Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 September
2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
· गुंतवणूक आणि उद्योगांसाठी राज्यात पोषक वातावरण-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन;राज्य सरकारचे विविध कंपन्यांसोबत एक लाख आठ हजार ५९९ कोटी रुपयांचे सामंजस्य करार
· महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून राजीनामा-गुजरातचे
राज्यपालांकडे अतिरिक्त कार्यभार
· आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतला भारत-पाक सामना रद्द करण्याच्या याचिकेवर तातडीनं
सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
आणि
· स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात येत्या शनिवारी भव्य रोजगार मेळाव्याचं
आयोजन
****
इज ऑफ डूईंग बिसनेस अंतर्गत राज्यात गुंतवणूक आणि उद्योगांसाठी
पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज मुंबईत
इंडिया ऑस्ट्रेलिया फोरमच्या ग्लोबल लीडर मीट या परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. गुंतवणूकदार
आणि उद्योजकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राज्यशासन सदैव तत्पर असल्याची ग्वाही
मुख्यमंत्र्यांनी दिली. येत्या काळात १४ क्षेत्रांसाठीची धोरणं जाहीर होणार आहेत, त्यामध्ये सेवा क्षेत्राचा समावेश असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, आपले सरकार २.० पोर्टल तंत्रज्ञानस्नेही
करून,
ते कार्यान्वीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
ते आज मुंबईत ‘समग्र’ या
संस्थेसोबत झालेल्या या संदर्भातल्या बैठकीनंतर बोलत होते. याबाबत अधिक माहिती देतांना
मुख्यमंत्री म्हणाले –
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान, राज्य सरकारनं तब्बल एक लाख
आठ हजार ५९९ कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले असून, या
गुंतवणुकीतून एकूण ४७ हजार १०० इतक्या रोजगारांची निर्मिती होणार आहे. मुंबईत वार्ताहरांशी
बोलतांना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले –
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
हैदराबाद गॅझेटियरचा शासननिर्णय ओबीसी समाजाच्या आरक्षणाला बाधा
पोहोचवत नसल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला आहे. या शासननिर्णयाविरोधात ओबीसी
नेते न्यायालयात दाद मागणार असल्याच्या प्रश्नावर बोलतांना, मुख्यमंत्र्यांनी या सर्व नेत्यांना सदरील शासननिर्णय पुन्हा एकदा नीट वाचण्याचं
आवाहन केलं –
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना
ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी आजपासून वितरित केला जाणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री
आदिती तटकरे यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या
आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी थेट जमा केला जाणार आहे.
****
केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानांकनामध्ये
शंभरपैकी ९३ गुण मिळवत राज्यातील महावितरणनं देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. महावितरणचे
अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ही माहिती दिली. या यशाबद्दल आपण
मुख्यमंत्र्याचे आभार मानतो तसंच महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो, असं लोकेश चंद्र यांनी म्हटलं आहे.
****
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांची उपराष्ट्रपतीपदी
निवड झाल्यामुळे आज महाराष्ट्राच्या राज्यपाल
पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत
यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतला भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याची
मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे.
येत्या १४ सप्टेंबर रोजी हा सामना होणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर
पाकिस्तानसोबत खेळल्यानं राष्ट्रीय प्रतिष्ठेला धक्का बसेल, असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे. मात्र यावर तातडीने सुनावणी घ्यायला न्यायमूर्ती
जे. के. महेश्वरी आणि विजय बिश्नोई यांच्या पीठानं नकार दिला.
****
भारतीय सैन्याच्या IASV त्रिवेणी या बोटीच्या पहिल्या परिक्रमेला आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी
दूरस्थ पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथून सुरू झालेल्या या
मोहिमेत भूदल,
नौदल आणि हवाई दलातल्या १० महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही
बोट २६ हजार नॉटिकल मैलांपेक्षा जास्त प्रवास करणार असून, चार
परदेशी बंदरांवर मुक्काम करेल. प्रदक्षिणा पूर्ण करुन ही बोट पुढच्या वर्षी मे महिन्यात
पुन्हा भारतात परतणार आहे.
****
राज्यातल्या अष्टविनायक मंदिर परिसरात सुरु असणारी विकासकामं
वेळेत आणि दर्जेदारपणे पूर्ण करावीत अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या
आहेत. श्री अष्टविनायक मंदिर परिसर विकास आराखडा कामांची आढावा बैठक आज मंत्रालयात
झाली,
त्यावेळी पवार बोलत होते.
राज्यातील क्रीडा संस्कृतीच्या दर्जात्मक विकासासाठी तसंच क्रीडा
क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी नवीन क्रीडा धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री
पवार यांनी दिले. आज मंत्रालयात यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातील सर्व
क्रीडा संकुले अद्ययावत करावीत, खेळाडूंना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा, साधन-सामग्री तसंच आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देण्यात यावं, विभागीय,
जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुल समितीची पुनर्रचना करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
बीड जिल्ह्यात बहुचर्चित असलेली रेल्वे प्रत्यक्षात येत्या १७
सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी रोजी सुरू होणार असून त्या अनुषंगानं जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. त्यासाठी
आज जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी ब्रिजेशकुमार
सिंग,
यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी बीड रेल्वे स्थानक परिसराची पाहणी
केली.
****
नांदेड इथलं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, आणि पुणे इथल्या अॅस्पायर
नॉलेज अॅण्ड स्किल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने परवा १३
सप्टेंबरला नांदेडला विद्यापीठात “भव्य रोजगार मेळाव्या”चं आयोजन करण्यात आलं आहे.
या मेळाव्यासाठी जवळपास ५ हजार ३०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या रोजगार मेळाव्यात
२५ ते ३० नामांकित कंपन्यांसह अनेक उद्योग समूह सहभागी होणार आहेत. इच्छुकांना वेळेवर
हजर राहूनही या मुलाखती देता येणार आहेत.
****
परभणी इथं आज मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत
जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्या हस्ते अनुकंपाधारक उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या
अनुषंगाने पात्र उमेदवारांना शिफारस पत्र देण्यात आली. संबंधित नियुक्ती प्राधिकारी
कार्यालय या उमेदवारांना लवकरच नियुक्ती पत्र प्रदान करणार आहेत.
****
धाराशिव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी
शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सर्व विभागांनी समन्वयानं काम
करण्याचं आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केलं आहे. ते आज धाराशिव इथं यासंदर्भातल्या
कार्यशाळेत बोलत होते. विविध ग्रामपंचायतींनी पंचायतराज अभियानात विशेष कार्य केल्याबद्दल
आमदार पाटील यांच्या हस्ते सरपंच आणि ग्रामसेवक यांचा सन्मान करण्यात आला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘श्री गणेशा आरोग्याचा’ हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत
जिल्ह्यात २४६ शिबीरांत एकूण २० हजार लोकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
****
बीड पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत शहरातील १५ डीजे वर कारवाई
करत ५ लाख ४ हजार रुपये दंड वसूल केला. सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय
हरित लवाद आणि राज्य शासनाच्या निर्देशांचं पालन न केल्याबद्ल ही कारवाई करण्यात आली.
****
हवामान
राज्यात आज विदर्भ, मराठवाडा
तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर,
धाराशिव तसंच बीड जिल्ह्यांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने
वर्तवला आहे.
****
No comments:
Post a Comment