Wednesday, 27 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.08.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 27 August 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

गणरायाचं आज सर्वत्र उत्साहात आगमन होत आहे. नांदेडमध्ये सकाळपासून घरगुती श्रींच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी झाली आहे. पूजेच्या साहित्याची खरेदीही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. नांदेड जिल्ह्यात शहरी भागात एक हजार सार्वजनिक गणेश मंडळाकडून तर ग्रामीण भागात तीन हजाराहून अधिक मंडळाकडून श्रींची स्थापना केली जाणार आहे.

दरम्यान, गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत ५२ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना हद्दपार करण्यात आलं आहे. तर ५२७ सराईत गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

बीड जिल्ह्यातही लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी बालगोपालांसह ज्येष्ठांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. बीड शहरातील सिद्धिविनायक व्यापारी संकुल परिसरामध्ये गणेश मूर्ती विक्रीसाठी स्टॉल उभारण्यात आले आहेत.

मुंबईत मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा होत असून मंगलमूर्ती गणरायाची प्रतिष्ठापना घरोघरी होत आहे. सुमारे सव्वा लाख घरगुती आणि सुमारे 12 हजार सार्वजनिक मूर्तींची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तीभावानं केली जात आहे. मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात उत्सवासाठी 17 हजार 600 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

****

दरम्यान राज्य सरकारनं गणेश उत्सावादरम्यान रील स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत सहभागासाठी २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नावनोदणी आणि रील अपलोड करायचे आहेत. पर्यावरण संवर्धन, स्वदेशी, गडकिल्ले, संस्कृती, ऑपरेशन सिंदूर या संकल्पना मध्यवर्ती ठेवून ३० सेकंद ते ६० सेकंदापर्यंत रील बनविणे अपेक्षित आहे. स्पर्धेत विभागीय पातळी आणि राज्य पातळीवरील विजेत्यांना पारितोषिकं जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्र तसंच भारताबाहेरील विजेत्या गटातील स्पर्धकाला प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७५ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी ५० हजार रुपये आणि उतेजनार्थ म्हणून २५ हजार रुपये बक्षीस देण्यात येतील.

****

अनिश्चित आंतरराष्ट्रीय भौगोलिक आणि राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, सशस्त्र दलांनी अल्पकालीन संघर्षांपासून ते पाच वर्षांच्या युद्धापर्यंत सर्व प्रकारच्या सुरक्षा आव्हानांसाठी सज्ज राहिलं पाहिजे, असं प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे. मध्य प्रदेशातील महू इथल्या आर्मी वॉर कॉलेजमध्ये 'रण संवाद' कार्यक्रमाला त्यांनी आज संबोधित केलं. आजच्या युगात युद्ध एवढी आकस्मिक झाली आहेत की कोणतं युद्ध कधी संपेल आणि किती काळ टिकेल हे सांगणं खूप कठीण असल्याचं सिंग म्हणाले.

****

जम्मूमधील तावी नदीची पातळी कमी झाली आहे, मात्र चिनाब नदी धोक्याच्या पातळीच्या जवळून वाहत आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंग यांनी दिली. एसडीआरएफ, एनडीआरएफ, निमलष्करी दल, लष्कर आणि हवाई दलाचे अधिकारी नागरी प्रशासनाशी समन्वय साधत आहेत. वीज, पाणीपुरवठा आणि मोबाईल सेवा पूर्ववत करणे याला प्राथमिकता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पूरस्थितीचा नियमित आढावा घेत आहेत, अशी माहिती जितेंद्रसिंग यांनी दिली.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर, एनडीआरएफनं आपल्या तुकड्या तैनात केल्या आहेत. जम्मूमध्ये नऊ, सांबा आणि किश्तवाडमध्ये प्रत्येकी तीन आणि श्रीनगर, उधमपूर आणि रियासीमध्ये प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.

****

पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यातल्या नारंगी रोड वरील चामुंडा नगर आणि विजय नगर यांच्या मध्ये  असलेल्या रमाबाई अपार्टमेंट या चार मजल्याच्या इमारतीचा मागील भाग इमारती खाली असलेल्या चाळीवर कोसळला असल्याची दुर्घटना रात्री १२ वाजताच्या दरम्यान घडली. या दुर्घटनेत २४ वर्षीय महिला आणि तिच्या एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, पालघर इथल्या औषध निर्मिती कारखान्यात नायट्रोजन वायूच्या गळतीमुळं चार कामगारांचा मृत्यू आणि दोन जण जखमी झाल्याच्या वृत्ताची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना नोटीस पाठवून दोन आठवड्यांत या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागितला आहे.

****

हवामान

मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांसाठी पुढील तीन दिवस हवामान विभागानं पावसासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यासाठी  बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि नांदेड जिल्ह्यासाठी आज आणि उद्या यलो अलर्ट जारी केला आहे.

****

क्रिकेटपटू रविचंद्रन आश्विननं इंडियन प्रिमिअर लिग, आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. समाजमाध्यमावरील संदेशात आश्विवननं निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. आयपीएल स्पर्धेत १८७ बळी घेणारा आश्विन पाचवा गोलंदाज ठरला होता. स्पर्धेत आतापर्यंत आश्विन रायजिंग पुणे सुपरजायंट, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज आणि चेन्नई संघाकडून खेळला आहे.

****

क्रीडा भारती तसंच ऑलिंम्पिक संघटनेच्या वतीनं, शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर इथं ५५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. तापडिया नाट्य मंदिरात हा सोहळा आयोजीत करण्यात आल्याची माहिती ऑलिंम्पिक संघटनेचे छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी दिली.

****

No comments:

Post a Comment