Monday, 8 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.09.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 08 September 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांना, तर इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना पक्षाच्या खासदारांची एक बैठक आज दिल्लीत बोलावण्यात आली आहे.

****

नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या भाजप खासदारांच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या सांगता समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबोधित करणार आहेत. उद्या होणार्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेचं मुलभूत प्रशिक्षण खादारांना देण्यासाठी ही कार्यशाळा काल सुरु झाली. संयुक्त लोकशाही आघाडीतल्या इतर पक्षांचे खासदारही आज या कार्यशाळेत सहभागी होतील.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पूरग्रस्त पंजाबला भेट देऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तिथल्या बाधित नागरिकांना त्वरित मदत देण्यासाठी ते पाहणी करतील. यापूर्वी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील परिस्थितीचा आढावा घेतला होता. पूर ओसरत असून, प्रशासनाने पंजाबमध्ये शाळा आणि महाविद्यालयं सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये अद्याप ४८ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. गंगा, यमुना, शारदा, रामगंगा या प्रमुख नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. ४१ हजार हेक्टर पेक्षा जास्त जमीन पाण्याखाली गेली असून, मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू आहे.

****

वस्तु आणि सेवा कर - जीएसटीमधल्या व्यापक सुधारणा सहकारी क्षेत्राला बळकटी देतील, उत्पादने अधिक स्पर्धात्मक होतील, उत्पादनांची मागणी वाढेल आणि सहकारी संस्थांचं उत्पन्न वाढेल, असा विश्वास सहकार मंत्रालयानं व्यक्त केला आहे. जीएसटी सुधारणा ग्रामीण उद्योजकता आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातल्या सहकारी संस्थांना प्रोत्साहन देतील आणि लाखो कुटुंबांना आवश्यक वस्तु परवडणार्या दरात उपलब्ध होतील. देशातल्या दहा कोटीहून अधिक दुग्ध उत्पादकांना या सुधारणांचा फायदा होईल, शाश्वत कृषी प्रणालींना चालना मिळेल आणि लहान शेतकर्यांना फायदा होईल, असंही मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

****

जम्मू आणि काश्मीरमध्ये कुलगाम इथल्या गुड्डुर वन क्षेत्रात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. सैन्य दलाच्या शोध मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. यात सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

****

जम्मू काश्मीरमध्ये, श्री माता वैष्णोदेवीची यात्रा आज सलग १४ व्या दिवशीही प्रतिकूल हवामान आणि भूस्खलनांमुळे स्थगित ठेवण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे मंदिराकडे जाणारे रस्ते बंद झाले आहेत. हवामान परिस्थिती सुधारल्यानंतर आणि रस्ता सुरक्षित झाल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल, असं स्थानिक प्रशासनानं कळवलं आहे.

****

राष्ट्रीय तपास संस्था - एनआयएकडून दहशतवादी कारस्थानप्रकरणी देशभरात २२ ठिकाणी मोठी शोधमोहिम राबवली जात आहे. जम्मू काश्मीरमधल्या नऊ, बिहार आठ, उत्तर प्रदेश दोन, तर महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू  या राज्यांमध्ये प्रत्येकी एक ठिकाणी ही शोधमोहिम राबवली जात आहे.

****

आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस पाळला जातो. साक्षरतेचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असून, डिजिटल युगात साक्षरतेला प्रोत्साहन, ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे.

****

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येणार आहेत. शहरातल्या विविध विकास कामांचा ते आढावा घेणार आहेत. संत एकनाथ रंग मंदिरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यालाही शिंदे उपस्थित राहणार आहेत.

****

भंडारा जिल्ह्यात साकोली महामार्गाजवळ काल संध्याकाळी झालेल्या अपघातात नऊ महिला गंभीर जखमी झाल्या. या महिला शेतातील काम संपवून रिक्षानं परत जात असताना नागपूरहून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

****

भंडारा शहरात पंचवीस दिवसांपूर्वी घडलेल्या टिंकू खान दुहेरी हत्याकांडात अटक केलेल्या चारही आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर अकरा आरोपींना तडीपार करण्यात आलं आहे. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचं पोलीस अधिक्षकांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक - २०२५ च्या विरोधात जन सुरक्षा विरोधी कृती समितीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकात १० सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. परभणी इथं देखील हे आंदोलन करण्यात येणार असून, महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांची काल यासंदर्भात बैठक झाली. खासदार संजय जाधव, माजी आमदार विजय गव्हाणे, भाकप नेत्या माधुरी क्षीरसागर यावेळी उपस्थित होत्या.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. धरणात सध्या ३३ हजार ८१९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, १८ दरवाजातून ३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरु आहे.

****

No comments:

Post a Comment