Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 02 September 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ सप्टेंबर २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
नवी दिल्लीतील यशोभूमी इथे सेमीकॉन इंडिया २०२५ या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. देशात
मजबूत, लवचिक आणि टिकाऊ सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाला
चालना देण्याच्या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी, उद्या सी ई ओ गोलमेज परिषदेत सहभागी
होणार आहेत.
****
सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेंस वोंग आज ३ दिवसांच्या भारत
दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील आणि भारतातील
उद्योगपती तसंच व्यापाऱ्यांशी बातचीत करतील. या दौऱ्यादरम्यान लॉरेंस वोंग कौशल्य
विकास, वित्त आणि डिजिटल, नागरिक
उड्डयन, अंतरिक्ष आणि नौवहन क्षेत्रात सहकार्यासह अनेक सामंजस्य
करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे. सिंगापूरचे पंतप्रधान वोंग राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसंच शिक्षण मंत्री धर्मेंद्र
प्रधान यांची भेट देखील घेणार आहेत.
****
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेनं स्थापनेपासून
गेल्या आठ वर्षांमध्ये १२ कोटींहून अधिक ग्राहक जोडले आहेत, अब्जावधी डिजिटल व्यवहारांवर प्रक्रिया
केली आहे आणि देशभरात घरपोच बँकिंग सेवा सक्षम केल्या असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं
आहे. दळणवळण मंत्रालयानं काल एका निवेदनात सांगितलं की, १ लाख ६४ हजारांपेक्षा जास्त टपाल कार्यालयं आणि १ लाख
९० हजारांपेक्षा अधिक पोस्टमन आणि ग्रामीण
डाक सेवक यांच्या अतुलनीय संपर्काचा लाभ यासाठी होत आहे. भारतातील सामान्य माणसासाठी
सर्वात सुलभ, परवडणारी आणि विश्वासार्ह
बँक म्हणून इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची
२०१८ मध्ये सुरुवात करण्यात आली.
****
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे
यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान, आंदोलकांमुळे या परिसरातील रस्त्यांवर प्रचंड गर्दी झाल्याने
दुपारी बारा वाजेपर्यंत रस्ते मोकळे करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने काल मराठा आंदोलकांना
दिले होते. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील रस्ता हळूहळू आंदोलकांनी
मोकळा करण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यात ठिकठिकाणी उभी केलेली वाहनं हलवण्यास सुरुवात
झाली आहे. अटी आणि शर्तींचा भंग केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना
नोटीस बजावली आहे. दरम्यान, आज दुपारी एक वाजता पुन्हा
न्यायालयात या प्रकरणी सुनावणी घेण्यात येणार असून न्यायालय या सर्व परिस्थितीचा आढावा
घेणार आहे. रस्ते मोकळे न केल्यास सरकार योग्य ती कारवाई करू शकते, असेही न्यायालयाने काल म्हटले होते.
****
गेल्या काही दिवसातल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातले
बहुतांश मोठे पाणीप्रकल्प १०० टक्के तर मध्यम आणि लघू प्रकल्प सरासरी ७५ टक्क्यांहून
अधिक भरले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं जायकवाडी धरण सुमारे ९८ टक्के तर जिल्ह्यातले
१६ मध्यम प्रकल्प ५८ टक्के, जालना जिल्ह्यातल्या ७ प्रकल्पात ५५ टक्के, लातूर जिल्ह्यातल्या ८ मध्यम प्रकल्पात ७५ टक्के , धाराशिव जिल्ह्यातल्या १७ प्रकल्पात ९० टक्के , नांदेड मधल्या ९ धरणात ९१ टक्के तर परभणीतल्या २ प्रकल्पांमध्ये
सध्या ८० टक्के इतका पाणीसाठा आहे.
दरम्यान, कोकण, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात हवामान विभागाने आज
आणि उद्या यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यात आज पावसाची शक्यता आहे.
विदर्भातल्या काही जिल्ह्यांना आज आणि उद्या तर कोकणात उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला
आहे.
****
पुणे शहरातल्या सिंहगड रस्त्यावर
उभारण्यात आलेल्या राजाराम पुलापासून ते फन टाईम थिएटरपर्यंतच्या उड्डाणपूलाचं काल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. ३ टप्प्यातल्या अडीच
किलोमीटर लांबीच्या या पुलामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासोबत शहरातलं
प्रदूषणही कमी होणार आहे. पुणेकरांना या मार्गावर लागणारा तीस मिनिटाचा कालावधी आता
सहा मिनिटांवर आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस
यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक ते शनिवार पेठ
यांना जोडणाऱ्या पादचारी पुलाचं उद्घाटनही काल करण्यात आलं.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काल पुण्यातील
सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन श्रीगणेशाचं दर्शन घेतलं.
****
अवैध रेती वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला
नांदेड पोलिसांनी जेरबंद केलं असून त्याच्याकडून ३० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमालही
जप्त करण्यात आला आहे. ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत नांदेड पोलिसांनी ही कारवाई केली.
****
राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत धाराशिव
जिल्ह्यानं दोन सुवर्ण आणि एक कांस्यपदक पटकावलं. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन
आणि बृहन महाराष्ट्र योग परिषद यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आलेल्या वरिष्ठ गटातील
स्पर्धेत धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या योगपटूंनी ही कामगिरी केली.
****
No comments:
Post a Comment