Thursday, 11 September 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.09.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 11 September 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      सी पी आर आय प्रकल्पामुळे इलेक्ट्रीकल उत्पादन क्षेत्राला चालना-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      'नो पीयूसी नो फ्युएल' उपक्रमाची अंमलबजावणी राज्य सरकारच्या विचाराधीन

·      आरक्षणाच्या बाबतीत ओबीसींवर अन्याय होणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही

·      जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं राज्यभरात आंदोलन

आणि

·      आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताची विजयी सुरुवात: युएईवर नऊ गडी राखून विजय

****

केंद्रीय विद्युत संशोधन संस्था - सी पी आर आय च्या विद्युत साहित्य आणि उपकरणांच्या तपासणी प्रयोगशाळेमुळे, राज्याच्या इलेक्ट्रीकल उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नाशिक तालुक्यातल्या शिलापूर इथं या प्रकल्पाचं काल केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते लोकार्पण झालं, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

छत्रपती संभाजीनगरसह राज्यात इलेक्ट्रीक वाहन क्षेत्रात वाढती गुंतवणूक पाहता, या प्रकल्पात ईव्ही चाचणीची व्यवस्था करावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री खट्टर यांच्याकडे केली. राज्यातल्या शेतकऱ्यांना सौर उर्जेद्वारे डिसेंबर महिन्यापर्यंत अखंडीत वीज पुरवठा करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

****

परदेशातल्या उद्योगांची कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेवून आयटीआय प्रशिक्षणात अभ्यासक्रमांचा समावेश करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाबरोबरच खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थासाठीही एक सक्षम यंत्रणा तयार करावी, आय टी आय चे अल्पकालीन अभ्यासक्रम अधिक प्रभावीपणे राबवावेत, तसंच प्रशासनमार्फत केलेल्या सर्व सामंजस्य करारांचा आढावा सीएम डॅशबोर्डवर घेण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

****

प्रदूषण मुक्त पर्यावरणासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर 'नो पीयूसी नो फ्युएल' उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. परिवहन आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. या उपक्रमाबाबत ही संक्षिप्त माहिती...

प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येणाऱ्या वाहनाचा क्रमांक सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तपासला जाईल. त्यानुसार वाहनाची पीयूसी वैधता कळेल. पीयूसी संपलेल्या वाहनांना पेट्रोल पंपावर पीयुसी काढता येईल आणि त्यानंतरच इंधन भरता येईल, अशी यंत्रणा, सरकारच्या विचाराधीन आहे. भविष्यात वाहन विक्री तसंच दुरुस्ती करणाऱ्या दुकानांमध्ये पीयुसी देण्याची व्यवस्था केली जाईल. अवैध पद्धतीने पीयूसी देणाऱ्या विरोधात धडक मोहीम राबवण्याचे आदेशही सरनाईक यांनी दिले. सध्याच्या पिढीने स्वतःवर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणं आवश्यक असल्याचंही सरनाईक यांनी म्हटलं आहे.

****

आरक्षणाच्या बाबतीत ओबीसींवर अन्याय होणार नाही, असा पुनरुच्चार ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. काल या उपसमितीची पहिली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांनाच अध्यादेशाप्रमाणे प्रमाणपत्र मिळेल, फक्त खोट्या नोंदी होणार नाहीत याची, उपविभागीय अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता उपसमितीतील सर्वच सदस्यांनी व्यक्त केली, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. ते म्हणाले,

बाईट- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

****

जनसुरक्षा कायदा रद्द करावा या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात महाविकास आघाडीनं आंदोलन केलं. सरकारनं या आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी अन्यथा, आंदोलन अधिक व्यापक करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

बीड इथं महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. परभणी इथंही धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं.

****

वस्तू आणि सेवा कराच्या दरात केलेल्या कपातीमुळे लोकांची क्रयशक्ती वाढेल, असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी व्यक्त केला आहे. प्रसारभारतीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. बाजारपेठेतील खरेदी वाढल्यानंतर उत्पादनात वाढ होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असं चौधरी यांनी नमूद केलं. ते म्हणाले...

  बाईट- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी

****

जीएसटीची सुधारित कर रचना सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी आणि देशाचं सकल उत्पन्न वाढवणारी असल्याचं, धाराशिव जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव यांनी म्हटलं आहे. तर खतं आणि सिंचन साहित्यावरच्या करात कपात केल्याबद्दल अमित देवगिरे या शेतकऱ्याने समाधान व्यक्त केलं. या नवीन कर रचनेमुळे गृहिणींना दिलासा मिळणार असून, घरगुती वस्तूवरचा कर कमी केल्यामुळे घर खर्चाचं बजेट आटोक्यात येईल, असं मत उज्ज्वला मसलेकर या गृहिणीने व्यक्त केलं. त्या म्हणाल्या,

बाईट- उज्ज्वला मसलेकर, गृहिणी

****

कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या योजना क्रमांक दोन मध्ये रामदारा ते एकुरका या टप्पा क्रमांक सहा च्या कामाला शासनाने मंजुरी दिली आहे. 'मित्र'चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल तुळजापूर इथं ही माहिती दिली. यामुळे सुमारे ३५ गावाच्या सिंचनाची सोय होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं आपल्या पहिल्या लढतीत संयुक्त अरब अमिरातीच्या संघावर नऊ गडी राखून सहज विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांसमोर युएईचा डाव अवघ्या ५७ धावांवर संपुष्टात आला. नंतर अभिषेक शर्माच्या १६ चेंडूत ३० धावांच्या खेळीनंतर पाचव्या षटकातच भारतीय संघानं हे लक्ष्य पूर्ण केलं. अवघ्या सात धावा देत चार बळी टिपणाऱ्या कुलदीप यादवला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. भारतीय संघाचा पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध येत्या १४ तारखेला होणार आहे.

****

धाराशिव इथं झालेल्या जिल्हास्तरीय युवक महोत्सवामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, धाराशिव उप-परिसराने नऊ पारितोषिकं मिळवली. यात एकांकिका, प्रहसन, मुकाभिनय, आदी स्पर्धांमधल्या पारितोषिकांचा समावेश आहे.

बीड जिल्हा युवक महोत्सवाचं आज उद्घाटन होत आहे. गेवराई इथल्या र.भ. अट्टल महाविद्यालयात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

****

सांगलीच्या अंधश्रद्धा निर्मुलन वार्तापत्र वृत्तपत्राचे विविध पुरस्कार काल जाहीर झाले. यामध्ये नांदेड जिल्ह्यात नायगाव इथले सामाजिक कार्यकर्ते भाऊराव मोरे यांना आधारस्तंभ पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या रविवारी १४ तारखेला लातूर इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

****

सांडपाणी व्यवस्थापन तसंच पाण्याचा पुनर्वापर करण्याची क्षमता असणारे उच्च क्षमतेची दोन यंत्रं लातूर महानगरपालिकेच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक मानसी यांच्या हस्ते या वाहनांचं काल लोकार्पण करण्यात आलं. या नव्या यंत्रांच्या माध्यमातून मलवाहिनी तसंच भूमिगत गटारांची स्वच्छता करणं, अधिक सोयीचं होणार आहे.

****

बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ईट इथल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या विद्युत फिडरच्या नवीन जोडणीच्या कामाला काल आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते प्रारंभ झाला. या नव्या जोडणीमुळे जल शुद्धीकरण केंद्राला २४ तास वीज पुरवठा होणार असून, बीड शहराला अखंडित पाणी पुरवठा होणार आहे.

****

विभागात येलदरी धरणातून सुमारे दोन हजार तर इसापूर धरणातून सुमारे साळे आठ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग केला जात आहे. पैठणच्या जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग थांबवण्यात आला आहे.

****

हवामान

राज्यात आज विदर्भ, मराठवाडा तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव तसंच बीड जिल्ह्यांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

****

No comments:

Post a Comment