Monday, 8 September 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.09.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 08 September 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०८ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      उपराष्ट्रपतीपदासाठी उद्या मतदान-महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत

·      व्हिजन डॉक्युमेंट २०४७ नुसार राज्याची धोरणं तयार करावेत-मुख्यमंत्र्यांचं आवाहन;वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल १५ ऑक्टोबर पर्यंत सादर करण्याचे निर्देश 

·      उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर

·      हैदराबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षणात समावेश करण्याची बंजारा समाजाची मागणी

आणि

·      ईद ए मिलादुन्नबी निमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथं मुस्लीम धर्मियांचा शांततेत जुलूस

****

उपराष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. रालोआचे उमेदवार, महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत होणार आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य या निवडणुकीत मतदान करतील. लोकसभेचे ५४२ आणि राज्यसभेचे २३९ सदस्य मिळून ७८१ सदस्य उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान करणार आहेत. उमेदवाराला विजयासाठी ३९१ मतांची आवश्यकता आहे.

****

व्हिजन डॉक्युमेंट २०४७ ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्त्वं असून, या व्हिजन नुसार भविष्यातील राज्याची धोरणं तयार करावीत असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. सह्याद्री अतिथीगृह इथं विकसित महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट २०४७ बाबत झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव तसंच प्रधान सचिव उपस्थित होते. पाणी, वीज, शिक्षण, सामाजिक कल्याण, उद्योग आणि सेवा, तंत्रज्ञान तसंच अर्थकारण, या विषयांवर आजच्या बैठकीत सादरीकरण झालं.

 

राज्यातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला गती देण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील पाणीटंचाई दूर करण्यासोबतच शेतीला शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. याबाबतच्या आर्थिक नियोजनासाठी केंद्र सरकारकडे निधी संदर्भात पत्र पाठवून पाठपुरावा केला जाईल आणि राज्य सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

****

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगर इथं विमानानं आगमन झाले. सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सिरसाट यांनी विमानतळावर शिंदे यांचं स्वागत केलं. यावेळी आमदार संजना जाधव, आमदार प्रदीप जैस्वाल, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त जी.श्रीकांत, यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

****

राष्ट्रीय तपास यंत्रणेनं दहशतवादाच्या कटाच्या तपासादरम्यान पाच राज्यं आणि जम्मू-काश्मीरमध्ये एकंदर २२ ठिकाणी छापे टाकले. बिहारमधल्या आठ, कर्नाटक, तमिळनाडू आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकी एक, उत्तर प्रदेशातल्या दोन आणि जम्मू-काश्मीरमधल्या दोन ठिकाणी एनआयएनं ही कारवाई केली.

                                 ****

जीएसटी पुनर्रचनेत सरकारने वाहनं तसंच वाहतुकीसंबंधित विविध घटकांवरच्या करात कपात केली आहे. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

दहा आणि त्यापेक्षा जास्त आसन संख्या असलेली खाजगी वाहनं, १२०० सी सी पेक्षा कमी क्षमता असलेली पेट्रोल, एल पी जी किंवा सी एन जी वाहनं, तसंच दुहेरी इंधन क्षमतेची वाहनं, १५०० सी सी पेक्षा कमी इंधन क्षमता असलेली डिझेलवर चालणारी वाहनं, अद्ययावत रुग्णवाहिकेसाठी लागणारं साहित्य, रिक्षा, वस्तुंची वाहतूक करणारी वाहनं यांवरचा जीएसटी २८ टक्क्यावरून १८ टक्के करण्यात आला आहे. ट्रॅक्टरच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या साहित्यावरचा कर १८ टक्क्यावरून ५ टक्के करण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्रात वापरले जाणारे रणगाडे आणि तत्सम संरक्षक वाहनं आणि त्यांच्यातल्या साहित्यावरचा तसंच, शेतीसाठी लागणारे स्वयंचलित ट्रेलर्स, बैल किंवा घोडागाडी यांच्यावरचा कर १२ टक्क्यावरून ५ टक्के करण्यात आला आहे.

****

राष्ट्रीय अंधत्व निवारण आणि दृष्टिदोष नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जागतिक आरोग्य संघटनेचा ‘स्पेक्स २०३०- वन साईट प्रकल्प राज्यातल्या गडचिरोली जिल्ह्यासह देशातल्या पाच मागास जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, जनजागृती, शाळा आणि ग्रामपंचायत स्तरावर आरोग्यविषयक संवाद यासारखे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

****

इतर मागास वर्ग ओबीसींचं नुकसान होईल असा कोणताही निर्णय घेतला नसून सरकार ओबीसींना काहीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर उद्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलावली असल्याचं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं.

****

मराठा आरक्षणाबाबत सरकारमध्येच एकमत नसल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी सरकारला ओबीसी विरुध्द मराठा वाद उभा करायचा आहे, असा आरोपही पवार यांनी सरकारवर केला.

****

बीड शहरात आज अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी बंजारा समाजाची बैठक घेण्यात आली. यात हैदराबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षणात बंजारा समाजाचा समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी येत्या १५ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर तात्काळ तोडगा काढावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी बंजारा समाजानं दिला आहे. हे आरक्षण लागू करण्याबाबत बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज आमदार विजयसिंह पंडित यांना निवेदन सादर केले. या मागणीला पंडित यांनी पाठिंबा दिला असून यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

****

ईद ए मिलादुन्नबी निमित्त आज छत्रपती संभाजीनगरातून जुलूस ए मोहमंदी काढण्यात आला. मुस्लीम धर्मियांचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीदिनी, परवा हा जुलूस काढला जाणार होता. मात्र अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाच्या आवाहनाला मान देऊन, हा जुलूस आज काढण्यात आला. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी या जुलूसला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी आयोजकांचं पवार यांनी कौतुक केलं. ते म्हणाले

बाईट - प्रवीण पवार, पोलिस आयुक्त

****

छत्रपती संभाजीनगरातून अंमली पदार्थ व्यवहारांचं समूळ उच्चाटन करणार असल्याचा निर्धार पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी व्यक्त केला आहे. यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावं, आणि भावी पिढीची अंमली पदार्थांच्या विळख्यातून सुटका करावी, असं आवाहन पवार यांनी केलं आहे. ते म्हणाले

बाईट - प्रवीण पवार, पोलिस आयुक्त

****

धुळे शहर तसेच जिल्ह्यातही आज पैगंबर जयंती उत्साहात साजरी होत आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नाद पठण असे कार्यक्रम होत आहेत.

****

परभणी जिल्ह्यात धारणगाव इथं ई-पीक पाहणीला गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने शोध कार्य सुरू केलं. मात्र, त्याचा मृतदेह घटनास्थळापासून पुढे काही अंतरावर असलेल्या समसापूर बंधाऱ्यात सापडला.

****

पालम तालुक्यातल्या खोरस गावातील परमेश्वर खंडागळे यांचाही पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी रंजनाबाई खंडागळे यांना आमदार रत्नाकर गुट्टे, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या उपस्थितीत शासनाच्या वतीनं चार लाख रुपये मदतीचा धनादेश आज देण्यात आला.

****

दरम्यान, धारणगाव इथल्या नदीवरील पुलाच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. नदी ओलांडून जात असताना गजानन डुकरे या युवकाचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी त्याचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणत आंदोलन केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात गंगापूर वैजापूर महामार्गावर दुचाकी आणि स्कॉर्पिओ जीप यांच्यात आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात एका कुटुंबातील तीन जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला. मृतांमध्ये एका तरुण तरुणीसह सुमारे वर्षभराच्या अर्भकाचा समावेश आहे.

****

जालन्याच्या जिल्हाधिकारी आमिषा मित्तल यांनी आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत शहर विकासासंबंधी स्वच्छता, प्रदुषण, कचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचे नियोजन अतिक्रमण, कर वसुली आणि सौंदर्यीकरण यांसह विविध महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली.

****

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील परतूर आणि सेलू रेल्वे स्थानकावरील जनशताब्दी एक्सप्रेसच्या प्रायोगिक थांब्याला पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत १४ सप्टेंबरला संपणार होती.

****

No comments:

Post a Comment