Wednesday, 27 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 27 August 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ऑगस्ट २०२ सकाळी.०० वाजता

****

गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या सणातून नवीन ध्येयांसह सकारात्मकतेनं पुढे जाण्याची प्रेरणा मिळत असल्याचं राष्ट्रपतींनी संदेशात नमूद केलं आहे. तर, श्रद्धा आणि भक्तिभावानं भरलेला हा पवित्र सोहळा प्रत्येकासाठी मंगलदायी ठरो. गणरायाने आपल्या सर्व भक्तांना सुख, शांती आणि उत्तम आरोग्य द्यावे, अशी गणरायाकडे प्रार्थना, असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.

यंदा गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानं या उत्सवाची सांस्कृतिक ओळख आता आणखी दृढ होणार आहे. गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी ठिकठिकाणचं स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यात यंदा  दोन हजार ९४६ मंडळांतर्फे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यात १६० गावांमध्ये 'एक गाव, एक गणपती' हा उपक्रम राबवला जात आहे.

***

पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यातल्या नारंगी रोडवर असलेल्या रमाबाई अपार्टमेंट इमारतीचा मागील भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर काही जण जखमी झाले आहेत. वसई विरार महानगर पालिकेच्या अग्निशामक दल आणि राष्ट्रीय अपत्ती प्रतिसाद दलाच्या २ तुकड्यांच्या मदतीने बचाव कार्य सुरु आहे.

****

जम्मू-काश्मीरच्या कटरा भागात वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर भूस्खलन झालं असून, यात 30 जणांचा मृत्यू झाला. काल मुसळधार पावसामुळं मंदिराजवळ हे भूस्खलन झालं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी शहा यांच्याशी चर्चा केली आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या मदतीनं बचावकार्य सुरू केलं असून, जखमींना कटरा इथल्या आरोग्य केंद्रात हलवण्यात आलं आहे. पुरस्थितीत अडकलेल्या भाविकांना लष्करांकडून मदत पुरवण्यात आली असून आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दरम्यान, सततच्या पावसामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आज दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आला आहे.

****

पंजाबमध्येही रावी, बियास आणि सतलज नद्यांच्या काठावरील भागांत पूरस्थिती गंभीर होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना याबाबत इशारा देण्यात आला असून सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहे. गेल्या दोन दिवसांपासून पंजाबच्या अनेक भागांत, तर हिमाचल प्रदेश आणि जम्मू-कश्मीरमध्ये तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रणजीत सागर आणि पोंग धरण पूर्ण क्षमतेने भरली आहेत. पूरस्थिती पाहता पठाणकोट, गुरदासपूर, फाजिल्का, फिरोजपूर, होशियारपूर, कपूरथलासह सात जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक भागातल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असून, सीमा सुरक्षा दल, राष्ट्रीय अपत्ती प्रतिसाद दल आणि पंजाब पोलिस मदतकार्य करत आहेत. दरम्यान, राज्यातील सर्व शाळांना ३० ऑगस्टपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

****

गव्हाची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारनं गव्हाच्या साठ्यावर मर्यादा घातली आहे. घाऊक व्यापाऱ्यांसाठी साठवणूक मर्यादा तीन हजारावरून दोन हजार टन तर किरकोळ विक्रेत्यांसाठी ही मर्यादा आठ टन इतकी केली आहे. गव्हाची साठवणूक करणाऱ्या सर्व संबंधितांनी त्यांच्याकडच्या साठ्याची माहिती जाहीर करावी आणि दर शुक्रवारी व्हीट स्टॉक पोर्टलवर माहिती अद्ययावत करावी अशा सूचना ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं दिल्या आहेत.

****

 

भगवान महावीर यांनी प्रचार केलेल्या विचारांमध्ये जीवदया आणि भूतदयेला सर्वोच्च स्थान आहे. आपण केवळ माणसासाठी नाही, तर सर्व सजीवांची काळजी घेत असतो. असे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुंबईसाठी पर्युषण महापर्वानिमित्त श्रीमद् राजचंद्र मिशन, धरमपूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात काल फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जैन धर्माचे साधू उपस्थित होते. जगातील इतर प्राचीन संस्कृती फक्त अवशेष रूपात उरल्या,  परंतु भारतीय संस्कृती आजही जिवंत असून, आपण अध्यात्माचा कधीही त्याग केला नाही, असे फडणवीस यांनी सांगितलं.

****

तंत्रज्ञानाचा वापर करून भूमी अभिलेख व्यवस्थापन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी महसूल विभागानं 'महाभूमी' संकेतस्थळावर 'भूमित्र' या चॅटबॉट सेवेची सुरुवात केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते काल मंत्रालयात या सेवेचं उद्घाटन करण्यात आलं. ही सेवा नागरिकांना महसुलच्या सेवा अधिक जलद आणि सोप्या पद्धतीने मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

****

जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. ग्रामपातळीवरील जनतेशी सातत्याने सुसंवाद ठेवणे आणि त्यांचे प्रश्न त्वरीत सोडवण्यावर भर द्यावा, असं मित्तल यांनी स्पष्ट केले.

****

सिफ्त कौर सामरा हिनं कझाकस्तान येथे 16 व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 50 मीटर राइफल थ्री प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. सामरानं भारताला सांघिक कामगिरीतही सुवर्णपदक जिंकून दिलं.

****

No comments:

Post a Comment