Monday, 8 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.09.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 08 September 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ सप्टेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या भाजप खासदारांच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या सांगता समारंभाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. उद्या होणार्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेचं मुलभूत प्रशिक्षण खादारांना देण्यासाठी ही कार्यशाळा काल सुरु झाली. संयुक्त लोकशाही आघाडीतल्या इतर पक्षांचे खासदारही आज या कार्यशाळेत सहभागी होतील. वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी जीएसटी सुधारणांवरील ठराव या कार्यशाळेत सादर केला आणि भाजप संसदीय सदस्यांनी त्याला एकमताने मंजुरी दिली.

****

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आज पाळला जातो. साक्षरतेचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असून, डिजिटल युगात साक्षरतेला प्रोत्साहन, ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे.

****

जगभरातल्या आकाश निरीक्षकांनी काल खग्रास चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद घेतला. या वर्षातलं हे दुसरं चंद्रग्रहण असल्यानं ब्लड मून म्हणूनही या पर्वणीला महत्व प्राप्त झालं होतं.

परभणी इथं ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीनं वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठातल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात खगोलप्रेमी आणि विद्यार्थ्यांनी टेलिस्कोपद्वारे चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद घेतला. ग्रहणाच्या वेळी पाळल्या जात असलेल्या विविध अंधश्रद्धांबद्दल डॉ. रामेश्वर नाईक यांनी यावेळी जनजागृती केली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबरला असलेल्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने २१ सप्टेंबरला देशभरातल्या ७५ ठिकाणी नमो युवा रन या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी दिल्लीत काल कार्यक्रमाची माहिती दिली. या उपक्रमात दहा लाखाहून अधिक तरुण सहभागी होणार आहेत. युवकांनी तंदुरुस्त रहावं, आरोग्याची काळजी घ्यावी आणि अंमली पदार्थांपासून दूर रहावं यासाठी जागृती करण्याचा या उपक्रमाचा उद्देश असून, दहा लाख युवक सहभागी होण्याची शक्यता असल्याचं भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांनी यावेळी सांगितलं.

****

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येणार आहेत. शहरातल्या विविध विकास कामांचा ते आढावा घेणार आहेत. संत एकनाथ रंग मंदिरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यालाही शिंदे उपस्थित राहणार आहेत.

****

भारतीय कर्मचारी संघ आणि स्वाभिमानी संघ यांच्याद्वारे आद्य क्रांतिवीर उमाजीराजे नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र तसंच कर्नाटक राज्याचं पहिलं संयुक्त राज्य अधिवेशन काल सांगली इथं पार पडलं. दोन सत्रांमध्ये पार पडलेल्या या अधिवेशनाला भारतीय कर्मचारी संघाचे अध्यक्ष डी. आर. ओहोळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

****

एका निरपराध इसमाच्या खुनाच्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या छत्तीसगड राज्यातल्या शंकर उर्फ अरुण येर्रा मिच्चा या नक्षल्यास गडचिरोली पोलिसांनी तेलंगणा राज्यातल्या हैदराबाद इथून अटक केली. शासनाने त्याच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं होतं.

****

हिंगोलीत काल मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळेचं उद्घाटन आमदार तानाजी मुटकुळे आणि हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या हस्ते झालं. याअंतर्गत १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान विविध गावांमध्ये स्वच्छता, आरोग्यासंदर्भात तपासणी होणार आहे. यानंतर तालुका आणि जिल्हा परिषद यांच्या मार्फत तपासणी करण्यात येणार आहे. उत्कृष्ट ग्रामपंचायतींना शासनामार्फत बक्षीस देण्यात येणार आहे.

****

महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक - २०२५ च्या विरोधात जन सुरक्षा विरोधी कृती समितीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकात १० सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. परभणी इथं देखील हे आंदोलन करण्यात येणार असून, महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांची काल यासंदर्भात बैठक झाली. खासदार संजय जाधव, माजी आमदार विजय गव्हाणे, भाकप नेत्या माधुरी क्षीरसागर यावेळी उपस्थित होत्या.

****

भारतीय पुरुष हॉकी संघानं आशियाई स्पर्धेचं विजेतेपदक पटकावलं आहे. बिहारमधल्या राजगीर इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण कोरियावर चार - एक असा विजय मिळवला. या विजयासह भारत २०२६ मध्ये नेदरलँड आणि बेल्जिअम मध्ये होणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. गतविजेत्या संघाला नमवत अभिमानास्पद कामगिरी केल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. धरणात सध्या ३३ हजार ८१९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणाचे १८ दरवाजे दोन फूट उघडून ३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद पाणी सोडलं जात आहे.

लातूर शहराला पाणीपुरवठा करणारा मांजरा प्रकल्पही जवळपास ९९ टक्के भरला आहे. धरणातून सध्या एक हजार ७४७ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

****

No comments:

Post a Comment