Tuesday, 9 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.09.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 09 September 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

देशाच्या १७ व्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, उपसभापती हरिवंश, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक सदस्यांनी मतदान केलं. सकाळी दहा वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालेल. मतमोजणीला सायंकाळी सहा वाजेपासून सुरूवात होईल. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार, महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत आहे. लोकसभेचे ५४२ आणि राज्यसभेचे २३९ सदस्य, असे एकूण ७८१ खासदार या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. या निवडणुकीत उमेदवाराला विजयासाठी किमान ३९१ मतांची आवश्यकता आहे. दरम्यान, या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय बिजू जनता दल आणि भारत राष्ट्र समिती या दोन पक्षांनी घेतला आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेश आणि पंजाबला भेट देऊन दोन्ही राज्यांमधील पूर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दोन्ही राज्यांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळं मोठं नुकसान झालं आहे. याठिकाणी ते संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असून सर्व आपत्ती प्रतिसाद दल तसंच स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

****

राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याचं आज वितरण करण्यात आलं. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या सहा हजार रुपये मदतनिधीला राज्य सरकारचे सहा हजार रुपये जोडून देण्यात येतात. तीन टप्प्यात या रक्कमेचं वितरण करण्यात येतं. मुंबईत मंत्रालयात आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पात्र शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित करण्यात आला. ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या खात्यावर १८९२ कोटी ६१ लाख रुपये जमा झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमानंतर सांगितलं.

****

यंदाच्या खरीप हंगामात देशात १०१ कोटी ५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याचं कृषी विभागानं जारी केलेल्या आकड्यात म्हटलं आहे. या पेरणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास २७ लाख हेक्टरनं वाढ झाली असल्याचं विभागानं म्हटलं आहे.

****

राष्ट्रीय आरोग्य अभियानातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गेल्या २१ दिवसांपासून संप सुरू आहे. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवर परीणाम होत असून, क्षयरोग निदान, पोषण पुनर्वसन केंद्र आणि नवजात शिशू काळजी विभागासारख्या महत्त्वाच्या सेवा विस्कळीत झाल्या आहे.

****

ऑपरेशन सिंदूर दरम्यान सर्व भारतीय उपग्रह २४ तास कार्यरत होते. तसंच मोहिमेच्या आवश्यकतांची पूर्तता करणारे ठरले, असं प्रतिपादन भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी इस्रोच्या कामगिरीची माहिती दिली.

****

नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथल्या राहुड घाटात गॅस कंटेनरला अपघात झाला आहे. यामुळे होणाऱ्या गॅस गळतीमुळे वाहतूक मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. अजुनही गॅसची गळती सुरू असुन अन्य कंटेनर मध्ये गॅस हलवण्याचे काम सुरू आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक मनमाड आणि देवळा मार्गे वळवण्यात आली आहे.

****

नेपाळ सरकारनं समाजमाध्यमांवरील बंदी मागं घेण्याचा निर्णय घेतला आहे. काल युवकांनी सरकारच्या विरोधात केलेल्या निदर्शानंतर नेपाळ सरकारनं हा निर्णय घेतला. कालच्या निदर्शनादरम्यान १९ युवकांचा मृत्यू झाला तर ३०० पेक्षा अधिक जखमी झाले. दरम्यान, नेपाळमध्ये झालेल्या विरोध प्रदर्शनादरम्यान झालेल्या युवकांच्या मृत्यूबद्दल भारतानं शोक व्यक्त केला आहे. दोन्ही बाजूंनी शांततापूर्वक तोडगा काढण्याचं आवाहन भारतानं आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात केलं आहे. संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर काठमांडू आणि इतर शहरांमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना नेपाळ सरकारनं वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

पैठणच्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी ९८.३५ टक्के एवढी झाली आहे. धरणात सध्या सोळा हजार ६२२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, धरणाच्या १८ दरवाजातून २८ हजार २९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग करण्यात येत आहे.

हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर धरणाची पाणीपातळी ९८ टक्क्याच्या वर गेली आहे. धरणाच्या पाच दरवाजातून ५ हजार २४० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी पेनगंगा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

****

१७ व्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना आज अबू धाबी इथं अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. उद्या भारताचा पहिला सामना संयुक्त अरब अमिरातसोबत दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होईल.

****

No comments:

Post a Comment