरी वापराच्या प्लॅस्टिकचा तसंच विविध कार्यालयांबरोबरच शासकीय, निमशासकीय कार्यालयांत प्लॅस्टिक बाटल्यांचा वापर पूर्णपणे थांबवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. शंभर दिवस प्लॅस्टिक बंदी अभियानाचा आरंभ त्यांच्या हस्ते काल कोल्हापूरमध्ये झाला; त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रमुख विकास प्रकल्पांचा आढावाही पवार यांनी घेतला.

****

कर्मचारी निवड आयोग हा निःपक्ष आणि पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी वचनबद्ध असल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे. तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी तसंच गैरप्रकार रोखण्यासाठी आयोगानं अनेक पावलं उचलली आहेत. परीक्षार्थींची ओळख निश्चित करण्यासाठी यंदा जुलै महिन्यापासून आधार प्रमाणीकरणाचा अवलंब केला जात असल्याचं आयोगाचे अध्यक्ष एस. गोपालकृष्णन यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर परिमंडलात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतल्या चार लाख २६ हजार ग्राहकांकडे दोन हजार २३८ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणने सुरु केली आहे. या महिन्यात छत्रपती संभाजीनगर शहरातल्या बावीसशे, ग्रामीण भागातल्या दोन हजार ६००, तर जालना मंडलातल्या एक हजारहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.

****

नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातल्या हसनाळ, रावणगाव, भिंगोली आणि भासवाडी इथल्या निरपराध नागरिकांचा बळी घेणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. पूरग्रस्त हसनाळ आणि मूकरामाबाद गावाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.

****

यवतमाळच्या महागाव आणि उमरखेड तालुक्यातल्या पूरग्रस्त शेती आणि बाधित गावांची पाहणी काल पालकमंत्री संजय राठोड यांनी केली. नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या प्रवरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पावसामुळे भंडारदरा आणि निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या साई केंद्रामध्ये १७ वर्षाखालील कॅडेट तलवारबाजी स्पर्धेचं उद्घाटन महात्मा गांधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांच्या हस्ते काल झालं. साईच्या संचालक डॉ. मोनिका घुगे, उपसंचालक कृषी विभाग शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यावेळी उपस्थित होते.

****

आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या २५ मिटर पिस्टल सांघिक प्रकारात भारताच्या नेमबाज मनु बाकर, इशा आणि सिमरनप्रीत ब्रार यांनी कांस्यपदक पटकावलं. चीनला सुवर्ण तर दक्षिण कोरियाच्या संघाला रौप्य पदक मिळालं.

****

अहमदाबाद मध्ये सुरु असलेल्या तिसाव्या राष्ट्रकूल भारोत्तालन क्रीडा स्पर्धेत काल पहिल्याच दिवशी भारतानं तीन सुवर्णपदकांची कमाई केली. महिलांच्या गटात प्रितीस्मिता भोई आणि मीराबाई चानू यांनी, तर पुरुषांच्या गटात धर्मज्योती देवघरियानं ही कामगिरी केली.

****

No comments:

Post a Comment